krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton price hike : कापसाची दरवाढ जागतिक बाजारावर अवलंबून!

1 min read
Cotton price hike : सन 2021-22 च्या हंगामाच्या तुलनेत चालू (सन 2022-23) हंगामात देशांतर्गत बाजारपेठेतील कापसाच्या (Cotton) दरात (Price) 300 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा चढ-उतार दिसून येत आहे. सध्या जागतिक बाजारात रुईचे दर एक डाॅलर प्रति पाउंडच्या आसपास तर देशांतर्गत बाजारात सरकीचे (Cotton seed) दर 37 ते 38 रुपये प्रति किलाे आहे. रुपयाचे अवमूल्यन (Depreciation of rupee) झाल्याने भारतात सध्या कापसाला प्रति क्विंटल किमान 8,800 रुपये किंवा त्यापेक्षा थाेडा कमी-अधिक दर मिळत आहे. भारतीय शेतकऱ्यांना यावर्षी कापसाला किमान 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी अपेक्षा आहे. जागतिक बाजारातील दरातील चढ-उतार लक्षात घेता दर या पातळीवर पाेहाेचण्याची शक्यता सध्यातरी कमी आहे. जागतिक बाजारात रुईचे दर 1 डाॅलर 40 सेंट प्रति पाउंडच्या वर गेल्यास भारतीय बाजारातील कापसाचे दर ही पातळी गाठू शकते.

🌎 रुपयाच्या अवमूल्यनाचा फायदा
मागील हंगामात देशांतर्गत कापसाचे दर 11,000 ते 13,000 रुपये प्रति क्विंटलवर पाेहाेचले हाेते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे दर 1 डाॅलर 70 सेंट प्रति पाउंडपर्यंत वधारले हाेते व डाॅलरचे मूल्य 80 रुपये हाेते. त्यावेळी रुईचे दर 1 लाख रुपये प्रति खंडीवर (1 खंडी म्हणजे 356 किलो रुई) पाेहाेचले हाेते. चालू हंगामाच्या सुरुवातीला हे दर 1 डाॅलर 20 सेंट प्रति पाउंडवर स्थिरावत शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर) 98 सेंट प्रति पाउंडपर्यंत खाली आले. त्यातच डाॅलरचे मूल्य 82 रुपयांवर पाेहाेचले आहे. शिवाय, रुईचे दर 65,000 ते 67,000 रुपये प्रति खंडीवर आले असून, सरकीचे दर 40 रुपये प्रति किलाेवरून 37 ते 38 रुपये प्रति किलाेवर आले आहेत. रुपयाचे अवमूल्यन झाल्याने भारतीय बाजारात कापसाला 8,800 रुपये प्रति क्विंटल व त्यापेक्षा कमी-अधिक दर मिळत आहे. भारतीय शेतकऱ्यांना दरवाढीची (price hike) आशा असली तरी जागतिक बाजारात कापसाचे दर 1 डाॅलर 50 सेंट प्रति पाउंडपेक्षा अधिक झाल्यास कापसाला देशांतर्गत बाजारात 12,000 ते 13,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळू शकताे. जागतिक बाजारातील सध्याची परिस्थती लक्षात घेता दर या पातळीवर पाेहाेचण्याची शक्यता सध्यातरी कमी आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे देशांतर्गत बाजारात कापसाला 8,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळत आहे, अशी माहिती शेतकरी नेते व अभ्यासक श्री विजय जावंधिया यांनी दिली.

🌎 सन 1994 मधील दराची बराेबरी
सध्याचे अमेरिकेच्या वायदे बाजारातील कापसाचे दर सन 1994 च्या पातळीवर आहेत. सन 1994 मध्ये जागतिक बाजारात कापसाचे दर 1 डाॅलर 12 सेंट प्रति पाउंड हाेते. त्यावेळी भारतात कापसाला 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला हाेता. हा दर त्यावर्षीच्या एमएसपीपेक्षा अधिक हाेता. त्यावेळी 30 रुपयांचा एक डाॅलर हाेता. सध्या जागतिक बाजारातील रुईचे दर 1 डाॅलर प्रत पाउंड या पातळीवर आहे. मध्यंतरी हेच दर 90 सेंट प्रति पाउंडपर्यंत खाली आले हाेते. एका डाॅलरचे मूल्य मात्र 82 रुपये झाले आहे. त्यामुळे भारतात कापसाला प्रति क्विंटल 8,200 ते 8,700 रुपये दर मिळताे आहे. जर रुपयाचे अवमूल्यन झाले नसते तर भारतीय शेतकऱ्यांना कापसाला आज जाे दर मिळताे त्यापेक्षा कमी दर मिळला असताे, अशी माहिती विजय जावंधिया यांनी दिली.

🌎 आयात शुल्क, निर्यात सबसिडी व दर पाडण्यासाठी वापर
सध्या जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात कापसाचे प्रति क्विंटल दर 800 ते 1,100 रुपयांनी अधिक आहे. त्यामुळे कापसाची निर्यात (Cotton export) हाेणे शक्य नाही. कापसाची निर्यात केल्यास देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर वधारतील. त्यासाठी केंद्र सरकारने कापसाच्या निर्यातीला साखरेप्रमाणे सबसिडी (subsidy) देणे अत्यावश्यक आहे. कापसाची निर्यात झाली नाही तर देशात कापूस शिल्लक राहील. याच कापसाच्या शिल्लक साठ्याचा वापर देशांतर्गत कापसाचे भाव पाडण्यासाठी केला जाईल. ही स्थिती दरवर्षी उद्भवते. यातून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने कापूस निर्यातीत कायम सातत्य ठेवायला हवे. कापूस निर्यातीचा काेटा ठरवून द्यायला हवा. त्यामुळे जागतिक कापूस बाजारात भारताचे स्थान टिकून राहील व कालांतराने मजबूत हाेईल. केंद्र सरकारने रद्द केलेला कापसावरील 11 टक्के आयात शुल्क (import duty) पूर्ववत करणे आणि कापूस निर्यातीला प्राेत्साहन देणे आवश्यक आहे.

🌎 कापसाऐवजी रुईची ‘एमएसपी’ जाहीर करावी
केंद्र सरकार दरवर्षी कापसाची किमान आधारभूत किंमत (MSP – Minimum support price) जाहीर करते. जागतिक बाजारात कापसाचे दर रुईच्या दरावर ठरतात. त्यामुळे केंद्र सरकार कापसाऐवजी रुईची एमएसपी जाहीर करणे आवश्यक आहे. ही एमएसपी जागतिक बाजारातील रुईच्या दरापेक्षा किमान 50 टक्के अधिक असावी. त्यामुळे कापसाला चांगला दर मिळेल आणि बाजारातील दराबाबतची अनिश्चितता कमी हाेऊन कापूस उत्पादकांना दिलासा मिळेल.

🌎 कापसाच्या दराचा हिशेब
100 सेंट म्हणजे 1 डाॅलर. 2.2 पाउंड म्हणजे 1 किलाे. आजचा रुईचा दर 0.98 डाॅलर (98 सेंट). 82 रुपयांचा 1 डाॅलर प्रमाणे 1 किलाे रुईचा दर 177 रुपये हाेताे. 1 क्विंटल कापसापासून 35 किलाे रुई मिळते. त्यामुळे रुईचा दर 6,187 रुपये हाेताे. 1 क्विंटल कापसापासून 64 किलाे सरकी मिळत असून, सध्या सरकीचे दर 38 रुपये प्रतिकिलाे असल्याने हा 2,432 रुपये हाेताे. रुई व सरकीचे दर एकत्र केल्यास एक क्विंटल कापसाचा दर 8,619 रुपये हाेताे. एकंदरीत भारतातील कापसाचे दर जागतिक बाजारातील रुईच्या दरावर अवलंबून आहे. भारतीय शेतकऱ्यांना कापसाला प्रति क्विंटल किमान 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर हवा असल्यास त्यांना जागतिक बाजारातील रुईचे दर वाढण्याची किंवा केंद्र सरकारने सबसिडी देऊन कापूस निर्यातीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!