Paraboiled rice, Export duty : पॅराबाॅईल्ड तांदळावरील निर्यात शुल्काला मुदतवाढ
1 min readदेशांतर्गत किरकाेळ बाजारात पॅराबाईल्ड तांदळाचे दर वधारायला सुरुवात हाेताच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. त्यामुळे पॅराबाईल्ड तांदळाचे निर्यात मूल्य (Export price) 20 टक्क्यांनी वाढणार असल्याने तांदळाचे भारतीय निर्यातदार अडचणीत आले आहे. शिवाय, या निर्यात शुल्कामुळे पॅराबाॅईल्ड तांदळाची निर्यात मंदावणार असल्याचे संकेतही काही निर्यातदारांनी दिले. दरातील हा 20 टक्क्यांचा फरक भरून काढण्यासाठी निर्यातदार 20 टक्के कमी दराने पॅराबाईल्ड तांदळाची खरेदी करतील. त्यामुळे राईस मिल मालकांना आर्थिक नुकसान साेसावे लागणार आहे. दुसरीकडे देशांतर्गत किरकाेळ बाजारातील पॅराबाॅईल्ड तांदळाच्या किमती फारशा कमी झाल्याचेही दिसून येत नाही. त्यामुळे अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात येणारे विविध बंधने आणि घेतले जाणारे सरकारी निर्णय शेतकरी व ग्राहक विराेधी असल्याचे स्पष्ट झाले व हाेत आहे. दुसरीकडे, सरकारला कमी दरात तांदूळ खरेदी करता येईल.
केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली हाेती. त्यानंतर जुलै 2023 मध्ये नॉन-बासमती पांढर्या तांदळाची निर्यातीवर बंदी घातली. साेबतच पॅराबाईल्ड तांदळावरील निर्यात शुल्काची मुदत 25 ऑगस्ट 2023 पर्यंत असताना त्याला आधी 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत व नंतर 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 25 ऑगस्ट 2023 पूर्वी LEO (Let export order – निर्यात ऑर्डर) मंजूर नसलेल्या आणि वैध LCs (Letter of Credit) द्वारे समर्थित असलेल्या सीमाशुल्क बंदरांमध्ये असलेल्या पॅराबाॅईल्ड तांदळाला यात सूट दिली हाेती. केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घातल असून, ती अजूनही कायम आहे.
भारतात दरवर्षी सरासरी 20 लाख टन पॅराबाॅईल्ड तांदळाचा खाण्यासाठी वापर केला जाताे. विशेष म्हणजे, हा तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थे (PDS – Public Distribution System)द्वारे वितरीत केला जात नाही. हा तांदूळ खाणारा विशिष्ट वर्ग असून, हा वर्ग सधन आहे. भारताने सन 2022 मध्ये 74 लाख टन पॅराबाईल्ड तांदूळ निर्यात केला हाेता. भारतात पॅराबाॅईल्ड तांदळाची मागणी मर्यादित असतानाही केंद्र सरकारने या तांदळावर निर्यात शुल्क लादला. इतर तृणधान्याचे दर वाढल्याने पॅराबाॅईल्ड तांदळाचा वापर वाढल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हा निर्णय जाहीर करतेवेळी दिले हाेते. मात्र, तृणधान्याला पर्याय म्हणून पॅराबाॅईल्ड तांदळाचा वापर वाढताे, असे म्हणणे संयुक्तिक नाही. जर ते खरं असतं तर केंद्र सरकारने हा तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून दिला असता.
भारतातून निर्यात हाेणाऱ्या एकूण तांदळापैकी 25 टक्के तांदूळ नाॅन बासमती व पॅराबाॅईल्ड तांदूळ निर्यात केला जाताे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत सुमारे 15.54 लाख टन नाॅन बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यात आला. एप्रिल ते जून 2022 मध्ये ही निर्यात 11.55 लाख टन एवढी हाेती. निर्यात वाढल्याने नाॅन बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. भारताने सन 2022-23 मध्ये 45.6 लाख टन बासमती तांदळाची निर्यात केली हाेती. या तांदळाची एकूण किंमत ही 4.8 अब्ज डाॅलर एवढी होती. याच वर्षात 177.9 लाख टन नाॅन बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली असून, त्याची किंमत 6.36 अब्ज डाॅलर एवढी हाेती.
गेल्या वर्षभरात भारतात सतत्याने उच्च चलनवाढ झाली. या चलनवाढीचा दर जुलै 2023 मध्ये 7.8 टक्क्यांपर्यंत पाेहाेचला हाेता. त्यातच केंद्र सरकारने किरकाेळ बाजारातील तांदळाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक पावले उचलली. सन 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये तांदळाच्या किरकाेळ बाजारातील किमती 13 टक्क्यांनी अधिक असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत नमूद आहे. कृषी निविष्ठांचे दर वाढल्यााने तांदळाचा उत्पादनखर्च किती वाढला, हे मात्र केंद्र सरकार व शहरी ग्राहक विचारात घेत नाही. दुसरीकडे, निर्यात शुल्काला मुदतवाढ देण्यात आल्याने निर्यातदारांनी तांदळाची खरेदी थांबविली आहे. त्यामुळे पॅराबाॅईल्ड तांदळाच्या दरात घसरण बघायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये धानाच्या कापणीला सुरुवात झाली असून, महिनाभरात नवीन तांदूळ बाजारात येईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नवीन हंगामातील तांदळाचे दर दबावात येणार आहेत.