Refined edible oil : रिफाइंड नाही तर मग तेल खायचे तरी काेणते?
1 min read🔆 पारंपरिक तेलबिया
भारतातील पारंपरिक (Traditional) तेलबियांमध्ये (Oilseeds) मोहरी (Mustard), भुईमूग (Groundnut), तीळ (Sesame), जवस (Linseed), करडई/करडी (Kardai/Kardi) व कारळे यांचा समावेश हाेताे. सूर्यफूल (Sunflower) तेलबिया असून, साेयाबीनचा (Soybeans) समावेश तेलबिया हाेत नाही. ही दाेन्ही पिके परदेशातून भारतात आली आहेत. खाेबऱ्याचा तेलबियांमध्ये समावेश हाेत नसला तरी दक्षिण भारतात खाेबरेल तेलाचा (Coconut oil) खाण्यासाठी माेठ्या प्रमाणात वापर केला जाताे. कारण उत्तर भारतात थंडीचे प्रमाण अधिक असते आणि माेहरीचे तेल गरम असते.
🔆 काेणत्या भागात काेणते तेल खातात?
भारतातील जैवविविधता (Biodiversity) विचारात घेता देशाच्या काेणत्या भागात काेणते तेल खाण्यासाठी वापरले जायचे हे आधीच ठरले हाेते. मात्र, रिफाइंड ऑइलमुळे ते माेडित निघाले. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात माेहरीचे तेल खाण्यासाठी वापरण्याची पद्धती हाेती. साेबतच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशच्या काही भागांत भुईमूग व तीळ, महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या काही भागात जवस व करडई/करडी आणि दक्षिण भारत व समुद्र किनारपट्टी लगतच्या भागात खाेबरेल तेलाचा खाण्यासाठी वापर केला जाताे. खाद्यतेलाची ही विभागणी भारताच्या विविध भागातील जैवविविधता व वातावरणावरून नैसर्गिकरीत्या झाली आहे.
🔆 तेलाचे प्रमाण व अर्थशास्त्र
भारतातील सर्व पारंपरिक तेलबियांसह सूर्यफुलामध्ये तेलाचे प्रमाण 35 ते 45 टक्के असते. या तेलबियांपासून कमी किमतीच्या मशीन अथवा लाकडी किंवा स्टीलच्या घाणीतून तेल काढणे सहज शक्य आहे. मुळातच तेलबिया नसलेल्या साेयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण केवळ 12 ते 14 टक्के असते. साेयाबीनपासून तेल काढण्यासाठी आवश्यक असलेल्या मशनरीची किंमतही काेटींच्या घरात आहे. पारंपरिक तेलबियांसह सूर्यफुलाचे अर्थशास्त्र त्यातील तेलावर अवलंबून असते तर साेयाबीनचे अर्थशास्त्र तेलाऐवजी त्यापासून तयार हाेणाऱ्या ढेपे/पेंड (De oil cake) यावर अवलंबून आहे. या ढेपे/पेंडेचा वापर जनावरांच्या खाद्यासह विविध प्रकारची उत्पादने तयार करण्यात लागणारा कच्चा माल म्हणून केला जाताे.
🔆 वापर अर्ध्यावर
साेयाबीनच्या तुलनेत सूर्यफूल व पारंपरिक तेलबियांपासून तेल काढणे कमी खर्चाचे आहे. पूर्वी भारतात पारंपरिक तेलबियांपासून घाण्याच्या मदतीने तेल काढले जायचे. या तेलाचा दैनंदिन वापर रिफाइंड तेलाच्या तुलनेत अर्धा असताे. कारण ते न उकळता रूम टेम्प्रेचरवर (Room temperature) केले तयार जात असल्याने रिफाइंड ऑइलच्या तुलनेत अधिक घट्ट व चिकट असते. तेलबियांमधील सर्व घटक तेलात उतरत असल्याने ते तेव्हापासून आतापर्यंत आराेग्यवर्धक ठरले आहे.
🔆 वाढती मागणी, घटते उत्पादन व दुष्परिणाम
वाढत्या लाेकसंख्येमुळे खाद्यतेलाची मागणी वाढत आहे. नागरिकांना स्वस्तात खाद्यतेल मिळावे म्हणून केंद्र सरकारद्वारे तेलबियांचे दर नियंत्रित केले जातात. तेलबियांना समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी त्यांची पेरणी कमी करतात. त्यामुळे लागवड क्षेत्र कमी हाेऊन उत्पादन घटत गेले. मग, खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी रिफाइंड व त्यात पामतेल मिसळण्याला तसेच मानवी खाद्य व तेलबिया नसलेल्या साेयाबीन तेल उत्पादन व ते खायला वापरण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. परंतु, त्याचे मानवी आराेग्यावर काेणते दूरगामी दुष्परिणाम हाेतात, याचा विचार केंद्र अथवा राज्य सरकारने किंवा स्वस्तात खाद्यतेल हवे असणाऱ्या नागरिकांनी अथवा इतरांनी केला नाही.
🔆 आराेग्यापेक्षा चवीला महत्त्व
सर्व पारंपरिक तेलबियांना स्वत:ची स्वतंत्र चव व गंध आहे. बहुतांश मंडळी चव व गंधामुळे घाण्याचे तेल न वापरता चव व गंधरहित रिफाइंड तेल वापरतात. तेलातील चव, गंध व चिकटपणा कमी करण्यासाठी ते ब्लिचिंग करून त्यात घातक रसायने मिसळली जातात. मानवी आराेग्याला आवश्यक असलेले घटक तेलातून काढले जात असल्याने ते खाद्यतेल बहुतांश नागरिक केवळ चवीसाठी वापरतात. घाणीच्या तेलाचा वास येत असल्याने व ते चवीला थाेडे कडवट वाटत असल्याने खायला आवडत नाही, असे अनेकांनी सांगितले. यावरून देशातील बहुतांश नागरिक त्यांच्या व कुटुंबीयांच्या आराेग्याऐवजी चवीला विशेष महत्त्व देत असल्याचे स्पष्ट हाेते. ही मंडळी घाणीच्या तेलावर थाेडे अधिक पैसे खर्च करण्याऐवजी स्वस्त रिफाइंड ऑइल वापरून आजार ओढवल्यानंतर डाॅक्टर आणि औषधांवर दर महिन्याला हजाराे रुपये खर्च करण्यास धन्यता मानतात.
🔆 पारंपरिक तेलातील पाेषक घटक
जवस तेलामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6, मेदाम्ल, अँटिऑक्सिडंट, आठ प्रकारची प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे असतात. करडई तेलात ओलेइक आम्ल, लिनोलिइक आम्ल व प्रथिने, शेंगदाणा तेलात ऊर्जा, चरबी, संतृप्त चरबी, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, व्हिटॅमिन ई, फायटोस्टेरॉल्स व प्रथिने, तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व प्रोटीन तसेच माेहरीच्या तेलात ऊर्जा, ओमेगा-6, लिनोलिक ॲसिड, मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, संतृप्त चरबी, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. रिफाइंड तेलात यातील बहुतांश घटक काढले जातात, जे मानवी आराेग्याला अत्यावश्यक आहे. रिफाइंडमधील हे घटक काढून घातक पामतेल इ रसायने मिसळली जात असल्याने आपण आजारांना निमंत्रण देत आहोत.
🔆 किती तेल खावे?
एका संशाेधनानुसार पुरुषांनी दिवसभरात 30 ग्रॅम व महिलांनी 20 ग्रॅमपेक्षा अधिक तेल खाणे टाळले पाहिजे. कारण तेलामधील फॅट हे फॅटी ॲसिडच्या कणांनी बनलेले असते. सिंगल बाँडने जोडलेल्या फॅटी ॲसिडला सॅच्युरेटेड फॅट आणि डबल बाँडने जोडलेल्या फॅटी ॲसिडला अनसॅच्युरेटेड फॅट असे संबाेधले जाते. फॅटी ॲसिड रक्तात थेट विरघळतात व थेट यकृतात जातात. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. या सर्व बाबींचे काटेकाेर पालन केल्यास प्रत्येकाचे व पर्यायाने देशाचे आराेग्य उत्तम राहण्यास मदत हाेईल.