पावसाचे नैसर्गिक संकेत…
1 min read🌧️ पावसाळ्याच्या सुरुवातीला पूर्व किंवा पश्चिम दिशेला आकाशात सौम्य मेघगर्जना होत असताना चातक, बेडूक, मोर तसेच पावश्या पक्षाचे आवाज ऎकू येऊ लागले म्हणजे त्यावर्षी चांगला पाऊस पडेल असे समजावे.
🌧️ सकाळच्या वेळी जर घोरपडी बिळाबाहेर येऊन तोंड काढून बसलेल्या दिसल्या तर एक दोन दिवसात पाऊस येणार असे समजावे.
🌧️ मुंग्यांच्या सतत धावणाऱ्या रांगा विरळ झाल्या, दिसेनाश्या झाल्या की, मृगाचा पाऊस चारपाच दिवसात पडणार असे समजावे.
🌧️ सरड्यांच्या डोक्यांचा रंग तांबडा झाला की, आठवडाभरात पाऊस येणार असे समजावे.
🌧️ पंख असलेल्या उधळीचे थवे वारुळातून किंवा मातीच्या भिंतीतून संध्याकाळी बाहेर पडताना आणि घराभोवती ऊडताना दिसले की, मृग नक्षत्राचा पाऊस चार दिवसांवर आला आहे असे समजावे.
🌧️ सूर्योदय व सुर्यास्ताच्यावेळी क्षितिजावर काळ्याभोर ढगावर तांबूस छटा दिसल्या आणि काळ्या ढगांच्या कडावर रुपेरी चमक दिसली की, पाऊस जवळ आला असे समजावे.
🌧️ कावळ्यांनी काटक्या, धागे जमवून घरटी बांधण्याची धांदल सुरू केली की, पंधरवड्यात पावसाला सुरुवात होणार असे समजावे.
🌧️ रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्रात पश्चिम क्षितिजावर ढग गर्जना न करता गुरगुराट करताना आढळले की, हंगामभर उत्तम पाऊस पडणार असे समजावे.
🌧️ हस्त नक्षत्रातील लोह चरणीतील जमीन कठीण करतो व पिकाच्या मुळामध्ये अपायकारक रोग निर्माण करतो.
🌧️ कृतिका व रोहिणी नक्षत्रात कमळाची फुले असलेल्या तळ्यात किंवा सरोवरात वघ्य पक्षात रात्री नक्षत्रे व तारे यांचे सुस्पष्ट प्रतिबिंब दिसले तर मृग ते चित्रा या सर्व नक्षत्रात चांगला पाऊस संभवतो.
🌧️ स्वाती नक्षत्रातील पाऊस खळ्यातील धान्याचा नाश करतो तर समुद्रावर पडणारा पाऊस मोती निर्माण करतो असे म्हणतात.
🌧️ पूर्व दिशेकडून सरकत येणाऱ्या ढगांनी आकाश व्यापून पर्जन्यवृष्टी झाल्यास धान्याची समृद्धी होते.
🌧️ आग्रेयकडून ढग जमा झाल्यास ते वांझ असल्याने पाऊस पडत नाही.
🌧️ दक्षिणेकडून कार्तिक व मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षात ढग येऊन थोडी जरी वृष्टी झाली तरीही धान्याची नासाडी होते.
🌧️ नैॠतेकडून फळीधरून येणाऱ्या ढगांची वृष्टी कृमी, कीटक तसेच वनस्पतीचे रोग वाढविते. याऊलट पश्चिम, उत्तर व ईशान्य या दिशांनी येणारे ढग व त्यामुळे होणारा पाऊस सुबत्ता आणतो, असे जाणकार सांगतात.
🌧️ रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर अनेक काजवे चमकताना दिसले की, चार पाच दिवसात पाऊस पाडणार असे समजावे.
🌧️ ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येपासून ते आषाढी एकादशीपर्यंत कोकिळेचा आवाज ऐकू आला नाही तर सर्वत्र चांगला पाऊस होतो. मात्र, कोकिळेचा आवाज अगर गुंजन बंद झाले नाही, तर अवर्षणाची शक्यता संभावते.