krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Rate of Sugarcane and Ethanol : उसाला 5 हजार रुपयांपेक्षा अधिक दर हवा, मग आंदाेलनाच्या तयारीला लागा

1 min read
Rate of Sugarcane and Ethanol : उसापासून (Sugarcane) इथेनॉल (Ethanol) निर्मिती व्हावी, यासाठी बाळासाहेब कुलकर्णी यांनी भरीव प्रयत्न केले. त्यांनी तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्याशी अनेकदा प्रत्यक्ष भेटून आणि पत्रव्यवहार करून इथेनॉलसाठी पाठपुरावा केला होता. आज उसापासून इथेनॉल निर्मिती केली जात आहे.

इथेनाॅलमुळे देशातील शेतकऱ्यांना उसाला जास्त भाव (Rate) मिळू शकतो आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी भावना मनात ठेवून सतत प्रयत्नशील असलेल्या बाळासाहेब कुलकर्णी यांनी स्व. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील अनेक आंदोलनात भाग घेतला होता. झोन बंदी, सहकारातील हिशोब तपासणीतील गैरव्यवहार, शेतकऱ्यांच्या उसातून बिनपरतीच्या ठेवी घेणे, सहकारातील गैरव्यवहार, सर्वसाधारण सभेत प्रश्न निर्माण कसे विचारले जावे, अशा अनेक समस्यांचा त्यांनी पाठपुरावा केला होता.

आज देशात इथेनॉल निर्मितीसाठी आखलेल्या धोरणातून शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो, हे त्यांनी सन 2014 मध्ये उसाला प्रति टन 7000 रुपये दर कसा मिळू शकतो, याबाबज विस्तृत मार्गदर्शन केले होते. ते आजही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्याशी संपर्क साधून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारला इथेनॉल निर्मिती धोरण जाहीर करण्यास भाग पाडले. त्यांनी राम नाईक आणि उगार शुगरचे मालक राजाभाऊ शिरगावकर यांची भेट घडवून दिली. महाबळेश्वर येथे राम नाईक यांनी वेळ दिला आणि शिरगावकर यांना घेऊन या असे सांगितले. बाळासाहेब कुलकर्णी यांनी राजाभाऊ शिरगावकर यांना सोबत घेऊन महाबळेश्वर येथे गेले. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी राजाभाऊ शिरगावकर यांनी इथेनॉल पुरवण्याची जबाबदारी घेतली. पुढे इथेनॉल मिश्रणाचा मोठा शुभारंभ कार्यक्रम सांगली येथे पार पडला. यासाठी करण्यात आलेल्या पत्रव्यवहारापैकी काही पत्रे आज मी आपणासमोर दाखवत आहे.

इथेनॉल निर्मितीच्या इतिहास पाहिला तर बाळासाहेब कुलकर्णी, शामराव देसाई, तत्कालीन खासदार स्व. प्रकाशबापू पाटील यांचे योगदान फार मोठे आहे. त्या वेळी 2001 साली रिलायन्स कंपनीने उसाला प्रति टन 1700 रुपयांपेक्षा जास्त भाव देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी साखर कारखाना सुरू करण्यासाठी कंपनीने परवानगी मागितली होती. जर तो निर्णय झाला असता तर, आज उसाला किती भाव मिळाला असता, याचा विचार केला पाहिजे. आज सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणातून शेतकऱ्यांना उसाला प्रति टन पाच हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळू शकताे. बाळासाहेब कुलकर्णी यांच्या मतानुसार प्रति टन 7000 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळू शकतो.

ऊस उत्पादक शेतकरी बंधूंनो, आपल्या उसाला योग्य भाव मिळावा, असे वाटत असेल तर आता नव्या आंदोलनाची तयारी करावी लागेल. स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी देशातील शेती संबंधित धोरण ठेवले असते तर, आज सर्व प्रकारच्या शेतीच्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला असता. शेतकरी कर्जबाजारी राहिला नसता, त्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. शेतकरी देशाच्या आर्थिक प्रवाहातून बाहेर फेकला नसता. शेतकरी बंधूंनो, उसाला प्रति टन पाच हजार रुपयांपेक्षा जास्त भाव मिळू शकतो. फक्त आपण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दबाव गट निर्माण केला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!