संत्रा, माेसंबी फळगळ : कारणे व उपाययाेजना
1 min read🟢 या केंद्राकडून काटोल व नरखेड तालुक्यातील सर्वसाधारण 10 शेतकऱ्यांना दत्तक घेवून आधुनिक संत्रा लागवडी व व्यवस्थापना संदर्भात विद्यापीठ शिफारशी प्रमाणे प्रोत्साहीत केले. वेळोवेळी त्यांच्या बागेतील निरीक्षणे नोंदविली.
🟢 या व्यतिरीक्त वरुड, मोर्शी व कळमेश्वर येथील काही प्रगतशील व विद्यापीठाची बऱ्याच अंशी तंत्रज्ञानाचा वापर करणारे व त्यांचा स्वतः अनुभव असणारे प्रयोगशील शेतकऱ्यांचा सुद्धा संत्रा व्यवस्थापन व फळगळ संदर्भात अभ्यास करण्यात आला.
🟢 यात शेतकऱ्याचे नाव व पत्ता, मातृवृक्ष (संत्रा-मोसंबी), झाडांचे वय व क्षेत्र, असलेला बहार (अंबिया-मृग), ओलीत व्यवस्थापन (ठिंबक, दांड, वाफे, आळे पद्धती), रासायनिक/सेंद्रिय, जमिनीचा प्रकार (मध्यम, भारी काळी,मध्यम काळी) आदी बाबी जाणून घेतल्या.
🟢 निवड केलेल्या बागेत या केंद्रावरील शास्त्रज्ञांनी वेळोवेळी जावून भेटी दिलेल्या आहेत व तसेच सद्यस्थिती सदर शेतकरी वापरत असलेली परंपरागत पद्धत, सुदृढ व निरोगी बागेचे व्यवस्थापन अधिक व गुणवत्ता उत्पादन क्षमता, परंपरागत व्यवस्थापन पद्धतीचे सदोष विद्यापीठाच्या शिफारशी व अत्यंत महत्वाचे म्हणजे वातावरणातील बदलानुसार करावयाचे फळगळ उपयोजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे.
🟢 सर्वसाधारणपणे जानेवारी अखेर ते फेब्रुवारी 2022 पर्यंत आंबिया बहाराची फुट (Flowering) झालेली होती. यावर्षी बहुतांश बागेत (70-80 टक्के) आंबिया बहाराची फुट झाली असून त्यानंतर अचानकपणे 22 मार्च 2022 पासून तापमानात एकदम वाढ झाल्याने (30-32 डिग्री सेल्सीअस वरून 42-46 डिग्री सेल्सीअसपर्यंत) अतिशय लहान आकाराची फळे गळण्याचे प्रमाण, उशिरा फुटलेल्या बागा व ताण संपल्यानंतर लगेच ओलीत करून झालेल्या फुलोरा (Bud/Formation) अवस्थेत झाडामध्ये झालेल्या शारीरिक बदल व संजिवकाचा असमतोलपणा यामुळे कमी अधिक प्रमाणात फळगळ (Physiological drop) झाल्याचे दिसून आले. त्यानंतरही मात्र चांगल्या संगोपन व शिफारशी सह खताच्या मात्रा दिलेल्या बागेत फळे टिकून राहण्याचे प्रमाण वाढले. त्यानंतर एप्रिल ते मे महिन्यात फळावर काळे डाग पडलेले (Infestations of Mites) त्याचप्रमाणे सायट्रस सायला व पाने पोखरणारी अळी याचा प्रादुर्भाव दिसून आला.
🟢 नियंत्रणासाठी उपाययाेजना
✳️ तापमान वाढ व उष्णते मुळे फळगळ होऊ नये म्हणून GA-1.5.ग्राम व युरिया-1 किलो 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. ( GA: जिब्रेलिक आम्ल)
✳️ संत्रा/मोसंबी फळ वाढीकरीता GA-1.5 ग्राम, 13:00:45-1 किलो, 00:52:34 300 ग्राम 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✳️ चिलेटेड स्वरुपातील सुक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण 20 ग्राम ते 30 ग्राम 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी तसेच 150 ग्राम MOP प्रति झाड मातीत ओलावा असताना द्यावा.
✳️ फळावरील डाग (Infestations of Mites) पडून गळत असल्यामुळे डायफेन्थ्रीयुरोन 50 डब्लूपी 20 ग्राम 10 लिटर पाण्यात फवारणी करावी.
✳️ शिल्लक राहिलेली नत्राची अर्धी मात्रा द्यावी.
✳️ सायट्रस सायला व पाने पोखरणारी अळी यांच्या व्यवस्थापनकरीता थायमीथोक्झाम 25 डब्लू जी 3 ग्राम किंवा डायमेथाएट 30 ईसी 17 मिली किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
✳️ या बागेत काही प्रमाणात डिंक्या (Phytopthora Spreading) प्रादुर्भाव आढळून आला. याकरिता डिंक्याग्रस्त भाग खरडून त्याठिकाणी फोसेटील एल किंवा रिडोमीलची पेस्ट लावावी. त्याचप्रमाणे फोसेटील एल 2.5 ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वर्षातून दोनदा मे आणि ऑक्टोबर महिन्यात बोर्डो पेस्ट लावावी. त्याचप्रमाणे टा्यकोडर्मा हरझियानियम, सुडोमोनास फ्लुरोसन्स, मायकोरायझा 100 ग्राम प्रत्येकी 1 किलो शेणखतात मिसळून झाडाच्या परिघात जमिनीतून द्यावा व आठ दिवसानंतर फेरस सल्फेट व झिंक सल्फेट 200 ग्राम झाडाच्या परिघात जमिनीतून द्यावे.
✳️ ओलीत करीत असताना झाडाच्या खोडाला पाणी लागू नये, याची काळजी घ्यायची.
✳️ झाडाच्या बुंध्यावर 2 फुटापर्यंत बोर्डोपेस्ट लावावा.
✳️ योग्य प्रमाणात वाटणी करून खताची मात्रा द्यावी. (900:300:300, N:P:K 1953 ग्राम युरिया, 1875 ग्राम एसएसपी, 498 ग्राम एमओपी, 250 ग्राम झिंक सल्फेट, 250 ग्राम फेरस सल्फेट, 250 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट, 50 ग्राम बाेराॅन पाच भागात समप्रमाणात मिसळून जमिनीतून मिसळून द्यावे.
🟢 सद्यस्थितीतील प्रादुर्भाव व निरीक्षणे
मागील दोन वर्षीच्या तुलनेत यावर्षी ब्राऊन रॉट व फायटोप्थोरा चा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे. अतिशय उष्ण तापमान व पाण्याच्या कमतरतेमुळे झाडातील बदल व झालेला संजीवकाचा असमतोलपणा यामुळे एप्रिल-मे महिन्यात फळगळ मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. आजपर्यंत या विभागात 1,270 मिमी पाऊस झाला असून, हा सरासरीपेक्षा 30 ते 35 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मागील एक महिन्यापासून वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसाच्या सततच्या पावसामुळे जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण अतिशय जास्त असल्यामुळे मुळांची क्रियाशीलता कमी होवून सद्यस्थितीत वाढीस व पोसणीच्या अवस्थेत असलेल्या फळांना फवारणीद्वारे कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांची मात्रा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
🟢 खतांची मात्रा
✳️ झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरॉन, मॉलीब्डेनम, युरिया, चुन्याच्या निवळीचे पाणी आणि GA3+ 13:00:45, 00:52:34, युरिया, कार्बनड्याझिम 0.1 टक्के (फळे लहान असल्यास) तसेच शेतात उताराला समांतर चर खोदून पाणी काढण्याचे नियोजन करावे.
✳️ सततच्या वातावरणातील आर्द्रतेमुळे झाडांवर व फळांवर कोलेट्रोटिकम अल्टरनरीया व डिप्लोडीयम, फायटोप्थोरा या बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याकरिता योग्य बुरशीनाशकाचा जसे थायफोनेट मिथाईल 0.1 टक्के किंवा व मॅकोझेब किंवा मेटालक्झील 0.2 टक्के याची फवारणी करावी. संभाव्य ब्राऊन रॉट करिता एलीएट व रिडोमील 0.2 टक्के या बुरशीनाशकाची फवारणी किंवा ड्रेचिंग करावे.
✳️ फळमाशीचा व सायट्रस सिला व काळी माशी चा प्रादुर्भाव दिसून आला. यावर्षी सायट्रस ग्रिनिंग, इंडरबेलाचा (साल पोखरणारी अळी), फळातील रस शोषणारा पतंग यांचा प्रादुर्भाव हाेऊ शकतो. विशेषतः सायट्रस ग्रिनिंग मोसंबीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
🟢 शेतकऱ्यांचे अनुभव व शास्त्रज्ञांचे मत
✳️ जमिनीचे कर्बाचे प्रमाणे वाढविणे याकरिता सेंद्रिय खताचा वापर करणे.
✳️ झाडाची सुदृढ व निरोगी वाढ होण्याकरिता पांढऱ्या पेशीच्या मुळांची संख्या वाढविण्याकरिता जैविक खतांचा वापर करणे. जसे- अझोस्पायारीलीयम, ट्रायकोडरमा हरझीयानियम, सुडोमोनास, मायाकोरायझा.
✳️ वातावरणातील वेळोवेळी होणारे बदल व त्यानुसार खते व सुक्ष्म अन्नद्रव्ये खतांचा वापर करणे.
✳️ वातावरणातील वेळोवेळी होणारे बदल व त्यामुळे झाडाच्या शरिररचनेत होणारा बदल व संजीवकाचा असमतोलपणा व त्यानुसार ओलीत व खते व्यवस्थापन करणे.
✳️ जातीवंत व गुणवत्ता प्रत असलेली कलमे तयार करणे व त्यासाठी लागणारा शिफारसी खुंटाची व त्या मातृवृक्ष संख्या वाढविणे.
✳️ फळे वाढीस व पोसणीच्या अवस्थेच्या असतांना अन्नद्रव्याची व पाण्याचे प्रमाण कमी/अधिक असू नये.
✳️ निर्यातक्षम व फळांच्या गुणवत्तेसाठी झाडांची छाटणी करणे.
✳️ अधिक व भरपूर उत्पादकतेसाठी विद्यापीठांनी शिफारशी केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करावा.
✳️ खासगी रोपवाटिकेची वेळोवेळी तपासणी करून मातृवृक्ष झाडांचा स्त्रोत (दोन्हीही खुंट व संत्रा/मोसंबी मातृवृक्ष) पाहणे.
✳️ या पिकासाठी जमिनीची निवड (अतिशय भारी व चुनखडी युक्त नसलेली) करणे.
✳️ या विभागात संत्रा उत्पादक संघ तयार करून त्या माध्यमातून मागणी, बाजारपेठ येथे विक्री करावी.
✳️ दक्षिण भारताप्रमाणे शीतगृहे तयार करून कंत्राटी पद्धतीने अथवा भाडे तत्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत.
✳️ संत्रा प्रक्रिया युनिट/उद्योग सुरू व्हावेत. जेणेकरुन कमी दर्जाच्या फळांना भाव मिळेल व वर्षभर प्रक्रियायुक्त पदार्थ उपलब्ध होईल.
✳️ या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होईल.
🟢 पहिली फळगळ
फुले उमलल्यानंतर पराग कणाच्या कमतरतेमुळे, पोषणाच्या अभावामुळे फुले व छोटी फळे गळून पडतात. (Physiological Drop) व पर्यावरणाच्या ताणामुळे देठासहित (पेहनकल) गळून पडतात. कालावधी – फेब्रुवारी-मार्च. अंदाजे 92 ते 96 टक्क्यांपर्यंत फळगळ.
🟢 फुले उमलल्यानंतर दीड ते दोन महिने कालावधीतील गारगोटी किंवा त्यापेक्षा मोठी विकसनशील फळे गळून पडतात आणि याच कालावधीत एप्रील-मे महिन्यात अचानक तापमानात झालेल्या वाढीमुळे (42 डिग्री सेल्सीअस ते 46 डिग्री सेल्सीअस) झाडाच्या शरीरातील बदल, पाण्याची कमतरता, पोषक अन्नद्रव्ये कमतरता, संजीवकाचा असमतोलपणा यामुळे देठाजवळ हलकी फुगीर रिंग तयार होवून चक्रीतून देठाशिवाय फळगळ झाली आणि याच फळगळीचा संत्रा उत्पादकांचे अधिक नुकसान झाले आहे.
🟢 सध्यास्थितीत मागील काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या व झालेल्या अतरिक्त पावसामुळे जमिनीत पाणी साचून असल्याने तसेच वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा व किडी मध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे रस शोषण करणाऱ्या पतंगचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या स्थितित फळे पिवळी पडणे, कार्बन-नत्राचे असंतुलन, अन्नद्रव्याची कमतरता, अतिशय ओलावा, मुळांची अक्रियाशीलता ही सर्व चिन्हे दिसून येत आहेत. ही सर्व लक्षणे ऑगस्टपासून सुरू होत असून, ही फळगळ आर्थिक नुकसान करते. पावसाचा प्रभाव असाच सुरू राहिला तर पुढील महिन्यात फळाची गळ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिफारसीप्रमाणे उपाययोजना कराव्या.
🟢 अंबिया व मृग बहार फुटण्यावेळीची परिस्थिती
अंबिया बहार फुटण्याचा सर्व साधारण कालावधी हा 25 डिसेंबर ते 20 जानेवारी हा आहे. यावर्षी थंडीचा कालावधी हा साधारणत: वेळेपेक्षा 15 ते 20 दिवसांनी वाढला आणि तापमान सुद्धा 7 ते 8 दिवस 10 अंश सेल्शियसच्या खाली नोंदविल्या गेले. त्यामुळे संत्रा झाडे ही सुप्तावस्थेत गेली. फुले येण्याचा कालावधी सुद्धा 15 ते 20 दिवसांनी पुढे गेला. याचा परिणाम फळधारणेवर झाला. सर्वसाधारणपणे 10 ते 15 फेब्रुवारीपर्यंत फळ मुगाच्या आकाराची होणे आवश्यक असते. जेणेकरून 25 फेब्रुवारीनंतर वाढणारे उष्णतामान ही फळे सहन करू शकेल. यावर्षी फुले येण्याचा कालावधीच 15 फेब्रुवारीपर्यंत लांबल्याने उन्हामुळे प्रथमता फुलाची प्रचंड गळ झाली आणि त्यामुळे सुरवातीलाच फळधारणा कमी झाली. ज्या शेतकऱ्यांनी तापमान कमी करण्यासाठी वेळीच उपाययोजना केली, तिथे फळधारणा चांगली दिसून आली.
🟢 संभाव्य फळगळ
✳️ यावर्षीचा पर्जन्यमान सरसरीपेक्षा 30 ते 35 टक्के जास्त झाला. 10 ऑगस्ट अखेर पावसाची 1,122 मिमी नोंद करण्यात आली. 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत एक ते दोन दिवसाचा खंड वगळता पावसाची संततधार सुरू हाेती. वातावरणात जास्त प्रमाणात आर्द्रता असल्याने तसेच किडी व रोगाला पोषक वातावरण तयार झाल्याने आगामी पुढील तीन महिन्यात रोग व किडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये रस शोषण करणारा पतंग आणि फळ माशी या दोन किडी पुढील फळगळसाठी प्रामुख्याने करणीभूत ठरणार आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययाेजना करणे गरजेचे आहे.
✳️ सतत पाऊस सुरू असल्यामुळे बऱ्याचशा शेतात पाणी साचून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उपाययाेजना करणे शक्य हाेत नाही.
✳️ ज्या शेतात कापूस, तूर यासारखी पिके आहेत, त्या शेतात पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही. अशा परिस्थितीत phytophthora आणि डिंक्यासारखे रोग ऑक्टोबर आणि नोव्हेबरमध्ये येण्याची शक्यता आहे.
✳️ घन पद्धतीने लागवड केलेल्या संचा बागांची दरवर्षी नियमित छाटणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आगामी काळात असाच पाऊस सुरू राहला तर अशा बागेत सूर्यप्रकाश व हवेची कमतरता होऊन आर्द्रता वाढेल आणि किडी आणि रोगाला पोषक वातावरण निर्माण होईल.