NCEL Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी : भारत ग्राहक देश गमावणार; पाकिस्तानला संधी
1 min read🌍 पाकिस्तानचा महत्त्वाचा निर्णय
भारतातील कांदा निर्यातबंदी आणि मुस्लीम राष्ट्रांना रमजानच्या काळात हवा असलेला कांदा डाेळ्यासमाेर ठेऊन पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्रालयाने 5 मार्च 2024 राेजी त्यांच्या शेजारी राष्ट्रांसाठी महिनाभर कांदा निर्यातबंदी करण्याबाबत ‘द ट्रेड डेव्हलपमेंट अथाॅरिटी ऑफ पाकिस्तान’ (TDAP – The Trade Development Authority of Pakistan)ला त्यांचा अभिप्राय मागितला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानने यातून भारताचे नियमित कांदा ग्राहक देश वगळले आहेत. त्यांची ही कांदा निर्यातबंदी केवळ महिनाभरासाठी राहणार असून, तीही त्यांच्या शेजारच्या नियमित ग्राहक राष्ट्रांसाठी असेल. भारत मात्र अशा प्रकारचे निर्णय कधीच घेत नाही. भारतात आधीच दीर्घकाळ कांदा निर्यातबंदी असून, कांद्याची तस्करी आणखी वाढली आहे. याकडे भारतातील सत्ताधारी गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. शिवाय, ही मंडळी अप्रत्यक्षरीत्या कांदा तस्करीला चालना देत असल्याने भारत नियमित ग्राहक देश गमावण्याची शक्यता बळावली आहे.
🌍 भारताचे वेळकाढू धाेरण
रमजान महिन्यास 12 मार्च 2024 पासून प्रारंभ झाला आहे. बांगलादेशातील सुखसागर कांदा बाजारात यायला थाेडा उशीर असल्याने तसेच या काळात कांद्याची नितांत आवश्यकता असल्याने बांगलादेशने भारताकडून कांदा खरेदीला सहमती दर्शविली हाेती. त्यांना 12 मार्चपूर्वी कांदा हवा हाेता. त्यामुळे भारत सरकारने 1 मार्च 2024 राेजी बांगलादेशला 50 हजार टन कांदा निर्यात करण्याबाबतचे नाेटीफिकेशन जारी केले. ही निर्यात एनसीईएलच्या माध्यमातून केली जाणार असल्याचेही भारत सरकारने स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात 1,650 टन कांदा बांगलादेशला निर्यात करायचा आहे. बांगलादेशला नाशिकचा कांदा हवा आहे. एनसीईएलला नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये 1,650 टन कांदा खरेदी करून पॅकिंगसह इतर प्रक्रिया करून बांगलादेशात कांदा पाठवायला किमान 11 दिवस लागतात. एनसीईलने कांदा खरेदी करण्यापासून तर बांगलादेशात पाठविण्यापर्यंत सर्व प्रक्रियेत ऑनलाइन लिलाव पद्धतीचा अवलंब केला. एनसीईएलने कांदा खरेदीचा लिलाव 15 मार्च 2024 राेजी केला आणि गुजरातच्या एका कंपनीला 29 रुपये प्रति किलाे दराने कांदा खरेदीचे टेंडर दिले. बांगलादेशने भारताला 18 मार्च 2024 राेजी परचेस ऑर्डर पाठविली आहे. या काळात नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर 11 ते 13 रुपये प्रति किलाे हाेते. एनसीईएलकडून टेंडर घेणाऱ्या कंपनीने 12 रुपये प्रति किलाे दराने कांदा खरेदी केला आणि 29 रुपये प्रति किलाे दराने एनसीईएलला विकला. नरेंद्र माेदी सरकारच्या या धाेरणामुळे कांदा उत्पादकांचा कवडीचाही फायदा न हाेता उलट माेठे आर्थिक नुकसान झाले आहे.
🌍 पाकिस्तानचे कांदा निर्यात धाेरण
जागतिक पातळीवर कांदा निर्यातीचा विचार करता अफगाणिस्तान, इराण व आखाती देश पाकिस्तानचे तर बांगलादेश, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया आणि युराेपियन राष्ट्र हे भारताचे कांदा ग्राहक देश आहेत. रमजान महिन्यामुळे यातील मुस्लीम राष्ट्रांना कांद्याची आवश्यकता भासत आहे. त्यांची ही गरज भारतीय तस्कर कांद्याची तस्करी करून पूर्ण करीत आहे आणि माेठ्या प्रमाणात पैसे कमावत आहे. पाकिस्तान सरकार महिनाभर (12 मार्च ते 11 एप्रिल) आखाती देशांसाठी कांदा आणि इराण व अफगाणिस्तानसाठी केळी निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ते सर्व पाकिस्तानचे शेजारी राष्ट्र असून, नियमित ग्राहक देखील आहेत. या देशांकडून पाकिस्तानला कांदा निर्यातीतून कमी पैसे मिळतात. दुसरीकडे, निर्यातबंदीमुळे महत्त्वाचा व माेठा कांदा पुरवठादार देश असलेला भारत बाजारात नसल्याचा पुरेपूर फायदा घेत पाकिस्तानने भारताचे ग्राहक असलेल्या देशांमध्ये कांदा निर्यात खुली ठेवली आहे. कारण, पाकिस्तानला त्यांच्या नियमित ग्राहक देशांच्या तुलनेत या देशांकडून अधिक पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली असून, पाकिस्तान ही संधी कॅश करण्याचा कसाेशिने प्रयत्न करीत आहे. या धाेरणामुळे पाकिस्तानला भारताचे काही नियमित कांदा ग्राहक देश कायमचे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एप्रिलमध्ये पाकिस्तानसह बांगलादेशचा कांदा बाजारात येणार आहे. त्यामुळे महिनाभरानंतर पाकिस्तान कांदा निर्यात सर्वांसाठी खुली करेल.
🌍 इतर देशांमधील कांद्याचे दर
🔆 दुबई :- 96 रुपये/प्रतिकिलाे
🔆 बांगलादेश :- 70 रुपये/प्रतिकिलाे
🔆 श्रीलंका :- 100 रुपये/प्रतिकिलाे
🔆 मलेशिया :- 110 रुपये/प्रतिकिलाे
🌍 कांदा तस्करीचा फायदा कुणाला?
हंगामात भारतातून बांगलादेशात राेज 7 ते 7.5 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात व्हायचा. नरेंद्र माेदी सरकारच्या चुकीच्या धाेरणामुळे कांद्याची निर्यात थांबली असली तरी सध्या भारतातून बांगलादेशात राेज 3 ते 3.5 हजार मेट्रिक टन कांद्याची तस्करी सुरू आहे. घाेजाडांगा (पश्चिम बंगाल) येथील सीमेवरून भारतीय कांदा तस्करीचे कंटेनर बांगलादेशात राेज मध्यरात्रीनंतर पास केले जातात. दीर्घकाळ कांदा निर्यातबंदी धाेरणामुळे देशांतर्गत बाजारात दर काेसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी व निर्यातदार यांना माेठे आर्थिक नुकसान साेसावे लागत आहे. दुसरीकडे, कांदा तस्कर, कस्टम ऑफिसरसह काही महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी या कांदा तस्करीतून माेठ्या प्रमाणात पैसे कमावत आहेत. त्यामुळे नरेंद्र माेदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादून काय साध्य केले? या महत्त्वाच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 31 मार्च 2024 नंतर कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहिल्यास त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण भारताला सहन करावे लागणार आहे. शिवाय, भारत कांदा ग्राहक देश कायमचे गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतापेक्षा पाकिस्तानचे शेतमाल निर्यात धाेरण चांगले आहे, असे म्हणण्याची वेळ केंद्र सरकारने आणली आहे.