krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmer suicide : शेतकरी आत्महत्येच्या प्रदेशात

1 min read

Farmer suicide : वर्धा जिल्ह्यातील अभ्यासू कार्यकर्ते दिनेश शर्मा सांगत होते की, वाठाेडा शुक्लेश्वर येथील सिलिंगची जमीन गेल्यावर तालुक्याच्या गावी मेडिकल स्टोअर टाकले.पण ती सिलिंगची जमीन ज्या कुटुंबांना गेली त्यातील दोघांनी आत्महत्या (suicide) केली आणि शेतीमालकाला मेडिकल दुकानात भरपूर फायदा झाला. शेती हे मरणाचे कारण कसे बनते आहे? हे सांगायला हे उदाहरण पुरेसे आहे.

यवतमाळ जिल्ह्यात बोडबोधन गावात 24 आत्महत्या झाल्यात. तिरझडा या 1,500 लोकसंख्येच्या गावात एकूण 26 शेतकऱ्यांनी (Farmer) आत्महत्या केल्या. 21 आत्महत्या झालेल्या सुकळी. या तीनही गावांना भेट दिली, तेव्हा तरुण मुलांशी बोलता आले. सर्वांवर कर्ज असल्यानेच आत्महत्या केलेल्या होत्या. गावातील प्रमुख तरुण एका मंदिरात जमले. त्यांना आत्महत्या का होत असतील? याचे कारण विचारले. तेव्हा आत्मप्रतिष्ठा जपणे शेतकरी जास्त महत्त्वाचे मानतो. त्याला कर्जात राहणे दिनवाणे जगणे नकोसे वाटते, असे एकूण सर्वांच्या बोलण्याचे सूत्र होते. पूर्वी चांगले जीवन जगलेल्या शेतकर्‍याला असे उधारीवर जगणे नकोसे वाटते. त्याचा आत्मसन्मान खच्ची झाला की तो कोलमडून पडतो. तेव्हा मुख्य मुद्दा हा आत्मप्रतिष्ठा जपली जात नाही. त्याला ठेच लागते आणि शेतकरी स्वत:चे जीवन संपवून टाकतो, असे एकूण सर्वांचे आकलन होते. जेव्हा आत्महत्या होत होत्या, तेव्हा गावातील वातावरण खूप भीतीदायक होते, असे ते तरुण सांगत होते. गावात सतत आत्महत्या होऊ लागल्या, तेव्हा गावातील म्हातारे लोक व महिला खूप घाबरल्या. त्या तरुण मुलांना एकटे शेतात जाऊ देत नव्हत्या. रात्री घराबाहेर सोडत नव्हत्या. सतत भीती वाटायची.

अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात कांताबाई दौलत हेलगोटे ही शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची पत्नी शाळेबाहेर भर उन्हात गोळ्या बिस्कीटे विकत होती. ते बघून खूप गलबलून आले. आजही 42,000 रुपये कर्ज तसेच अंगावर आहे. नवर्‍याच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मुलीनेही आत्महत्या केली. पतीची आत्महत्या हा विषय निघताच त्या रस्त्यावरच रडायला लागल्या.

त्याच तालुक्यात सावित्री परशराम हडोळे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या घरी गेलो. त्यांची पत्नी भेटली. रोज सकाळी ते फिरायला जात होते. सोबत पत्नीही होती. एकदम रस्त्यावरच्या कोरड्या विहिरीत त्यांनी उडी मारली आणि आत्महत्या केली. सोबत चालणारा पती एका क्षणात विहिरीत स्वत:ला संपवतो. आणि आपल्याला त्याच्या मनातील कल्लोळाचा अंदाज ही येत नाही, ही वेदना तिने कशी स्वीकारली असेल? असा प्रश्न तिच्याकडे बघून पडला.

📌 सर्वात क्लेशदायक उदाहरण चरण राठोड आणि त्याचा मुलगा लहू राठोड यांचे आहे. दोघांनीही खूप कमी दिवसांच्या अंतराने आत्महत्या केल्या. या दोन्ही धक्क्याने आता त्या मुलाची आई वेडसर झाली आहे.

या आत्महत्या झाल्यावर आणि चहुबाजुंनी सरकारवर खूप टीका झाल्यावर सरकारने गावागावात बळीराजा चेतना समिती स्थापन केल्या आहेत. या समितीच्या खात्यावर सरकार पैसे टाकते आणि ती समिती कुणालाही उसनी रक्कम त्यातून बिनव्याजी देऊ शकते. पण सरकारने यावर्षी दिलेली १ लाख रुपयांची रक्कम नंतर काढून घेतली. इतकी प्रशासनात असंवेदनशीलता आहे.

शेतकरी आत्महत्येचे आता राजकारण ही सुरू झाले आहे. त्यातून एकमेकाला कोंडीत पकडले जाते. एक शेतकरी आत्महत्या करायला जिल्हाधिकारी कचेरीवर गेला व तिथे त्याने विष घेतले. त्याला दवाखान्यात दाखल केले तर तेव्हा नेमकी विधानसभा निवडणूक सुरू होती. तेव्हा निवडणूक निकाल लागेपर्यंत त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. व निकाल लागल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले.

त्यातील आणखी एक पैलू म्हणजे कागदावर मात्र आत्महत्या खूप कमी दिसाव्यात, यासाठी सरकार आत्महत्या कमी दाखवत आहे व आत्महत्या कमी झाल्याचा देखावा करीत आहे. अकोला जिल्ह्यातील सुकळी या गावात 2000 सालापासून 21 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या कमी दाखविण्यासाठी त्या अपात्र ठरविण्याचे प्रमाण वाढते आहे. या सुकळी गावात 21 पैकी केवळ 7 आत्महत्याच केवळ पात्र ठरल्या आहेत. ‘जास्तीत जास्त आत्महत्या या अपात्र ठरवा’ असे आदेश असल्याचे अनेक कार्यकर्ते सांगतात.

खासगी व बँकांचे कर्ज असतेच, पण त्यापेक्षा लग्नासाठी किंवा इतर खर्चासाठी नातेवाईकांकडून पैसे घेतलेले असतात. मी म्हणालो, नातेवाईकांचे पैसे घेण्यात किमान पाठपुरावा व्याज तरी नसते. लोक म्हणाले की, नाही उलट नातेवाईकांच्या पैशाचे ओझे जास्त वाटते. ते मागत नाहीत पण आपण देत नाही, याची बोचणी जास्त लागते व त्यातून तणाव वाढत जातो.

आत्महत्या करण्यापूर्वी काही लक्षणे दिसतात का? याबाबतही लोकांशी बोललो. तेव्हा ते म्हणाले की, काहीच अंदाज येत नाही. उलट ती व्यक्ती आपण खूप नॉर्मल आहोत, असे दाखवायचा प्रयत्न करते. आत्महत्येपूर्वी काही मिनिटे त्याच्याशी बोललो, अशी उदाहरणे ते सांगत होते. आत्महत्येचे तात्कालिक कारण खूप क्षुल्लक असते. इतक्या साध्या कारणासाठी लोक आत्महत्या का करतात? असा प्रश्न कोणालाही पडेल, पण त्यामागची वेदना बघायला हवी. कधीतरी घरातले मूल एखादी वस्तू मागते वडील ती घेऊ शकत नाहीत. पण ती घटना त्याला विलक्षण लज्जित करते आणि तो स्वत:ला अपराधी मानू लागतो आणि आत्महत्या करतो. त्यामुळे कारण काय घडले, या प्रश्नात काहीच अर्थ नसतो.

महाराष्ट्राच्या इतर भागात कधीही शेतकरी आत्महत्येचा विषय निघाला की, हमखास आत्महत्येची खिल्ली उडवली जाते. ‘अहो कसल्या आत्महत्या? दारू पिऊन मेला तरी आत्महत्या म्हणतात’ इतक्या क्रूर भाषेत खिल्ली उडवली जाते. दबक्या आवाजात व्यसनामुळे आत्महत्या जास्त झाल्या असेही ऐकवले जाते. याबाबत विचारले तेव्हा कार्यकर्त्यांनी या मुद्द्यांचे अनेक पैलू उलगडून दाखविले. निराश झालेले लोक दारूच्या कचाट्यात सापडतात. तेव्हा ती दारू पिणारा हा शेतीत हरलेला असतो. शेती फायद्यात आहे आणि मग दारू पितो व आत्महत्या केली, असे एकही उदाहरण नसावे.

आत्महत्या केलेल्या काहींच्या रक्तात दारू सापडली त्याचे कारण ऐकल्यावर तर हतबुद्ध झालो. आत्महत्या करण्याचे धाडस नाही म्हणून आत्महत्येपूर्वी दारू पिल्याची काही उदाहरणे त्यांनी संगितली. रामेश्वर वैराळ हा वारकरी असलेला शेतकरी पूर्ण निर्व्यसनी होता. आत्महत्येपूर्वी सलग 4 दिवस तो दारू पित होता. मग त्याने आत्महत्या केली. हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. त्याचप्रमाणे संदीप घरत या तरुणाला तर दारूचा वास ही सहन होत नसायचा. तो मित्रांना दारू पिऊ नका म्हणून सतत सांगत राहायचा. पण विष पिण्याचे धाडस होईना म्हणून त्याने त्या दिवशी पहिल्यांदा दारू पिली व मग धाडस आल्याने तो विष पिला. त्याच्या आत्महत्येपेक्षा त्याच्या त्या दिवशी दारू पिण्याचा धक्का मित्रांना जास्त बसला. आत्महत्या करण्याचे धाडस होत नाही ते खोटे धाडस यावे म्हणून असे थोडेफार शेतकरी आत्महत्येपूर्वी दारू पिलेले असतील. पण त्या करुण घटनेचा वापर मात्र दारूमुळे आत्महत्या होतात, अशी बदनामी करण्यासाठी केला.

🔆 वरील निरीक्षणे ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ या समकालीन प्रकाशनाने केलेल्या अहवालातून घेतली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!