krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmer suicide : 19 मार्च अन्नदात्यासाठी अन्नत्याग

1 min read
Farmer suicide : किसानपुत्र आंदोलन 19 मार्च हा दिवस प्रत्येक वर्षी अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणून गेली सहा वर्षे झाली आंदोलन करत आहे. याच दिवशी अन्नत्याग आंदोलन का करायचे असा प्रश्न कुणी विचारत असेल तर सांगता येईल की, 19 मार्च 1986 या रोजी पुरोगामित्व मिरवणाऱ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक घटना घडली. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावातील एका संपूर्ण शेतकरी कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. तो हा काळा दिवस म्हणजे 19 मार्च 1986 चा दिवस. या देशात सन 1986 च्या पूर्वी सुद्धा अनेक शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) झालेल्या आहेत. परंतु, ज्यांची सरकारी दप्तरात नोंद केली गेली अशी ही पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या आहे.

आज या घटनेला जवळपास 35 वर्षे होत आली तरी सुद्धा या पुरोगामी महाराष्ट्रात आणि या देशात रोज 43 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची एक मालिकाच या देशात रोज घडताना दिसते आहे. रोज सूर्य उगवतो त्याच वेळी कुठेतरी बोंब फुटलेली असते. रोज सूर्य बुडतो तेव्हा कुठेतरी बांगडी फुटलेली असते, एका संसाराची रोज राखरांगोळी झालेली दिसते, अनाथांची करून किंकाळी ऐकावी लागते आहे. ही आजची वास्तव परिस्थिती नाकारता येण्यासारखी नाही.

शेती आणि शेतकरी इथल्या राजकीय व्यवस्थेचा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचा आव राजकीय व्यवस्थेकडून आणलेला असतो. मात्र, मूळ कारणाकडे इथली व्यवस्था मात्र डोळेझाक करताना दिसते. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याची वेळ येते, तेव्हा तेव्हा मात्र त्यांना स्वातंत्र्य नाकारले गेले आहे. होय शेतकऱ्यांना स्वातंत्र्य नाकारले गेले आहे. परिणामी, या देशात शेतकरी पारतंत्र्य ढकलला गेला आहे. शेती परवडणार नाही किंवा ती परवडू नयेच, यासाठीच इथली राजकीय व्यवस्था कंबर कसून काम करताना दिसते. शेतीच्या लुटीतून याच देशात इंडियाचा चकचकीत डोलारा उभा आहे.

अगदी स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळापासून शेती हा शोषणाचा विषय राहिलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून आज रोजी देशात दररोज 43 शेतकरी मरणाला जवळ करतो आहे. शेतकरी आत्महत्यांचा आकडा हा भयावह भीती वाटणारा आहे. मात्र. राजकीय व्यवस्था ढिम्मच आहे. शेतकरी सध्या हतबल आणि जर्जर अवस्थेत दिसतो. ज्या शेतकऱ्यांच्या मुलाकडून लढण्याची अपेक्षा ठेवली जाऊ शकते. तो शेतकरी पुत्र सुद्धा संभ्रम अवस्थेत आहे. त्याला सुद्धा काय करावे हे कळत नाहीये. यांची अवस्था ही महाभारतातल्या अभिमन्यू सारखी झालेली आहे. आत्महत्याचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं इथल्या राजकीय व्यवस्थेने वारंवार इथल्या शेतकऱ्यांना सांगितलं. परंतु, प्रश्न काही सुटलेला नाही. तसं पाहिले तर या शेतकरी आत्महत्यांसाठी सत्तेत राहिलेली आणि सत्तेच्या बाहेर विरोधी पक्षात राहिलेली सर्वच राजकीय मंडळी, राजकीय पक्ष समसमान जबाबदार आहेत.

त्याहीपेक्षा दुर्देवाने सांगावे लागते की, पहिल्या घटनादुरुस्तीने कायदा करून या देशातला शेतकरी कायद्याने गुलाम झाला. कायद्याच्या न दिसणाऱ्या बेड्यांनी जखडून गेला आणि याच वेळी या कायद्यांच्या बेड्यांना आभूषण म्हणून मिरवण्यासाठी एक मोठी फळी आज कामाला लागलेली दिसतेय, हे आणखीच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. शेतकरी आत्महत्यांच्या कारणांची मीमांसा त्याच्या गरिबीत नसून, त्याला नाकारलेला स्वातंत्र्यात आहे. असे किसानपुत्र आंदोलन नेहमीच सांगत आलेले आहे, वारंवार सांगत आहे. शेतीचा प्रश्न हा कायद्याचा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी आपणाला आघात हा कायद्यावरच करावा लागतो. बाकीच्या उपाययोजना केवळ मलमपट्टी ठरणार आहेत किंवा ठरत आलेल्या आहेत, हा आजवरचा अनुभव आहे.

शेतकरीविरोधी नरभक्षी कायद्यांनी इथली शेती आणि इथला शेतकरी या कायद्याचा बळी जात आहे सिलिंग, आवश्यक वस्तु ,जमीन अधिग्रहण या कायद्याने इथली शेती नरकाच्या खाईत टाकलेली आहे. शेती करणे हे पाप ठरत आहे. शेती करणे म्हणजे जिवंतपणी नरक यातना सोसाव्या लागण्यासारखे आहे. म्हणून आज या महाराष्ट्राला शेतकऱ्यांची दफनभूमी म्हणून दुर्दैवाने उल्लेख करावा लागतो. ही तुम्हाला, आम्हाला लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून शेतकरी आत्महत्यांची ही मालिका थांबवण्यासाठी आपण तयार व्हायला हवे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने औंढा नागनाथ पासून ते चिलगव्हाण यवतमाळपर्यंत पायी यात्रा काढली होती. नंतर रमेश मुगे या शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या तरुणांच्या गावापासून म्हणजेच पानगाव ते अंबाजोगाई अशी पदयात्रा काढली होती. या वर्षी किनगाव ते धुळे अशी असणार आहे. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कडू अप्पा पाटील यांना त्यांच्या किनगाव ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून ही पदयात्रा या वर्षी सुरू होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला जाणार आहे. प्रत्येक संवेदनशील माणसांनी याचा विचार करण्याची गरज आहे. आम्ही सामान्य माणसे आम्ही काय करू शकतो, माझ्या घरी एखादी व्यक्ती मरण पावते त्या दिवशी मी जेवू शकत नाही. मला घास भरवत नाही हीच भावना घेऊन किसानपुत्र आंदोलन 19 मार्च हा दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहे. तुमच्यातील संवेदनशील माणसाला आव्हान करत आहे. माझ्या छोट्याशा कृतीने शेतकरी स्वातंत्र्याचे दार किलकिले होणार असेल तर, या शेतीच्या बांधावर स्वातंत्र्याचा सूर्य पुन्हा उगवणार असेल तर, एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग करूया! शेतकरी आत्महत्यांची मालिका रोखूया !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!