krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Sowing of pulses decreased : डाळवर्गीय पिकांचा पेरा 9.70 लाख हेक्टरने घटला

1 min read
Sowing of pulses decreased : चालू खरीप हंगामात 11 ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 979.88 लाख हेक्टर विविध पिकांची पेरणी व लागवड (Sowing of crops) करण्यात आली असून, मागील वर्षी हे क्षेत्र 972.58 लाख हेक्टर एवढे होते. यावर्षी डाळवर्गीय पिकांचा पेरा मागील वर्षीच्या तुलनेत 9.70 लाख हेक्टरने घटला आहे. देशातील प्रमुख जलाशयाांमधील पाणीसाठाही जवळपास 60 टक्के हाेता. देशभरात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धान (Paddy), भरड तृणधान्य (millets) पेरणी व उसाचे (sugar cane) लागवड क्षेत्र वाढले (increased) असून, कडधान्ये (pulses), तेलबिया (Oilseeds), कापूस (Cotton) आणि ताग/मेस्ताची (Jute/Mesta) पेरणीक्षेत्र घटले (decreased) आहे.

🔆 धान पेरणीक्षेत्र वाढले
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चालू खरीप हंगामात 11 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण देशात धानाचे पेरणी क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेन 5 टक्क्यांनी वाढले असून, ते 328.22 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि आसाममध्ये अद्याप पेरणी कमी आहे. गेल्या वर्षी (सन 2022-23) याच कालावधीत देशभरात 312.80 लाख हेक्टरवर धानाची पेरणी करण्यात आली हाेती. चालू खरीप हंगामात ओडिशात 18.97 लाख हेक्‍टरवर धानाची पेरणी करण्यात आली असून, मागील वर्षी क्षेत्र 20.35 लाख हेक्‍टर होते. आंध्र प्रदेशात 6.86 हेक्टरमध्ये धानाची पेरणी करण्यात आली असून, मागील वर्षी हे क्षेत्र 8.28 लाख हेक्टर हाेते. आसाममध्येही 14.92 लाख हेक्टरवर धानाची पेरणी करण्यात आली असून, मागील वर्षी 16.25 लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली हाेती. उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये 95 टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात धानाची पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये कमी पावसामुळे 11 ऑगस्ट 2023 पर्यंत केवळ 40 टक्के भागात धानाची पेरणी झाली आहे.

🔆 कडधान्ये क्षेत्र घटले
भारतीय हवामान विभागाच्या (IMD – India Meteorological Department) ऑगस्टच्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे कडधान्याचे (डाळवर्गीय पिके) पेरणी क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी 8 टक्क्यांनी घटले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या प्रमुख कडधान्य उत्पादक राज्यांमध्ये जूनमधील कमी पावसामुळे पेरणी उशिरा झाली. नंतर पाऊस वाढल्याने या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी एकूण क्षेत्र 9.70 लाख हेक्टरने कमी आहे. मागच्या वर्षी 122.77 हेक्टरमध्ये विविध कडधान्य पिकांची पेरणी करण्यात आली हाेती तर यावर्षी हे क्षेत्र 113.07 लाख हेक्टरवर स्थिरावले आहे. देशात तुरीचा पेरा 5.35 टक्के, उडीद 13.4 टक्के आणि मुगाचे पेरणीक्षेत्र 7.2 टक्क्यांनी घटले आहे. गेल्या काही महिन्यात तूर डाळीच्या किरकोळ दरात वाढ झाली आहे. ही वाढ 32 टक्क्यांची असल्याचे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने स्पष्ट केले आहे.

🔆 भरडधान्यात वाढ व तेलबियात घट
चालू खरीप हंगामात भरड तृणधान्याखालील क्षेत्रात 3.63 लाख हेक्टरने वाढ झाली असून, ते 171.36 लाख हेक्टरवर पाेहाेचले आहे. मागील वर्षी देशभरात 167.73 लाख हेक्टरमध्ये भरड तृणधान्य पिकांची पेरणी करण्यात आली हाेती. तेलबिया पिकांचे पेरणी क्षेत्र 1.28 लाख हेक्टरने घटले आहे. यावर्षी देशभरात 183.33 लाख हेक्टरवर विविध तेलबिया पिकांची पेरणी करण्यात आली असून, मागील वर्षी हे क्षेत्र 184.61 लाख हेक्टर एवढे हाेते.

🔆 कापूस, तागाचे क्षेत्र घटले तर उसाचे क्षेत्र वाढले
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे लागवड क्षेत्र 1.25 लाख हेक्टरने घटले आहे. मागील वर्षी देशात 122.53 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड करण्यात आली हाेती तर यावर्षी हे क्षेत्र 121.28 हेक्टरवर स्थिरावले आहे. उसाच्या क्षेत्रात 0.86 लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मागील वर्षी 55.20 लाख हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली हाेती तर यावर्षी हे क्षेत्र 56.06 लाख हेक्टर एवढे आहे. ताग/मेस्ताची पेरणी 6.56 लाख हेक्टरवर करण्यात आली असून, मागील वर्षी हे क्षेत्र 6.95 लाख हेक्टर हाेते. त्यामुळे ताग/मेस्ताचे पेरणीक्षेत्रीही 0.39 लाख हेक्टरने घटले आहे. देशभरातील कापूस, भरड तृणधान्ये, ऊस आणि तेलबियांच्या विविध पिकांची पेरणी जवळपास संपली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!