Bangladesh textile exporter : बांगलादेश क्रमांक-1 चा कापड निर्यातदार देश बनण्याच्या मार्गावर
1 min read🌎 कापसाचा वापर वाढणार
बांगलादेशातून सुती कापडाची निर्यात (export) सातत्याने वाढत असल्याने तिथे कापसाचा वापर वाढणार आहे. सन 2023-24 या वर्षात बांगलादेशात कापसाचा वापर हा 80 लाख गाठींवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बांगलादेश कापड निर्यातदार देशांतमध्ये अव्वल असलेल्या चीनला मागे टाकून सर्वात माेठा कापड निर्यातदार देश हाेण्याच्या मार्गावर आहे. फॅब्रिक आणि कापड यासाठी बांगलादेशला लागणारे कापूस (रुई) व सूत याचे देशातच उत्पादन करण्याचा प्रयत्नही बांगलादेश सरकार करीत आहे. त्यामुळे बांगलादेशच्या आर्थिक वाढीसाठी तसेच कापड निर्यातीतून अमेरिकन डॉलर्स मिळवून देशांतर्गत चलन स्थिर करण्यासाठी वस्त्र निर्यात महत्त्वपूर्ण भूमिक निभावणार आहे.
🌎 कापडाची निर्यात
बांगलादेशचे आर्थिक वर्ष 2023 (जून 2022-जुलै 2023)मध्ये एकूण उत्पादनाच्या 80 टक्क्यांहून अधिक कापडाची निर्यात करण्यात आली. ही निर्यात 47 अब्ज डाॅलरची हाेती. हे मूल्य दशकापूर्वीच्या आकड्यापेक्षा दुप्पट आहे आणि मागील वर्षाच्या विक्रमाला मागे टाकणारे आहे. 2023-24 मध्ये ही निर्यात 50 अब्ज डाॅलर करण्याचे उद्दिष्ट बांगलादेश सरकारने ठेवले आहे. त्याअनुषंगाने तेथील सूत गिरण्यांचे परिचालन दर वाढण्याच्या दृष्टीने नियाेजन केले जात आहे. बांगलादेशातील कापडाला जागतिक आयातदारांची वाढती पसंती आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कापसाचा वापर हा 5.8 टक्क्यांची वाढणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. बांगलादेशने त्यांच्या कापड निर्यातीतील सातत्य आणि कापडाचा दर्जा टिकवून ठेवला आहे. त्यामुळे गेल्या दशकात त्याचे मूल्य जवळपास तिप्पट झाले आहे. स्थानिक कापड गिरण्या विणलेल्या कापडांची 85 टक्के मागणी पूर्ण करतात आणि विणलेल्या कापडाची सुमारे 40 टक्के मागणी प्रामुख्याने चीनमधून आयात करतात. यूएसडीएच्या अहवालानुसार विणलेले कॉटन शर्ट आणि स्वेटर ही अलीकडील विक्रमी मूल्यांमध्ये योगदान देणारी महत्त्वपूर्ण उत्पादने ठरली आहेत.
🌎 प्रमुख पुरवठादार देश
सन 2022 मध्ये अमेरिका (युनायटेड स्टेट्स) आणि युरोपियन युनियन सारख्या जगातील सर्वात मोठ्या आयात करणार्या बाजारपेठांमध्ये पोशाखांची निर्यात लक्षणीयरित्या जास्त होती. यूएस फॅशन कंपन्या उईघुर सक्ती कामगार प्रतिबंध कायदा, चिनी पोशाख निर्यातीवरील चीन कलम 301 टॅरिफ आणि लॉजिस्टिक आणि राजकीय जोखीम कमी करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून बांगलादेशसह बाजारपेठांमध्ये सोर्सिंग ऑर्डरचे पुन्हा वाटप करत आहेत. बांगलादेश, भारत आणि व्हिएतनाम हे तीन पुरवठादार म्हणून ओळखले गेले होते. जे किरकोळ विक्रेते पुढील दोन वर्षांमध्ये सोर्सिंग वाढवण्याची योजना आखतात. शिवाय, बांगलादेश हा खर्चाच्या रचनेच्या दृष्टिकोनातून तसेच कापड गुणवत्तेत सर्वात स्पर्धात्मक पोशाख पुरवठादार आहे.
🌎 कापड निर्यातीतील वाटा
सन 2021-22 मध्ये उच्च दर्जाच्या कापड निर्यातीत चीनचा वाटा 39 टक्के, बांगलादेशचा 14 टक्के आणि व्हिएतनामचा वाटा 13 टक्के तर भारताचा वाटा 4 टक्के होता. सन 2022-23 मध्ये ही परिस्थिती बदलली आणि बांगलादेशने उच्च दर्जाच्या कापड उत्पादन व निर्यातीत उचल घेत चीनशी बरोबरी साधली. या विशेष तिन्ही देशांना भारत कापूस व सूताचा दरवर्षी पुरवठा करतो.
🌎 भारताला कापूस निर्यातीची संधी
भारत हा बांगलादेशचा प्रमुख कापूस पुरवठादार देश आहे. बांगलादेशातील कापडाची निर्यात वाढल्याने त्यांना कापसाची माेठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. ही पूर्ण करण्याची क्षमता भारतात असून, भारताने ती कॅश करून कापसाची निर्यात वाढविणे आवश्यक आहे. भारतातून बांगलादेश व इतर देशात किमान 50 लाख गाठी कापसाची निर्यात झाल्यास त्याचा लाभ भारतीय कापूस उत्पादकांना हाेऊन त्यांना चांगला दर मिळू शकताे. यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. असे करताना भारत सरकारने देशांतर्गत टेक्सटाईल इंडस्ट्रीज लाॅबीच्या दबावाला बळी पडून शेतकरी विराेधी व आत्मघातकी निर्णय घेऊ नये.