Monsoon out and cold in : मकरसंक्रांतीला मान्सून बाहेर व थंडी आत
1 min read
14 जानेवारी 2024 ला ईशान्य मान्सूनच्या निर्गमनातून, विषुववृत्त समांतर पूर्वेकडून येणारा हंगामी ‘पुरवी’ वारा झोताचा प्रभावही त्यामुळे कमी होईल आणि विषुववृत्त दरम्यानचा पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाब असलेले ‘आंतर-कटिबंधीय अभिसरणीय परीक्षेत्र’ (intertropical convergence zone) विषुववृत्तावरील (zero degree axis) त्याच्या सरासरी जागेपासून काहीसा दक्षिणेकडे म्हणजे 10 डिग्री दक्षिण अक्षवृत्त (दक्षिण गोलार्धात)पर्यंत सरकेल. त्यामुळे महाराष्ट्रातही हवेच्या उच्च दाबाच्या टेकड्यांना छेदून जाणारी काल्पनिक उंचावरील रेषा म्हणजे पोळ (‘रिज’) ही दक्षिण भारताकडेकडे सरकेल.
सरकलेल्या पोळ (रिज)मुळेच उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांना हवेच्या उच्च दाबरुपी काल्पनिक भिंतीचा अडथळा दूर होवून महाराष्ट्रात काहीसी थंडी वाढत आहे. येथे काहीसीच थंडीचा उल्लेख केला. कारण सध्याच्या अस्तित्वातील चालू ‘एल-निनो’च्या (El Nino) प्रभावामुळे एकापाठोपाठ पास होणारे पश्चिम झंजावात हे कमी तीव्रतेनेच पास होत आहे. त्यांच्या कमकुवतपणा तसेच दक्षिण अक्षवृत्तकडे म्हणजे देशात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडकडे घुसणारे ‘सैबेरिअन अतिथंड हवेचे लोटा’अभावी काश्मीरमध्ये सध्या चालू असलेला 40 दिवसां(21 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024)चा ‘चालाई कलान’च्या उच्च थंडी व बर्फ पडणाऱ्या हंगामी कालावधीही बर्फवृष्टीविना कोरडा जाताना जाणवत आहे. एकूणच उत्तर भारतातही सध्या थंडीची तीव्रता कमीच आहे. म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल.
निसर्ग कालक्रमणाप्रमाणे 22 डिसेंबर या दिवशी पृथ्वीचे दक्षिण टोकाकडील साडे तेवीस दक्षिण अक्षवृत्ताचा म्हणजे पृथ्वीचा मकर वृत्ताचा जास्तीत जास्त भाग हा सूर्यासमोर असतो आणि दक्षिण गोलार्धातील टोकाकडचा हा भाग 15 जानेवारीपर्यंतचा (22 डिसेंबर ते 15 जानेवारी) 25 दिवसांचा संक्रमण कालावधीत मकरवृत्तावरच म्हणजे साडेतेवीस दक्षिण अक्षवृत्तवरच जाणवतो. या महिन्याभराच्या कालावधीला ‘झुंझूरमास’ (धनुर्मास ) किंवा धुंधुर्मास किंवा शून्यमास ही म्हणतात. म्हणूनच थंडी पोषक असा शाकाहारी खाद्याचा खानपानात समावेश करूनही वेगळ्या पद्धतीने हा कालावधी साजरा केला जातो. सूर्याचा धनू राशीत प्रवेश होतो म्हणून झुंझूरमास बरोबर धनुर्मास ही म्हणतात. मात्र संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. म्हणून तर या संक्रांतीला मकर संक्रांती संबोधले जाते.
पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड ही राज्ये समुद्रसपाटीपासून त्यामानाने कमी उंचीवर तसेच सखल मैदानी भाग संरचनेमुळे येथील बाधणाऱ्या अतिथंडीला व त्यातून उदभोवणाऱ्या त्रासिक जनजीवनाला या कालावधीत लोकं वैतागलेली असतात. तेथे संक्रांतीनंतर तेथील जीवन थंडी कमी झाल्यामुळे दैनंदिन जीवन सुसह्य होते. हा आनंद लोहोरी उत्सव म्हणून साजरा करतात. शेकोटी किंवा आगटी पेटवून की ज्याला त्यांच्याकडे लोहोरी म्हणतात. त्याभोवती एकत्र येऊन स्रिया -पुरुष नृत्य सादर करतात. तीळ, गूळ, नैवाद्य अग्नीला अर्पण करतात. बाधित होणाऱ्या थंडीपासून सुटका व आल्हाददायक, लाभदायी अशा थंडीला सुरुवात होते, म्हणून हर्षउत्सवात अशा थंडीचे स्वागत म्हणून लोहोरी साजरी करतात.
महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची शेतात साजरी होणारी येळ (वेळ) अमावस्या याच कालावधीत येते. नवीन येणाऱ्या धान्यांची, अन्नाची पूजा केली जाते. शास्त्रीयदृष्ट्याही या कालावधीला महत्त्व आहे. या कालावधीतील सकाळच्या वेळेस हवेत ऑक्सीजनचे प्रमाण अधिक तर ओझोनचा थर अतिशय शुद्ध असतो. म्हणून तर आहार-विहार जाणीवपूर्वक केला जातो. त्या दिवसानंतर म्हणजे मकरसंक्रांतीनंतर पृथ्वीचा दक्षिण गोलार्धातील भाग हळूहळू सूर्यापासून दूर तर विषुववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातील भाग पुन्हा सूर्यासमोर अधिक येणे म्हणजेच पृथ्वीचे उत्तरायण चालू होते.
आता या सततच्या नेहमीच्या कालचक्रानुसार वर स्पष्ट केल्याप्रमाणे निसर्गनिर्मित घडामोडी बरोबरच उत्तर ध्रुवावरील बर्फाळ, आर्टिक्ट, अतिथंड हवेचे उच्च दाब अक्षवृत्त वर्तुळीय पट्टाही त्यामुळे दक्षिणेकडे म्हणजे रशियन अक्षवृत्तकडे सरकत असतो. त्यामुळे जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थानकडे तेथील थंड हवाही भारताकडे लोटली जाते. परिणामी, आपल्याकडे जम्मू काश्मीरमध्ये अतिथंडी व बर्फ पडते. पश्चिम झंजावातबरोबरच या सैबेरिअन चिलच्या थंडी स्थलांतरामुळे अर्ध भारतात उत्तरेकडे थंडी वाढण्याचे हेही एक प्रमुख कारण असते. म्हणून पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांच्या काही भागात सध्या सकाळच्या वेळी धुक्याची चादर तर काही भागात अती नव्हे पण थंडीची लाट जाणवत आहे.
सध्या आज या भागात पहाटेचे किमान तापमान 2 ते 5 डिग्री सेंटिग्रेड दरम्यान जाणवत आहे. पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा 1 ते 4 डिग्रीने तेथे कमी आहे. याच पंजाब, हरियाणा, राजस्थान भागात समुद्रसपाटीपासून साडे बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी 250 ते 280 किमी असे वेगवान प्रवाही झोताचे पश्चिमी वारे पूर्वेकडे वाहत आहे. साहजिकच त्या खालील पातळीत असलेली थंडी दाबली गेल्यामुळे उत्तर भारतातील थंडी टिकून आहे. उत्तरेकडूनही थंड वारे महाराष्ट्रात घुसतात. म्हणून संक्रांती दरम्यान व नंतर आठवडाभर चांगल्या थंडीची अपेक्षा करू या! पंजाब, हरियाणा राज्यात सकाळी, संध्याकाळी धुक्याच्या दाट चादरीत लपेटलेले आहे. त्यामुळे दृश्यमानता 25 ते 50 मीटरवर येऊन ठेपली आहे. पुढील पाच दिवसात काही भागात भू-स्फटीकरणाचीही शक्यताही नाकारता येत नाही.
मीडियाद्वारे सध्या महाराष्ट्रात थंडीबाबतचा ओरडा कानी ऐकू येत आहे. जरी एव्हढा ओरडा असला तरीही म्हणजे सध्या थंडी जाणवते आहे, असे जरी वाचनात किंवा कानावर ऐकू येत आहे. सध्याचे पहाटेचे व दुपारचे असे दोन्हीही किमान व कमाल तापमाने अजूनही दरवर्षी या कालावधीत जशी असावी तशी त्यांच्या सरासरी तापमानाच्या पातळीत नसून, ते अधिकच आहे. खरं तर थंडी चाचपण्याच्या नादात आपणही चालू कालावधी हा एल-निनोचा आहे, हे विसरत आहोत.
जागतिक पातळीवरील सध्य: वातावरणीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जी थंडी असावी तशी आहे. थंडीच्या चर्चेला वाव उपलब्ध होतो आहे, हेच खूप आहे, हे ही ध्यानात घ्यावे. त्यातही आता, बुधवार (दि. 17 जानेवारी) व गुरुवारी (दि. 18 जानेवारी) विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली या दाेन जिल्ह्यात तर पुन्हा काहीसे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून तेथील थंडी दाेन दिवसांसाठी घालवली जाईल.
संक्रांतीदरम्यानच्या या काळात थंडी जाणवणार असली तरी सध्या 17 ते 21 जानेवारी 2024 पर्यंतच्या पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान 12 डिग्री सेंटिग्रेड (सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक ) तर दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 डिग्री सेंटिग्रेड (म्हणजे सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने अधिक) दरम्यानचे असू शकते. खानदेशसह उत्तर महाराष्ट्रातील शहरांत पहाटेचे किमान तापमान एकांकी संख्येवर आले आहेत.
सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसून, रब्बी हंगामातील भरडधान्य शेतपिके व इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नाही. या कालावधीत ही रब्बी पिके फलधारणेच्या म्हणजे दाणा भरण्याच्या अवस्थेत तर काही हुरडा अवस्थेत आहेत. म्हणून तर या कालावधीत पिकांच्या मुळान्ना वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा व जमिनीच्या वर पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकरसंक्रांतीदरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो. इतर प्रणालीतून वातावरणीय अडथळाविना नेहमी असतो तसा स्वच्छ थंडीचा काळ शेतीसाठी महत्त्वाचा मानला जातो व तो सूर्यप्रकाश सध्या मिळतो आहे.