कपाशीला गुलाबी बोंडअळीपासून वाचवेल ‘पीबी नॉट’
1 min read
कापूस दरातील तेजी मात्र देशातील कापड उद्योजकांना अस्वस्थ करीत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये कापसाच्या दराने पति क्विंटल 7,000 रुपयांचा आकडा ओलांडताच साऊथ इंडिया मिल्स असोसिएशन (SIMA ) आणि तिरुपूर एक्स्पोर्ट असोसिएशन (TEA)ने खुल्या बाजारात दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबावतंत्राचा अवलंब सुरू केला आहे. सरकारने दर वाढीवर नियंत्रण करण्यासाठी हस्तक्षेप करून दर स्थिर करावे, या मागणीसाठी सर्व स्थरावर प्रयत्न केला. परंतु, सरकारचे हात नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी आंदोलनामुळे अगोदरच पोळले असल्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित भाववाढीमध्ये दखल न घेण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. हे लक्षात येताच दक्षिण भारतातील याच लॉबीने या महिन्यात युनिट बंद ठेवून एक प्रकारे आंदोलनाचा इशाराच दिला आहे. भाव नियंत्रण एवढयासाठीच की, त्यांना कल्पना आहे की, जागतिक बाजारात देखील कापसाचे भाव कमी उत्पादनामुळे वाढत आहेत. तेव्हा आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले तरी, कापूस दरात फारसा फरक पडणार नाही, हे उद्योजक जाणत आहेत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर देशातील कापूस दरापेक्षा जास्त आहेत. केंद्र सरकारच्या भूमिका स्पष्ट होताच कापूस दरातील तेजी कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
देशाअंतर्गत मागणी आणि पुरवठा याचा विचार आता कापूस शेतकरी देखील करतो आणि म्हणूनच शेतकरी अद्याप आपला सर्व माल बाजारात आणत नाही. त्याला आणखी तेजीची अपेक्षा आहे. गेल्या हंगामात झालेल्या अतिवृष्टी, संततधार पाऊस, पूरग्रस्त परिस्थिती यामुळे कापसाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला. कापूस प्राथमिक बोंड अवस्थेत असतांना ‘बोंड सड’ या रोगामुळे पहिला वेचा 30-40 टक्क्यांनी कमी झाला. त्यातच साधारण 100 दिवसानंतर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसून आला व त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या वेच्याचे 25-30 टक्के नुकसान झाले. उत्पादनात कमालीची घट झाली त्यामुळे या आपत्तीतही कापसाला मिळत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना यावर्षी दिलासा मिळाला आहे. कोरडवाहू शेतीमध्ये यंदा एकरी सरासरी 4 ते 4.50 क्विंटल उत्पादन होईल, असा अंदाज महाराष्ट्रात कृषी विभागने वर्तविला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना एकरामागे 40,000 ते 45,000 रुपये पदरी पडतील, अशी अपेक्षा आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव पूर्वी महाराष्ट्र, गुजरात व तेलंगणा या राज्यापुरता मर्यादित होता. परंतु, यावर्षी प्रथमच या किडीने भारतातील सर्व भागात पेरलेल्या कापसावर थैमान घातले आहे. यंदा देशात 360 लाख गाठी उत्पादन होईल, हा प्राथमिक अंदाज मोडीत काढून व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांनी नव्या अंदाजानुसार कापूस उत्पादन हे 340 लाख गाठीवर स्थिरावेल असे भाकीत केले आहे. परंतु, हाही अंदाज आहे कारण अजूनही बराच साठा शेतकरी आणि काही व्यापारी यांनी बाजारात आणला नाही.
देशातले कापसाचे उत्पादन 10 टक्के घटले आणि कापसाची मागणी 10 टक्क्यांनी वाढली तर कापसाचे दर तेजीतच राहणार आहे. गुलाबी बोंडअळी आता कापसावर सर्वच भागात नुकसान करीत आहे. पंजाब सरकारने जवळ जवळ 500 कोटी रुपयांचे अनुदान कापूस उत्पादकांना केवळ गुलाबी बोंडअळी मुळे झालेल्या नुकसानीसाठी दिले आहे. हरियाणातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता शेतकरी या बोंडअळीला प्रतिबंधक असलेले वाण आणण्याची मागणी करीत आहेत. अशा प्रकारचे जनुकीय तंत्रज्ञानाने विकसीत केलेली वाणे जगात उपलब्ध आहेत. परंतु, जी.एम. तंत्रज्ञानावर सरकारने जवळजवळ बंदी घातलेली आहे. त्यामुळे दुसरा पर्यावरण पूरक असा एखादा उपाय असु शकतो काय, याचा अभ्यास केला गेला. साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर (एसएबीसी), जोधपूर आणि आंग्ल ऍग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर यांच्या सहकार्याने अशा एका तंत्रज्ञानाची चाचणी गेल्या हंगामात घेतली. त्याचे निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत आणि ते अत्यंत प्रोत्साहित करणारे आहेत. त्याचा थोडक्यात वृत्तांत नवीनतम तंत्रज्ञान म्हणून शेतकऱ्यांच्या माहितीस्तव देत आहे.
2021 यावर्षी खरीप हंगामामध्ये गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी एक भव्य परंतु नाविन्यपूर्ण प्रयोग घेतला गेला. साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर (एसएबीसी),जोधपूरच्या वतीने आणि ऍग्रोव्हिजन फाउंडेशन नागपूर यांच्या सहकार्याने आणि कापूस संशोधन संस्था नागपूरच्या मार्गदर्शनासाठी गुलाबी बोंडअळीपासून कपाशीचा बचाव करण्यासाठी देशातील सर्वात मोठा क्षेत्रीय प्रयोग (प्रोजेक्ट बंधन) नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातल्या वरोडा व आदासा आणि काटोल तालुक्यातील मेटपांजरा येथे करण्यात आला. परिसरातील 300 एकरात 180 शेतकऱ्यांनी लावलेल्या शेतातील कपाशीवर नाविन्यपूर्ण ‘कीड संभोग विघटन’ तंत्राचा वापर करून कपाशीच्या झाडांचे बोंडअळीपासून संरक्षण व्हावे यासाठी ‘रक्षाबंधन’ करण्यात आले. ‘पीबीनॉट’ हे तंत्रज्ञान गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी खूप उपयुक्त तंत्रज्ञान आहे. परंतु, त्याची माहिती अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. या नूतन प्रयोगासाठी गावातील अनेक शेतकरी एकत्र आले तसेच कापूस शास्त्रज्ञ, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्राचे विस्तार अधिकाऱ्यांचा सहभाग घेतला गेला.
‘पीबी नॉट’ हे एक नाविण्यपूर्ण ‘किड संभोग विघटन’ तंत्रज्ञान आहे, जे अल्युमिनियम तार युक्त पॉलिथिलीन ट्युब आहे. ज्यामध्ये गोसीप्लुअर कामबंध सक्रिय घटकाच्या रुपामध्ये आहे. त्यालाच ‘पीबी नॉट’ असे म्हणतात. ‘पीबी नॉट’ कापसामध्ये गुलाबी बोंडअळीच्या संक्रमण व्यवस्थापनासाठी अतिशय परिणामकारक आहे. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रलयाच्या सीआयबी आरसीने या तंत्रज्ञानाला मान्यता दिली आहे. या तंत्रज्ञानाला कृषी विद्यापीठामध्ये झालेल्या प्रात्यक्षिकाच्या आधारावर मान्यता देण्यात आली आहे. हे तंत्र वापरायला सोपे आणि मित्र कीटकांची सुरक्षा करणारे आणि पर्यावरणपूरक आहे. ‘पीबी नॉट’च्या जाळीला असलेला फेरोमेन सुगंध आसपासच्या वातावरणात पसरतो. तो सुगंध बोंडअळीच्या नराला उत्तेजन देतो. मादीच्या शोधात आलेल्या नराची त्यामुळे दिशाभूल होते आणि संभोग करण्यापासून ‘पीबी नॉट’ त्याला प्रतिबंध करतो. त्यामुळे अंडी घालण्याची प्रक्रिया मंदावते आणि गुलाबी बोंडअळीची भविष्यात संख्या नियंत्रणात आणता येते. हा दोरा (तारयुक्त) कापसाच्या रोपाला सहजरित्या बांधता येतो. झाडाला फुले येण्याच्या व बोंड तयार होईपर्यंतच्या महत्वपूर्ण अशा 90 दिवसांच्या काळात ‘पीबी नॉट’ कापूस झाडांचे संरक्षण करते. त्यामुळे बोंडांचे नुकसान होत नाही. कापसाची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन वाढते. एकूण 300 एकरावर केलेल्या प्रात्यक्षिकाचे निष्कर्ष आता हाती आले आहेत. त्यावरून हे सिद्ध होते की गुलाबी बोंडअळीपासून वाचवू शकेल.