देवर्जनच्या नारायण खरात यांचा वळू ‘ॲग्रोव्हिजन’मध्ये सर्वोत्कृष्ट
1 min read‘मराठवाडा भूषण’ देवणी गाय-वळू
अत्यंत देखणा असलेला देवणी गाय व वळू विविध स्तरांवरील प्रदर्शनांमध्ये मानांकन सिद्ध करणारा ठरला आहे. देवणी गाय-वळूला ‘मराठवाडा भूषण’ अशी बिरुदावली प्राप्त झाली आहे. सुमारे 225 वर्षांपूर्वी डांगी व गीर गायीच्या संकरामधून मराठवाड्यात ‘देवणी’ गाय उदयास आली. लातूर जिल्ह्यातील उदगीर, चाकूर, शिरूर, अनंतपाळ, हरंगूळ, देवणी, निलंगा, अहमदपूर येथे माेठ्या तर उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात काही प्रमाणात देवणी गाय व वळूची पैदास आणि संगाेपन करणारे शेतकरी आहेत.
देवणी गाय-वळूची शारीरिक ठेवण मध्यम आकार व आटोपशीर बांध्याची असते. या गाय-वळूचा मूळ रंग पांढरा व त्यावर काळ्या रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके असतात. त्वचा मऊ, चमकदार व विलक्षण देखणी असते. कपाळाची ठेवण भरदार व नजरेत भरणारी, शिंगे काळे व मागाहून बाहेरच्या बाजूस येणारी बाकदार व दंडगोलाकृती असतात. डोळे लांबट व अंडाकृती, पापण्या संपूर्णपणे काळ्या असतात.
बैलांच्या नजरेत जरब असते व त्यांना कायम रोखून बघण्याची सवय असते. कान मध्यभागी पसरट, टोकाला गोलाकार व मागे पडलेले असतात. नाकपुडी काळी पसरट व मध्यभागी फुगीर, वशिंड पिळदार घट्ट व शरीराच्या एका बाजूस थोडे झुकलेले असते. मानेखालची लोळी शरीराला शोभेल अशी असते. मान लांब व रुंद असते. बैल लांब पौंडी असतात. मागचे पाय शरीराच्या मानाने किंचित उंच व मांड्या पुष्टदार असतात. पाठ मागच्या बाजूने वशिंडाकडे किंचीत उतरती असते. त्यामुळे त्यांना देखणेपणा येते. खूर संपूर्णत: काळे, एकमेकांशी सलग व भक्कम असतात. हे बैल कमी उगाळतात/उधळतात. शेपूट मागच्या ढोपरापर्यंत येत असून, शेपटीचा गोंडा काळा किंवा पांढरा झुपकेदार असतो.
गाईमध्ये कास कासंडीसारखी गोलकार व शरीराबाहेर जास्त न येणारी असते, चारही सड (स्तन) गोलाकार व बहुतांशी काळ्या रंगाचे असतात. या गाईची उभे राहण्याची पद्धत विलक्षण ऐटबाज असते. देवणी गाय व वळू शांत व सुस्वभावी असते. शेतकरी ज्या बैलांचा चेहरा संपूर्णत: काळा असताे त्याला ‘काळतोंड्या’ आणि ज्याच्या चेहऱ्यावर काळा-पांढरा मिश्र रंग असताे त्याला ‘वानरतोंड्या’ म्हणून संबाेधतात.
देवणी जातीच्या बैलांना निसर्गाने मराठवाड्यातील तीव्र उन्हामध्ये काम करण्याची प्रचंड शक्ती प्रदान केली आहे. तीन वर्षे पूर्ण झालेली खोंडे शेतीच्या हलक्या कामासाठी वापरण्यास सुरुवात केली जाते. खोंड संपूर्णत: दाती जुळला की, त्याचे खच्चीकरण केले जाते. या जातीचे बैल अथवा गाई क्वचितच मारके निघतात. असा हा अत्यंत देखणा ‘देवणी’ वळू आणि देखणी गाय लक्ष वेधून घेते.
अतिशय सुंदर वर्णन..बारकावे छान टिपले.आता बैलजोड्या राहिल्या नाहीत.ट्रॕक्टर आणि यंत्रे आली.पोळाही ट्रॕक्टरचा भरु लागला.अशा काळात बैलावर पोटच्या मुलाची माया लावणारे विरळेच. देवणी वळूची माहिती ज्ञानात भर घालणारी….