krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Earthquake in Turkey, Yarn Export Opportunity : तुर्कस्तानातील भूकंपामुळे भारताला सूत निर्यातीची संधी

1 min read
Earthquake in Turkey, Yarn Export Opportunity : फेब्रुवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यातील भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांमुळे तुर्कस्तान (Turkey) अक्षरश: हादरला. या भूकंपाचा तुर्कस्तानातील इतर उद्याेगांसाेबत तेथील सूत गिरण्यांवर (Spinning mill) विपरित परिणाम झाला आहे. मात्र, कापड उद्याेग (Textile industry) सुरक्षित राहिला. तेथील सूत गिरण्या पूर्ववत व्हायला आणखी काही काळ लागणार असून, ताेपर्यंत टेक्सटाईल मिल चालू ठेवण्यासाठी तुर्कस्तानला कापूस (Cotton Lint) व सुताची (Cotton yarn) नितांत आवश्यकता भासणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांकडून कापूस व सूत आयातबाबत (Import of yarn) चाचपणी केली जात असल्याने भारतीय कापूस व सूत निर्यातदारांसाठी (Cotton and yarn exporters) ही चांगली संधी (Opportunity) ठरू शकते. मात्र, यात भारतीय वस्त्रोद्योग आडकाठी निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

🌍 सूत निर्यातीची संधी
तुर्कस्तानातील गझियानटेप हा भागात सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. भूकंपामुळे या भागातील बहुतांश सर्वच सूत गिरण्या प्रभवित झाल्या आहेत. या सूत गिरण्या पूर्ववत हाेऊन पूर्ण क्षमतेने सुताचे उत्पादन करण्यास बराच काळ लागणार आहे. ताेपर्यंत तुर्कस्तानातील टेक्सटाईल मिल बंद ठेवणे मिल मालकांसह तुर्कस्तान सरकारला परवडण्याजाेगे नाही. त्यामुळे तुर्कस्तानातील टेक्सटाईल मिल जागतिक बाजारपेठेतून सूत खरेदी करण्याच्या विचारात आहेत. तुर्कस्तानातील टेक्सटाईल मिल मालकांनी सुताच्या खरेदीबाबत भारतीय सूत निर्यातदारांच्या संपर्कात असल्याची माहिती बाजारतज्ज्ञांनी दिली. त्यामुळे भारतील सूत निर्यातदारांना सूत निर्यातीची संधी चालून आहे. भारतीय सूत तुर्कस्तानात निर्यात झाल्यास याचा आगामी काही महिन्यात भारतीय सूत गिरण्यांना फायदा हाेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

🌍 भारतीय सूत गिरण्या अडचणीत
सन 2021-22 च्या हंगामात देशातील कापसाचे दर प्रति क्विंटल 10,000 रुपयांच्या वर गेले हाेते. त्यामुळे भारतीय सूत गिरण्यांनी प्रति खंडी 1 लाख 5 हजार रुपये दराने रुईची खरेदी केली हाेती. या रुईपासून तयार केलेल्या सुताचे दर प्रति किलाे 19 रुपये व त्यापेक्षा अधिक हाेते. हा दर अधिक असल्याचे सांगून भारतीय टेक्सटाईल मिलने चढ्या दराने सुताची खरेदी करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर टेक्सटाईल लाॅबीने केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून जुलै व ऑगस्ट 2022 मध्ये चीन व व्हिएतनाममधून 10 रुपये प्रति किलाे दराने सुताची माेठ्या प्रमाणात आयात (Import) केली. साेबतच जुलै ते सप्टेंबर 2022 या तीन महिन्यात 13.95 लाख गाठी कापसाची आयात (Import) करण्यात आली. 1 ऑक्टाेबर 2022 पासून कापूस खरेदीचा नवीन हंगाम सुरू हाेताच रुईचे दर 62,000 ते 64,000 रुपये प्रति खंडीवर आले. कापूस व रुईच्या दरात माेठी तफावत निर्माण झाल्याने देशातील सर्वच सूत गिरण्या आर्थिक अडचणीत आल्या आहेत.

🌍 सूत निर्यातीला इन्सेटिव्ह द्यावे
कापूस व रुईचे दर 40 ते 45 टक्क्यांनी उतरल्याने तसेच 19 रुपये व त्यापेक्षा अधिक दराने सुताची खरेदी करण्यास भारतीय टेक्सटाईल मिल मालकांनी नकार दिल्याने सूत गिरणी मालकांकडे माेठ्या प्रमाणात सूत विक्रीविना पडून आहे. आर्थिक अडचणींमुळे या सूत गिरणी मालकांनी यावर्षी माेठ्या प्रमाणात रुई खरेदी करण्यास फारसा रस दाखवला नाही. याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला असून, दर कायम दबावात राहिले आहेत. आज मागील हंगामातील सुताची निर्यात (Export) करावयाची झाल्यास ते आजच्या दराने विकावे लागते. तसे केल्यास भारतीय गिरणी मालकांना 40 ते 45 टक्के नुकसान सहन करावे लागेल. एवढे माेठे नुकसान सहन करून सूत गिरणी मालक सूत निर्यातीचे धाडस करणार नाही. दराचा विचार केल्यास तुर्कस्तानातील टेक्सटाईल मिलला यावर्षीच्या म्हणजेच 62,000 ते 64,000 रुपये प्रति खंडी दराने खरेदी केलेल्या कापसाचे सूत निर्यात करावे लागेल. तसे केले तरीही सूत गिरणी मालकांवरील आर्थिक संकट कायम राहणार आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने या सूत गिरणी मालकांना सूत निर्यातीसाठी किमान 40 ते 45 टक्के इन्सेटिव्ह (अनुदान) दिल्यास मागील हंगामातील सुताचे दर यावर्षीच्या सुताच्या दराला समांतर येतील आणि निर्यात करणे साेपे जाईल. त्यासाठी केंद्र सरकारने अतिरिक्त आर्थिक तरतूद करणे अत्यावश्यक आहे. इन्सेटिव्ह दिल्यास सुताची निर्यात हाेऊन गिरणी मालकांना दिलासा मिळले. शिवाय, ते पुन्हा रुई खरेदी करून सूत निर्मितीला सुरुवात करतील. त्यामुळे त्यांच्यावर गिरण्या बंद ठेवण्याची अथवा विकण्याची नामुश्की ओढवणार नाही. यातून कामगारांचा राेजगार शाबूत राहिली. शिवाय, रुईची, पर्यायाने कापसाची मागणी वाढून त्याचा परिणाम कापसाचे दर वाढण्यावर हाेईल. यासाठी केंद्र सरकारच्या प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज आहे.

🌍 भारतीय टेक्सटाईल लाॅबीचा विराेध?
भारतात कापूस व सुताचा मुबलक साठा असल्याने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी भारताकडे लक्ष केंद्रीत केले आहे. परंतु, भारतातून सूत नर्यात केल्यास देशात सुताचा तुटवडा निर्माण हाेईल आणि आपल्याला पुन्हा चढ्या दराने सुताची खरेदी करावी लागणार असल्याची भीती भारतीय टेक्सटाईल मिल मालकांना भेडसावत आहे. कारण भारतीय टेक्सटाईल मालकांना कमी दरात कापूस व सूत खरेदी करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. कापूस व सुताचे दर वाढल्यास टेक्सटाईल लाॅबी त्या दरवाढीला प्रखर विराेध करतात आणि दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करतात, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे सूत निर्यातीला (Cotton yarn export) भारतीय टेक्सटाईल व गारमेंट लाॅबी (Indian Textile and Garment Lobby) विराेध करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, देशातील सूत गिरणी मालकांच्या लाॅबीपेक्षा टेक्सटाईल व गारमेंट लाॅबी प्रबळ असून, ती लाॅबी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून त्यांना हवे तसे निर्णय सरकारला घेण्यास बाध्य करण्यासाठी सक्षम आहे.

🌍 सूत, कापड आयात आकडेवारी
तुर्कस्तानने जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या काळात 765.475 दशलक्ष डाॅलर्स किमतीचे सूत आयात केले हाेते. त्यांची सन 2021 मधील सुताची आयात 534.392 दशलक्ष डाॅलर्स आणि सन 2020 मध्ये 380.587 दशलक्ष डाॅलर्स इतकी होती. रुईची आयात 2022 मध्ये 106.57 दशलक्ष डाॅलर्स आणि नोव्हेंबरमध्ये 0821 दशलक्ष डाॅलर्सची होती. नोव्हेंबर 2022 पर्यंत कापडाची आयात 50.165 दशलक्ष डाॅलर्सची होती, 2021 मध्ये 25.913 दशलक्ष डाॅलर्स आणि 2020 मध्ये 26.891 दशलक्ष डाॅलर्स होती. फॅब्रिकची आयात नोव्हेंबर 2022 मध्ये 28.180 दशलक्ष डाॅलर्स आणि 2020 मध्ये 25.2020 दशलक्ष डॉलर्स होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!