krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Onion export ban : निर्यातबंदी उठविण्याचा कांदा उत्पादकांना फायदा नाही

1 min read
Onion export ban : केंद्र सरकारने कांद्यावरील (Onion) निर्यातबंदी (export ban) उठविण्याची घोषणा केली. मात्र, किमान निर्यात मूल्य (Minimum export price) व निर्यात शुल्क (Export duty) लागू केल्यामुळे कांदा उत्पादकांना या निर्यातीचा काडीचाही फायदा होणार नाही, असे मत शेतकरी नेते तथा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 3 मे 2024 रोजी परिपत्रक काढून कांद्याची निर्यात खुली केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढून कांदा उत्पादकांचा मोठा फायदा होईल, असे चित्र तयार केले जात आहे. मात्र, निर्यात खुली करतानाच कांद्याचे किमान निर्यात शुल्क 550 डॉलर प्रति टन जाहीर केले. तसेच 40 टक्के निर्यात शुल्क देखील आकारण्यात आला. या अटींमुळे फार कांदा निर्यात होणार नाही.

किमान निर्यात मूल्य अधिक 40 टक्के निर्यात शुल्क म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याचा आपल्या बंदरावरील दर किमान 64 रुपये प्रति किलाे असेल. त्यात पुढे वाहतूक खर्च लागणार आहे. आपला प्रतिस्पर्धी पाकिस्तानातून निर्यात होणाऱ्या कांद्यावर 400 डॉलर निर्यात शुल्क आहे. त्यामुळे स्पर्धा असणार आहे. सध्या कांद्याला 15 रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत आहे. चाळीत साठवलेल्या कांद्याचा उत्पादन खर्च किमान 25 रुपये प्रतिकिलाेपर्यंत जातो.

या निर्यातबंदी उठविण्याचा निर्णयामुळे कांद्याला 20 ते 23 रुपये प्रतिकिलो दर मिळू शकतील, असा अंदाज आहे. असा दर मिळाला तरी कांदा उत्पादक शेतकरी तोट्यातच असणार आहे. बिनशर्त निर्यातबंदी उठली असती तर 30 ते 35 रुपये प्रतिकिलो दरम्यान दर मिळाला असता व शेतकऱ्यांना काही प्रमाणात नफा मिळाला असता.

कांदा उत्पादक पट्ट्यात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी स्पष्ट दिसत आहे. ती कमी करण्यासाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. कांदा उत्पादकांनी मतदान करताना याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!