Hint of Rain : पावसाचे नैसर्गिक संकेत
1 min read💦 पावसाळ्याच्या सुरुवातीस पूर्व अगर पश्चिम दिशेस आकाशात सौम्य मेघगर्जना होत असताना चातक, बेडूक, मोर तसेच पावश्या पक्षाचे आवाज ऐकू येऊ लागले म्हणजे त्यावर्षी चांगला पाऊस पडेल असे समजावे.
💦 सकाळच्या वेळी जर घोरपडी बिळाबाहेर येऊन तोंड काढून बसलेल्या दिसल्या तर एक दोन दिवसात पाऊस येणार असे समजावे.
💦 मुंग्यांच्या सतत धावणाऱ्या रांगा विरळ झाल्या, दिसेनाश्या झाल्या की, मृगाचा पाऊस चार-पाच दिवसात पडणार असे समजावे.
💦 सरड्यांच्या डोक्यांचा रंग तांबडा झाला की, आठवडाभरात पाऊस येणार असे समजावे.
💦 पंख असलेल्या उधळींचे (वाळवी) थवे वारुळातून अगर मातीच्या भिंतीतून संध्याकाळी बाहेर पडताना आणि घराभोवती ऊडताना दिसले की, मृग नक्षत्राचा पाऊस चार दिवसांवर आला आहे, असे समजावे.
💦 सूर्योदय व सूर्यास्ताच्यावेळी क्षितिजावर काळ्याभोर ढगावर तांबूस छटा दिसल्या आणि काळ्या ढगांच्या कडावर रुपेरी चमक दिसली की, पाऊस जवळ आला असे समजावे.
💦 कावळ्यांच्या काटक्या, धागे जमवून घरटी बांधण्याची धांदल सुरू केली की, पंधरवड्यात पावसाला सुरुवात होणार असे समजावे.
💦 रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्रात पश्चिम क्षितिजावर ढग गर्जना न करता गुरगुराट करताना आढळले की, हंगामभर उत्तम पाऊस पडणार असे समजावे.
💦 हस्त नक्षत्रातील लोह चरणीतील जमीन कठीण करतो व पिकाच्या मुळामध्ये अपायकारक रोग निर्माण करतो.
💦 कृतिका व रोहिणी नक्षत्रात कमळाची फुले असलेल्या तळ्यात अगर सरोवरात वद्य पक्षात रात्री नक्षत्रे व तारे यांचे सुस्पष्ट प्रतिबिंब दिसले तर, मृग ते चित्रा या सर्व नक्षत्रात चांगला पाऊस संभवतो.
💦 स्वाती नक्षत्रातील पाऊस खळ्यातील धान्याचा नाश करतो तर, समुद्रावर पडणारा पाऊस मोती निर्माण करतो असे म्हणतात.
💦 पूर्व दिशेकडून सरकत येणाऱ्या ढगांनी आकाश व्यापून पर्जन्यवृष्टी झाल्यास धान्याची समृद्धी होते. आग्रेयकडून ढग जमा झाल्यास ते वांझ असल्याने पाऊस पडत नाही. दक्षिणेकडून कार्तिक व मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात ढग येऊन थोडी जरी वृष्टी झाली तरीही धान्याची नासाडी होते . नैॠतेकडून फळी धरून येणाऱ्या ढगांची वृष्टी कृमी, कीटक तसेच वनस्पतीचे रोग वाढविते. याऊलट पश्चिम, उत्तर व ईशान्य या दिशांनी येणारे ढग व त्यामुळे होणारा पाऊस सुबत्ता आणतो, असे जाणकार सांगतात.
💦 रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर अनेक काजवे चमकताना दिसले की , चार-पाच दिवसात पाऊस पाडणार असे समजावे.
💦 जेष्ट महिन्याच्या अमावस्येपासून ते आषाढी एकादशीपर्यंत कोकिळेचा आवाज ऐकू आला नाही तर, सर्वत्र चांगला पाऊस होतो. मात्र, कोकिळेचा आवाज अगर गुंजन बंद झाले नाही तर, अवर्षणाची शक्यता संभावते.
💦 मृग नक्षत्रापूर्वी पक्षी झाडावर घरटी बांधू लागले की, पावसाची चाहूल लागते.
💦 शेतकरी पारंपरिक अंदाजानुसार पक्षी झाडावर किती उंचीवर, कोणत्या प्रकारच्या फांदीवर घरटे बांधतो, यावरून यंदा पाऊस कसा होईल, याचे अनुमान काढतात. कावळ्याने उशिरा घरटे बांधण्याचे काम सुरू केल्याने वेळेवर येणारा पाऊस लांबण्याची शक्यता असली तरी, यंदा कावळा झाडाच्या जाड फांदीवर घरटे बांधत असल्याचे दिसून आले असून, हे चांगल्या पावसाचे भाकित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
💦 कावळ्याने घरटे झाडांच्या मजबूत फांदीवर अन् शेंड्यापासून बरेच मध्ये दिसून येते. जेव्हा जाड फांदीवर हे घरटे असते, याचाच अर्थ पाऊस जोरदार आणि वादळी वाऱ्यासह होणार, असा त्याचा अर्थ मानला जातो.
💦 जेव्हा पक्षी उंच शेड्याकडील फांदीवर घर बांधतो, तेव्हा त्याला पाऊस कमी होणार याचा अंदाज आलेला असतो. त्यामुळे यंदाची घरटी चांगल्या पावसाचे सूचक मानले जात आहेत.
💦 कावळ्यांसह मुंग्या, टिटवी, चातक, पावशा आदी पक्षी पावसाचे संकेत देतात. ग्राम संस्कृतीतील या पारंपारिक ठोकताळ्याच्या आधारेच शेतकरी कामाला लागत होते. रडार, सॅटलाईट अशी अल्ट्रा मॉडर्न हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा आज आहेत.
💦 पक्ष्यांच्या संभाव्य हवामानाचे, दुष्काळ, वातावरणातील बदलांचे अगदी अचूक संकेत मिळत असतात आणि त्यानुसार त्यांच्या दिनक्रमात बदल होत असतात.