krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmers Double income and loss : पाच वर्षांत संत्रा उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याऐवजी 150 टक्क्यांनी घटले

1 min read
Farmers Double income and loss : सन 2019 मध्ये देशाची सत्ता दुसऱ्यांदा सांभाळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशातील शेतकऱ्यांचे (Farmers) उत्पन्न दुप्पट (Double income) करणार असल्याची ग्वाही दिली हाेती. तशा जाहिरातीही करण्यात आल्या. सन 2019 ते 2024 या पाच वर्षात विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या (Orange growers) उत्पन्नाचा आढावा घेतला असता, त्यांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याएवजी त्यांना तब्बल 150 टक्क्यांचा ताेटा (loss) सहन करावा लागला.

🎯 संत्राबागांचे प्रमाण
महाराष्ट्रात एकूण 2 लाख हेक्टरवर संत्र्यांच्या बागा आहेत. यातील 1 लाख 80 हजार हेक्टरवरील बागा एकट्या विदर्भात आहेत. अमरावती व नागपूर व जिल्ह्यात संत्राबागांचे क्षेत्र सर्वाधिक असून, विदर्भात किमान 1 लाख हेक्टरवरील संत्राबागा या उत्पादनक्षम (Productive) आहेत. राज्याच्या कृषी विभागाच्या मते विदर्भातील संत्र्यांचे उत्पादन सरासरी हेक्टरी 7 टन एवढे आहे. संत्र्यांची उत्पादकता, प्रक्रिया उद्याेग आणि निर्यात वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आजवर कुठलेही प्रभावी प्रयत्न केले नाहीत व आजही केले जात नाहीत.

🎯 कृषी निविष्ठांच्या दरात भरमसाठ वाढ
नरेंद्र माेदी सरकारने बहुतांश वस्तूंवर जीएसटी (Goods and Services Tax) लावला आहे. यातून रासायनिक खते, कीटकनाशके, शेतीपयाेगी साहित्य व सर्व कृषी निविष्ठांचा समावेश आहे. या सर्व कृषी निविष्ठांवर आज शेतकऱ्यांना 12 ते 18 टक्के जीएसटी द्यावा लागताे. या जीएसटीचा परतावा मात्र त्यांना मिळत नाही. साेबतच पेट्राेल, डिझेल या इंधनाच्या दरात माेठी वाढ करण्यात आल्याने वाहतूक खर्च वाढला. नंतर या इंधनाचे दर थाेडे कमी जरी केले असले तरी वाहतुकीचा खर्च मात्र कमी झाला नाही. सरकारच्या या धाेरणामुळे या पाच वर्षांत संत्राचा उत्पादन खर्च प्रति एकर सरासरी 90 टक्क्यांनी वाढला आहे.

🎯 संत्र्यांचा उत्पादनखर्च
सन 2019 मध्ये संत्र्याचा प्रति एकर उत्पादन खर्च (Production costs) हा सरासरी 30 हजार रुपये हाेता. हा खर्च पाच वर्षात 55 हजार रुपयांवर केला आहे. संत्र्यांचा उत्पादनखर्च काढताना या केवळ कृषी निविष्ठांचे दर, मजुरी, वाहतूक व मशागतीचा इतर खर्च ग्राह्य धरला आहे. यातून शेतकऱ्याची मजुरी वगळली आहे. शेतकऱ्याची मजुरी प्रतिदिवस किमान 500 रुपये विचारात घेतली तर संत्रा उत्पादनखर्च आणखी वाढणार असून, तुलनेत उत्पन्न घटणार आहे.

🎯 निर्यात मंदावली, दर काेसळले
या पाच वर्षात देशांतर्गत बाजारातील नागपुरी संत्र्याची (Nagpuri oranges) मागणी (Demand) स्थिर असली तरी निर्यात (Export) मंदावल्याने त्याचा परिणाम संत्र्याच्या दरावर झाला. बांगलादेश हा संत्र्याचा सर्वात माेठा आयातदार देश आहे. नरेंद्र माेदी सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये कांद्यावर निर्यातबंदी लावली आणि साैदे करूनही बांगलादेशला कांदा दिला नाही. भारत-बांगलादेशच्या सीमेवर कांदा घेऊन गेलेले सर्व द्या. नंतर मात्र कांदा देऊ नका, अशी बांगलादेश सरकारने केलेली विनंती नरेंद्र माेदी सरकारने फेटाळून लावली आणि कांद्याचे कंटेनर माघारी बाेलावले. त्यामुळे बांगलादेशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने दरवाढ झाली आणि तेथील नागरिकांमध्ये सरकारविरुद्ध राेष निर्माण झाला. या राेषाला अप्रत्यक्षरीत्या नरेंद्र माेदी सरकारचा कांदा निर्यातबंदीचा (Onion export ban) निर्णय कारणीभूत असल्याने बांगलादेश सरकारने ऑक्टाेबर 2019 मध्ये नागपुरी संत्र्यावर प्रति किलाे 20 रुपये आयात शुल्क (Import duty) लावला. हा आयात शुल्क सन 2023 मध्ये 88 रुपये करण्यात आला. त्यामुळे संत्र्याची निर्यात जवळपास 65 ते 70 टक्क्यांनी घटली. हा संत्रा देशांतर्गत बाजारात विकावा लागला. संत्र्याची मागणी स्थिर राहून पुरवठा वाढल्याने संत्र्याचे दर काेसळले. नरेंद्र माेदी सरकारच्या कांदा निर्यातबंदी निर्णयाचा फटका संत्रा उत्पादकांना बसला.

🎯 संत्रा उत्पादकांची दिशाभूल
भारत व बांगलादेश सार्क आणि जी-20 चे सदस्य आहेत. या सदस्य देशांमधील शेतमालाची आयात, निर्यात ही शुल्कमुक्त असते. बांगलादेशने संत्र्यावर आयात शुल्क लावल्यानंतरही भारताने ऑक्टाेबर 2019 पासून आजवर सार्व अथवा जी-20 कडे बांगलादेशची तक्रार केली नाही. उलट, आपण बांगलादेश सरकारची चर्चा करीत असून, त्यांना आयात शुल्क रद्द करण्याची मागणी करीत असल्याचे भाजप नेते संत्रा उत्पादकांना सांगत हाेते आणि त्यांची दिशाभूल करीत हाेते. मध्यंतरी डिसेंबर 2023 मध्ये महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने बांगलादेशातील संत्रा निर्यातीला प्रति किलाे 44 रुपयांची निर्यात सबसिडी जाहीर केली. मात्र, कुणालाही दिली नाही. त्याचे नियाेजनही केले नाही.

🎯 150 टक्के ताेटा
सन 2019-20 च्या हंगामात संत्र्याची बऱ्यापैकी निर्यात करण्यात आल्याने संत्र्याला सरासरी प्रति टन 35 हजार रुपये दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति एकर 75 हजार रुपयांचा फायदा झाला. सन 2020-21 च्या हंगामात खर्च वाढल्याने दर काेसल्याने शेतकऱ्यांना प्रति 7,750 रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. सन 2021-22 च्या हंगामात प्रति टन 20 हजार रुपये दर मिळाल्याने प्रति एकर 15 हजार रुपयांचा फायदा झाला असला तरी सन 2022-23 च्या हंगामात प्रति टन 15 हजार रुपये दर मिळाल्याने एकरी 5 हजार रुपयांचे आणि सन 2023-24 च्या हंगामात प्रति टन 14 हजार रुपये दर मिळाल्याने प्रति एकर सरासरी 13 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. विशेष म्हणजे, या पाच वर्षांत संत्राचा उत्पादन खर्च हा 90 टक्क्यांनी वाढला असून, मंदावलेली निर्यात आणि प्रक्रिया प्रकल्पांचा अभाव यामुळे संत्राला कमी दर मिळाला.

🎯 प्रतिएकर खर्च व उत्पन्न (सरासरी)
वर्ष – खर्च मिळालेला दर फायदा/नुकसान
🌀 2019-20 :- 30,000 – 35,000 – 75,000 रुपये फायदा
🌀 2020-21 :- 37,750 – 10,000 – 7,750 रुपये नुकसान
🌀 2021-22 :- 45,000 – 20,000 – 15,000 रुपये फायदा
🌀 2022-23 :- 50,000 – 15,000 – 5,000 रुपये नुकसान
🌀 2023-24 :- 55,000 – 14,000 – 13,000 रुपये नुकसान

🎯 किमान तीन लाख टन संत्रा निर्यात व्हावा
विदर्भात दरवर्षी सरासरी 7 लाख टन संत्र्यांचे उत्पादन हाेते. यात अंबिया बहाराच्या संत्र्यांचे 60 टक्के म्हणजेच 4 लाख 20 हजार टन आणि मृग बहाराच्या 40 टक्के म्हणजेच 2 लाख 80 हजार टन संत्र्यांचा समावेश आहे. यातील 80 टक्के म्हणजेच सरासरी 5 लाख 60 हजार टन संत्रा हा ‘टेबल फ्रुट,’ तर उर्वरित 1 लाख 40 हजार टन संत्रा हा प्रक्रियाक्षम असताे. देशांतर्गत बाजारातील संत्र्यांची मागणी विचारात घेत सरकारने दरवर्षी किमान 2.50 ते 3 लाख टन संत्रा निर्यातीसाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आणि निर्यातीत सातत्य ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने नवीन संत्रा आयातदार देश शाेधणे गरजेचे आहे.

🎯 पतंजली व ठाणाठुणी येथील प्रकल्प सुरू करा
छाेट्या संत्र्याची समस्या निकाली काढण्यासाठी सन 2016 मध्ये नागपूर शहरातील मिहानमध्ये पतंजलीच्या माॅडर्न फूड पार्कची आणि ठाणाठुनी, ता. माेर्शी, जिल्हा अमरावती येथे जैन फार्म फ्रेश ऑरेंज उन्नती या दाेन संत्रा प्रक्रिया प्रकल्पांची मुहूर्तमेढ राेवण्यात आली. गेल्या आठ वर्षात हे दाेन्ही प्रकल्प सुरू करण्यात आले नाहीत. माॅडर्न फूड पार्कची फळ प्रक्रिया क्षमता प्रति दिवस 1,000 टन असून, ऑरेंज उन्नतीची क्षमता प्रति दिवस 500 टन एवढी आहे. नाेंदेड येथील पेप्सीकाे संत्रा प्राेसेसिंग प्लांट मध्यंतरी बंद हाेता. हा प्लांट सह्याद्री फार्मर प्राेड्यूसर कंपनीने सन 2023-24 मध्ये सुरू केला. या प्लांटने प्रतिदिवस सरासरी 6 हजार टन छाेट्या आकाराचा संत्रा खरेदी केला. त्यामुळे माेठ्या संत्र्याला सरासरी 14 हजार रुपये प्रतिटन दर मिळू शकला. हा प्रकल्प जर बंद असता, तर हेच दर प्रतिटन 10 हजार रुपयांपेक्षा खाली गेले असते. त्यामुळे संत्र्याच्या दराला उभारी देण्यासाठी तसेच संत्रा उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नागपूर शहरातील पतंजली व ठाणाठुनी, ता. माेर्शी, जिल्हा अमरावती येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प तातडीने सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!