krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Citrus tristeja, Citrus silla : ‘सिट्रस ट्रिस्टेजा’, ‘सिट्रस सिला’पासून संत्रा, माेसंबीच्या बागांचा बचाव कसा कराल?

1 min read
Citrus tristeja, Citrus silla : नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, काेंढाळी (ता. काटाेल), सावनेर, वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), अमरावती जिल्ह्यातील माेर्शी, वरूड, शेंदुरजना (घाट) भागात संत्रा (Orange) आणि माेसंबीच्या बागा माेठ्या प्रमाणात असून, भरघाेस उत्पादन घेतले जाते. विदर्भात सध्या संत्र्याला 15 जानेवारीपासून तर माेसंबीला 5 ते 6 फेब्रुवारीपासून अंबिया बहाराची फूट दिसून आली. त्याचबरोबर संत्रा व माेसंबी बागांवर रस शोषण करणाऱ्या किडी व रोगांचा देखील प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावर 'सायला' तसेच आधी मावा (ॲफीड) किडींचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे या किडी व राेगाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययाेजना करणे अत्यावश्यक आहे.

✳️ ‘सिट्रस ट्रिस्टेजा’ची लक्षणे व उपाययोजना
डिसेंबरमध्ये मावा या किडीचा प्रादुर्भाव नवतीवर हाेताे. नवतीवर मावा किडींचे पिल्ले व प्राैढ काेवळी पाने व शेंड्यामधून रस शोषूण घेतल्यामुळे झाडांची पाने पिवळी पडली असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे पाने आक्रसले जावून ते खालच्या बाजूने मुरगळलेली आढळून आली आहेत. मावा पानांवर स्त्राव साेडत असल्याने त्यावर बुरशी वाढून पाने वाळतात. या किडींमुळे ‘सिट्रस ट्रिस्टेजा’ (Citrus tristeja) हा विषाणूजन्य (virus) रोग पसरताे. या राेगाचे व्यवस्थापन करण्यासाठी पराेपजीवी कीटकांद्वारे माव्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्याकरीता क्रायसाेपिडस काेक्सिनेलीड्स आणि सिरफीड्स द्वारे मावा या किडींचे जैविक व्यवस्थापन करावे किंवा 1 टक्का निमतेल, 10 मिली लिटर पाणी किंवा पेट्राेलियम स्प्रे ऑईल 2 टक्के 200 मिलि 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकांमध्ये डायमेथाेएट 30 ईसी 20 मिलि किंवा ईमिडाक्लाेप्रीड 17.8 एस.एल 5 मिलि साेबत बुरशीकरीता २५ ग्राम काॅपर ऑक्सीक्लाेराईड 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. म्हणजे मावा किडींचा बंदाेबस्त करता येईल. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पुन्हा करावी.

✳️ ‘सिट्रस सिला’ची लक्षणे व उपाययोजना
सिट्रस सिला (Citrus silla) किडींचे पिल्ले, अंडी संत्र्याच्या नवतीवर तसेच फुलांवर आढळून येत आहे. पिल्ले व प्राैढ काेवळी पाने आणि कळ्यामधील रस शोषण करून घेत असल्याने पाने मुरगळली जातात. कधी कधी नवीन पाने जळालेले आढळते तसेच शेंडे वाळणे व पानांवर बारीक साखरेसारखे स्फटिक पडलेले आढळून येतात. त्यावर बुरशी वाढते. परिणामी, पाने अन्नद्रव्य तयार करू न शकल्यामुळे फूलगळ, नवीन कळ्या व छाेटी संत्री, माेसंबीची फळे गळणे हा प्रकार आढळून येताे. झाडांच्या फळधारणेवर परिणाम हाेताे आणि ग्रीनिंग या जीवाणू रोगाचा प्रादुर्भाव या सायला किडींमुळे आढळून येत आहे. विदर्भात हा प्रादुर्भाव 10-15 टक्क्यांपर्यंत आढळून येत आहे. यात झाडांची पाने पिवळी होतात व शिरा हिरव्या झालेल्या आढळून येतात. जगात या रोगामुळे 30 ते 40 टक्के बागा नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे सायला किडीचे जैविक आणि रासायनिक उपाययाेजनांद्वारे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जैविक उपाययाेजनांमध्ये नवतीच्या काळात म्हणजे सद्यस्थितीत पेट्रोलीयम स्प्रे 2 टक्के 200 मिलि किंवा निमतेल 1 टक्का 100 मिलि किंवा करज ऑईल 100 मिलि, साेबत 20 ते 25 ग्राम सर्फ 10 लिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. रासायनिक उपायांमध्ये थायमेथाॅक्झाम 25 डब्ल्यू.पी. 3 ग्राम, इमीडाक्लाेप्रीड 5 मिलि किंवा क्विनाॅलफाॅस 10 मिलि, साेबत काॅपर ऑक्सीक्लाेराईड 25 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. गरज भासल्यास तिसरी फवारणी 8 ते 10 दिवसानंतर करावी.

✳️ ही दक्षता घ्या
🔆 याकरिता बागायतदार स्वतः कलमे तयार करणार असेल तर कलमे तयार करतेवेळी डोळे निरोगी प्रमाणित झाडापासून घ्यावेत किंवा तयार कलमे पंजीकृत रोपवाटिकेमधूनच घ्यावीत.
🔆 भारतात जंबेरी, रंगपूर लिंबू, क्लिओपात्रा संत्रा ही फळझाडे ह्या रोगाच्या विषाणूला प्रतिकारक आढळून आली आहेत. म्हणून संत्री / मोसंबीचे डोळे या जातीच्या खुंट्यावर बांधून तयार केलेले कलम वापरावे.
🔆 या रोगाच्या विषाणूचा प्रसार बियाण्यांद्वारे होत नसल्यामुळे लिंबाची बियांपासून केलेली रोपे वापरावीत.
🔆 विषाणूचा दुय्यम प्रसार मुख्यतः मावा किडीमुळे होत असल्यामुळे रोपवाटिकेत किंवा बागेत ह्या किडीच्या कीटकनाशकाचा योग्य वेळी वापर करुन या किडीचे नियंत्रण करावे.
🔆 निसर्गात या विषाणूच्या सौम्य व तीव्र रोगकारक प्रजाती आढळतात. म्हणून जैविक नियंत्रणाच्या तत्वाचा वापर करुन या नियंत्रण करता येऊ शकते.

✳️ मंद ऱ्हास (ग्रीनिंग)
🔆 हा मायकोप्लाझ्मामुळे होणारा रोग असून मागील काही वर्षांपासून हा रोग आपल्या भागात तुरळक प्रमाणात दिसून येत आहे. याचा प्रसार रोगट कलमे तसेच सायट्रस सिला या किडीद्वारे होतो.
🔆 प्रसार :- रोगकारक विषाणूचा प्रथम शिरकाव बागेत रोगट कलमे वापरल्यामुळे होतो. रोगट झाडावरील डोळे कलमे तयार करण्यास वापरले गेले तर त्यापासून रोगट कलमे तयार होतात. शिवाय रोगट झाडापासून डोळे काढण्यास वापरलेला चाकू कलमे तयार करताना वापरला गेला तरी रोगट कलमे तयार होतात. विषाणूचा प्रसार बियाण्याद्वारे होत नाही. बागेत विषाणूंचा दुय्यम प्रसार सायट्रस सिला किडीमुळे होतो.
व्यवस्थापन या रोगाचा सायट्रस सिला या किडीद्वारे प्रसार होत असल्यामुळे या किडीचे नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या किटकनाशकांची आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
🔆 रासायनिक कीटकनाशके :-
मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 2 मि.मि. किंवा अॅसीफेट 1 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 0.5 मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. गरज भासल्यास 10 दिवसाच्या अंतराने वरीलपैकी एका कीटकनाशकांची फवारणी करावी.

✳️ जलद ऱ्हास (ट्रिस्टेझा)
🔆 वरील रोग विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे होतो. भारतातील सर्वत्र राज्यात ह्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.
🔆 लक्षणे :- ह्या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे रोगग्रस्त झाडाला नवीन फूट न येणे किंवा आल्यास ती अत्यल्प असणे, पानांचा रंग काही ठिकाणी गर्द हिरवा किंवा पांढुरका होणे. त्यानंतर पाने गळायला सुरुवात होऊन फांद्या पर्णहित होतात व फांद्या वाळायला सुरुवात होते. ह्या रोगाचे विशेष वैशिष्टये म्हणजे प्रादुर्भाव सुरुवातीचे काळात झाला तर भरपूर बहार येऊन फळधारणाही मोठ्या प्रमाणात होते. अशा झाडावरील फळांचा रंग फळाची पूर्ण वाढ होण्याआधीच बदलून पक्व फळासारखा दिसतो. बहुतांशी अशी झाडे या अवस्थेत फळांसह आकस्मिकपणे वाळतात. विशेषतः लिंबू व मोसंबीच्या प्रादुर्भाव झालेल्या काही झाडांच्या पानांच्या शिरा पांढुरक्या पडतात. कलम युतीजवळील खोडावरील साल काढून खोडाचे निरीक्षण केल्यास खोडाच्या बाहेरील भागावर लांबोळ्या सुरकुत्या आढळतात. तीव्र प्रादुर्भाव असलेल्या झाडाची मुळे सडतात व झाड वाळते.
🔆 व्यवस्थापन :- ह्या रोगाने झाड एकदा रोगट झाल्यानंतर त्यावर सध्यातरी उपाय उपलब्ध नाही. हा रोग येऊ न देणे व आलाच तर त्याचा प्रसार होऊ न देणे आवश्यक असून, त्यासाठी वेळीच याेग्य प्रतिबंधात्मक उपाययाेजना करणे आवश्यक आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!