krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Tree & Gyrinol : झाडे ताेडताना सावधान, ‘गायरिनॉल’मुळे गंधज्ञान गमावाल!

1 min read

Tree & Gyrinol : सन 2017 मधील ही घटना आहे. अडेगाव, ता. देवळी, जिल्हा वर्धा येथील दीपक खंडाळे व सुनील कांबळे या दाेघांनी अडेगावच्या शिवारात असलेले हिवराचे झाड (Tree) ताेडले. झाड ताेडत असताना त्यांना उग्र वास आला खरा, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी त्या दाेघांनाही सुगंध अथवा दुर्गंध येत नसल्याचे दाेघांच्या लक्षात आले. त्यामुळे दाेघेही वर्धेतील डाॅक्टरांकडे गेले. डाॅक्टरांनी त्यांच्यावर औषधाेपचार केले. पण उपयाेग झाला नाही. हे नेमके कशामुळे घडले, ते डाॅक्टर अथवा अन्य कुणीही त्यांना आजवर सांगितले नाही. दुर्गंधी साेडणाऱ्या हिवराला स्थानिक नागरिक ‘हागऱ्या हिवर’ संबाेधतात.

झाडे स्वरक्षणार्थ साेडतात दुर्गंधी
फळबाग शास्त्रज्ञ प्रा. डाॅ. योगेश पावशे यांनी या प्रकारासंदर्भात रंजक व वैज्ञानिक माहिती दिली. गायरिनॉप्स वर्सटीगी (Gyrinops versteegii) किंवा स्टिंकवूड ट्री (Stinkwood Tree) अथवा गायरिनाॅप्स ट्री (Gyrinops Tree) वर्गातील झाडे ताेडल्यास अथवा त्या झाडांच्या खाेडांना जखम झाल्यास ती झाडे त्यांच्या रक्षणार्थ दुर्गंधी साेडतात. या उग्र दुर्गंधीमुळे माणसांचे गंधज्ञान (Sense of smell) कायमचे हरपण्याची शक्यता असते, अशी माहिती प्रा. डाॅ. याेगेश पावशे यांनी दिली.

हागऱ्या हिवर
अडेगाव येथील नागरिक ज्याला हागऱ्या हिवर संबाेधतात, ते झाड गायरिनॉप्स (Gyrinops) असेल तर त्याला ‘अगरवूड’मध्ये परावर्तित करण्यास संशोधक कृत्रिमरीत्या फुजारीअम (Fusarium) या रोगकारक बुरशी(Fungus)द्वारे संक्रमित करतात. या बुरशीचा प्रतिकार करण्यास त्या झाडात दुर्गंध देणारे संयुग तयार झाल्यावर हे टिकाऊ, गडद आणि आकर्षक ग्रेन्स असणारे लाकूड अधिक मौल्यवान होते. नैसर्गिकरीत्या संसर्गामुळे बाधित झालेली अशा प्रकारची काही झाडे जंगलात असतात. एखाद वेळी अशा झाडांची लाकडं घरी चुलीत जळताना तीव्र दुर्गंधी येते, याचा अनुभव ग्रामीण भागातील अनेकांना आला असल्याचे वृद्ध मंडळींनी सांगितले.

सुगंधी द्रव्ये
काही झाडे जखमी झाल्यावर किंवा रोगाने संक्रमित झाल्यावर त्यांच्या शरीरात सुगंधी द्रव्ये तयार करतात. अगर किंवा अगरू (Aquilaria melacensis) नावाचे झाड ज्याला देवाचे लाकूड म्हणून हजारो वर्षांपासून ओळखले जाते. संसर्गापूर्वी या झाडाचे हार्डवूड फिक्कट, गंधहिन आणि निरुपयोगी असते. पण यावर काही कारणाने जखमा झाल्यास किंवा रोगाचे संक्रमण झाल्यास या झाडांमध्ये स्वरक्षणार्थ एक स्त्राव (राळ/रेझिंस-Resins/फिनोलिक्स-Phenolics) तयार होतो. त्याला अगरवूड म्हणतात. बाह्य संक्रमणामुळे सुगंधी द्रव्य तयार झालेला हा भाग जेव्हा जाळल्या जातो, तेव्हा उच्च प्रतीचा सुगंध वातावरणात सोडल्या जातो. पुरातन काळापासून अशा वनस्पतींच्या काटक्यांना समिधा म्हणून होमहवनात वापरण्यात आले आहे. अशा झाडांपासून पुढे अगरबत्ती, उद, उदबत्ती, धूप किंवा धूपबत्ती तयार करण्यात आले. अगरबत्ती, उदबत्ती किंवा धूपबत्तीच्या वासाच्या ॲलर्जीमुळे काही नागरिकांचे गंधज्ञान कायमचे हरपते, असेही प्रा. डाॅ. याेगेश पावशे यांनी सांगितले.

काय आहे गायरिनाॅल?
आग्नेय आशियातील उष्ण कटिबंधीय जंगलात मूळ असलेल्या या झाडांमध्ये गायरिनाॅल (Gyrinol) नावाचे रासायनिक संयुग (Chemical compound) आढळते. जे त्यांच्यातील तीव्र दुर्गंधीला जबाबदार असते. निराेगी असताना त्या झाडांच्या खाेडांचा मुळीच वास येत नाही. झाडाच्या खाेड अथवा मुळांना इजा किंचा जखमा हाेताच त्यांच्यातील गायरिनाॅल हाेते आणि दुर्गंधी येते. कृमी, किडी, बुरशीजन्य राेग खाेड अथवा मुळांना इजा करण्यास कारणीभूत ठरू शकतात किंवा झाडाच्या अशक्त वाढीमुळे त्या भागात संरक्षक यंत्रणा (Defense Mechanism) सक्रिय होऊन गायरीनॉल तयार होते.

घ्राणेंद्रियांच्या मज्जातंतूंना नुकसान
गायरिनाॅल हे संयुग राळसदृश असते. याला रेझिन किंवा फिनोलिक्स असेही म्हणतात. गायरिनॉलला सडलेले मांस, सडके अंडे, नासलेले मासे, गटरांमधील दुर्गंधीयुक्त पाणी किंवा सल्फरसारखा उग्र वास असतो. या तीव्र दुर्गंधीच्या संपर्कात अधिक काळ आल्यास डोळे, नाक व घशाला जळजळ होणे, मळमळ वाटणे, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. या उग्र वासाचा माणसांच्या घ्राणेंद्रियांच्या मज्जातंतूला (Olfactory nerves) नुकसान हाेत असल्याने माणसं त्यांच्या वासाची संवेदना काही काळासाठी किंवा कायमचे गमावतात, असेही प्रा. डाॅ. याेगेश पावशे यांनी सांगितले. दीपक खंडाळे व सुनील कांबळे या दाेघांसाेबत नेमके हेच घडले आहे. त्यामुळे या दाेघांनी त्यांचे गंधज्ञान कायमचे गमावले आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!