Soybean procurement : 2.66 लाख शेतकऱ्यांच्या साेयाबीनचे काय?
1 min read
Soybean procurement : खुल्या बाजारात साेयाबीनचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP – Minimum Support Price) कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंताेष निर्माण हाेऊ नये, यासाठी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून 14 लाख 13 हजार टन साेयाबीन खरेदीचा (Soybean procurement) निर्णय घेतला. नाफेड (NAFED – National Agricultural Cooperative Marketing Federation of India) व एनसीसीएफ (NCCF – National Cooperative Consumers Federation Of India) या संस्थांना ही खरेदी 15 ऑक्टाेबर 2024 ते 12 जानेवारी 2025 या काळात पूर्ण करायची हाेती. या संस्थांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय संथ गतीने खरेदी केल्याने दाेनदा मुदतवाढही देण्यात आली. 15 ऑक्टाेबर 2024 ते 6 फेब्रुवारी 2025 या चार महिन्यात दाेन्ही संस्थांनी राज्यात 7 लाख 77 हजार 757 नाेंदणीकृत (Registered) शेतकऱ्यांपैकी (Farmer) 72 टक्के म्हणजेच 5 लाख 11 हजार 657 शेतकऱ्यांकडून 11 लाख 21 हजार 385 टन साेयाबीन खरेदी केले. मुदत संपल्याने खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे 28 टक्के म्हणजेच 2 लाख 66 हजार 100 नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडे अजूनही शिल्लक आहे.
♻️ तीन महिन्यात 30 टक्के उद्दिष्ट
केंद्र सरकारने सन 2024-25 च्या हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी 4,892 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली. खुल्या बाजारात साेयाबीनचे दर मात्र प्रतिक्विंटल 3,200 ते 4,100 रुपयांच्या दरम्यान राहिले. हेच दर आजही कायम आहे. साेयाबीन खरेदीसाठी नाफेडचे 403 आणि एनसीसीएफचे 159 असे एकूण 562 खरेदी केंद्र टप्प्याटप्प्याने सुरू केले. त्यामुळे साेयाबीन विकण्यासाठी नाफेडकडे 5 लाख 64 हजार 523 आणि एनसीसीएफकडे 2 लाख 13 हजार 234 अशा एकूण 7 लाख 77 हजार 757 शेतकऱ्यांनी नाेंदणी केली. या दाेन्ही संस्थांनी पहिल्या टप्प्यात म्हणजेच 15 ऑक्टाेबर 2024 ते 9 जानेवारी 2025 या तीन महिन्यात 2 लाख 22 हजार 52 शेतकऱ्यांकडून 4 लाख 58 हजार 313 टन साेयाबीन खरेदी केले. ही खरेदी एकूण उद्दिष्टाच्या केवळ 30 टक्के हाेते.
🔆 एकूण साेयाबीन खरेदी केंद्र :- 562
🔆 नाफेडचे खरेदी केंद्र :- 403
🔆 एनसीसीएफचे खरेदी केंद्र :- 159
🔆 नाेंदणीकृत शेतकरी :- 7,77,757
🔆 नाफेडकडे नाेंदणी केलेले शेतकरी :- 5,64,523
🔆 एनसीसीएफकडे नाेंदणी केलेले शेतकरी :- 2,13,234
🔆 साेयाबीन खरेदी केलेले शेतकरी :- 2,22,052
🔆 नाफेड :- 1,53,886
🔆 एनसीसीएफ :- 68,166
🔆 साेयाबीन खरेदी न केलेले नाेंदणीकृत शेतकरी :- 5,55,705 (शिल्लक)
🔆 एकूण साेयाबीन खरेदी :- 4,58,313 टन
🔆 नाफेड :- 3,30,803 टन
🔆 एनसीसीएफ :- 1,27,510 टन
(ही आकडेवारी 9 जानेवारी 2025 पर्यंतची आहे.)
♻️ बारदान्याचा तुटवडा
डिसेंबर 2024 च्या तिसऱ्या आठवड्यापासून नाफेडच्या साेयाबीन खरेदी केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली. जानेवारी 2025 च्या पहिल्याच आठवड्यात नाफेडला 48 लाख पाेत्यांची गरज निर्माण झाली हाेती. पाेती वेळीच उपलब्ध करून देण्यात न आल्याने मुदत संपण्यापूर्वीच नाफेडने साेयाबीन खरेदी बंद केली. खरं तर राज्य सरकारने नाफेड व एमसीसीएफला एकूण 14.13 लाख टन साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले हाेते. यातील किमान 70 टक्के म्हणजे 9.90 लाख टन साेयाबीन नाफेडला खरेदी करायचे हाेते. हे साेयाबीन भरण्यासाठी 50 किलाे क्षमतेच्या नेमकी किती पाेत्यांची (बॅग) आवश्यकता आहे, याचे नियाेजन नाफेडने आधी केले नाही. दाेन्ही संस्थांनी एक महिना उशिरा साेयाबीन खरेदीला सुरुवात केली. शिवाय, खरेदीचा वेगही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संथ ठेवला. ओलाव्याचे कारण पुढे करून नाफेडने सुरुवातीला शेतकऱ्यांकडील साेयाबीन खरेदी करण्यास नकार दिला हाेता.
♻️ मुदतवाढ, बैठका व टेंडर
31 डिसेंबर 2024 राेजी साेयाबीन खरेदीची मुदत संपल्यानंतर बारदान्याचे कारण पुढे करून ही खरेदी 12 जानेवारी 2025 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला 8 जानेवारीला राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बैठक बाेलावली.या बैठकीत बारदाना उपलब्ध करून देण्याची ग्वाही नाफेडच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बारदान्यासाठी त्यांनी 9 जानेवारीला नवीन टेंडर मागविण्याची प्रक्रिया सुरू केली. 12 जानेवारीपर्यंत बारदाना उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने त्यांनी शेतकऱ्यांकडील जुना बारदाना स्वीकारण्याचे निर्देश दिले. या सुस्थितीत असलेल्या बारदान्यावर नाफेडचा लाेगाे, स्टॅम्प व इतर माहिती प्रिंट असणे अनिवार्य हाेते. अशी पाेती कुण्या शेतकऱ्याकडे उपलब्ध असताे. राज्य सरकारच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने 13 जानेवारी राेजी साेयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत व नंतर 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. या तारखेपर्यंत दाेन्ही संस्थांनी 5 लाख 11 हजार 657 शेतकऱ्यांकडून 11 लाख 21 हजार 385 टन साेयाबीन खरेदी केली. यात 2 लाख 66 हजार 100 नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील साेयाबीनचे माेजमाप करण्यात आले नाही. या खरेदीला 6 फेब्रुवारीनंतर मुदतवाढ मिळणे गरजेचे असताना ती केंद्र सरकारने दिली नाही. नाफेड व एनसीसीएफने व्यवस्थित व गांभीर्याने खरेदी केली असती तर शेतकरी शिल्लक राहिले नसते व खरेदीचे उद्दिष्टही पूर्ण झाले असते. साेयाबीन खरेदी प्रक्रिया वाहता केंद्र व राज्य सरकारला साेयाबीन खरेदीत स्वारस्य नसल्याचे स्पष्ट हाेते.
🎯 साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट :- 14 लाख 13 हजार टन
🎯 एकूण साेयाबीन खरेदी :- 11 लाख 21 हजार 385 टन
🎯 एकूण नाेंदणीकृत शेतकरी :- 7 लाख 77 हजार 757
🎯 साेयाबीन खरेदी केलेले शेतकरी :- 5 लाख 11 हजार 657
🎯 शिल्लक शेतकरी :- 2 लाख 66 हजार 100
🎯 साेयाबीन खरेदी
🔆 नाफेड :- 8 लाख 36 हजार 742 टन
🔆 एनसीसीएफ :- 2 लाख 84 हजार 644 टन
🎯 नाेंदणीकृत शेतकरी
🔆 नाफेड :- 5 लाख 64 हजार 523
🔆 एनसीसीएफ :- 2 लाख 13 हजार 234 – १ लाख ४९ हजार ४१५
🎯 इतक्या शेतकऱ्यांकडून केली साेयाबीन खरेदी
🔆 नाफेड :- 3 लाख 62 हजार 242
🔆 एनसीसीएफ :- 1 लाख 49 हजार 415
🎯 शिल्लक शेतकरी
🔆 नाफेड :- 2 लाख 2 हजार 281
🔆 एनसीसीएफ :- 63 हजार 819
🎯 लातूर जिल्ह्यात सर्वाधिक साेयाबीन खरेदी :- 1 लाख 73 हजार 891 टन
🎯 बुलढाणा जिल्ह्यात 1 लाख 32 हजार 758 टन सोयाबीन खरेदी.
🎯 मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात व तेलंगणा या राज्यात एकूण 18 लाख 68 हजार 914 टन साेयाबीन खरेदी.
Amchyakdun document ghetle pn soyabin kharedi nahi zali