krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

El-Nino, Rain : वर्ष एल-निनोचे, पण जुलैचा पाऊस असंगत?

1 min read
El-Nino, Rain : एल-निनो (El-Nino) म्हणजे यावर्षी पावसाचे (Rain) काही खरे नाही, एल-निनो म्हणजे दुष्काळ (Drought), एल-निनो म्हणजे पावसाची टंचाई (Scarcity of rain), एल-निनो म्हणजे कमी पाऊस (less rain), अशीच धारणा सर्वसामान्यांच्या मनात माध्यमांद्वारे बिंबवली गेली. कारण ज्या पद्धतीने गेले पाच महिने माध्यमांना उपलब्ध स्रोताद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे हा डांगोरा पिटला गेला, त्याचाच हा परिणाम समजावा. मात्र, जुलै महिन्यात काेसळलेल्या पावसामुळे ही धारणा असंगत वाटायला लागली आहे.

🔆 पावसाची कामगिरी असामाधानकारक
आतापर्यंत कोकण व घाट माथ्यावरच कोसळणाऱ्या मान्सूनने मागील पंधरवड्यापासून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काहीशी सुरुवात केल्याचे जाणवले. पण त्यात विशेष जोर दिसत नाही. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या वर्षाच्छायेच्या प्रदेशात मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेतून साधारण पाऊस पडला आणि शेतकऱ्यांना दिलासा वाटला. परंतु, विशेष व्यापक क्षेत्र ओलांडत जोरदार पाऊस या भागात झालाच नाही. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाबाबत उदासीनच जाणवत आहे. भलेही कोकण व विदर्भात (मुंबई, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि नांदेड व खानदेश) जोरदार पाऊस झाला. पण नंदुरबार, धुळे, जळगाव वगळता मध्य महाराष्ट्रात या पावसाची हजेरी साधारणच राहिली. नांदेड वगळता मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अजूनही समाधानकारक नाही.

🔆 अरबी समुद्र, बंगालचा उपसागर
सह्याद्रीच्या पूर्वेकडील पायथ्यापासून म्हणजे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर शहरांकडून पूर्वेकडे जाताना आपण विचार केल्यास प्रथम वेरूळचे डोंगर, नंतर बालाघाट डोंगर रांगानंतर औंध व जतच्या पठारापर्यंतचा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, खुलताबाद, गंगापूर, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, आष्टी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा ते दक्षिणेकडे सांगली जिल्ह्यातील जतपर्यंत दक्षिणोत्तर सीमारेषा निश्चित केली तर तेथपर्यंत अरबी समुद्रातील मान्सून छायेचा पाऊस पडतो. त्या सीमारेषेपुढे मात्र मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात मान्सूनच्या बंगालच्या उपसागरातील शाखेद्वारे चांगला पाऊस पडत असतो. म्हणूनच या एल-निनोच्या वर्षात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दुष्काळी पट्ट्यातील या भागात जूनपासूनच पाऊस कमी पडला.

🔆 ला-निना आणि एल-निनो
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील ह्या कमी पावसाच्या दुष्काळी वर्षाच्छायेच्या प्रदेशात 2020 ते 2022 या तीन वर्षांत ला-निना (La Nina) होता आणि तेथे नेहमी अधिक पाऊस पडणाऱ्या कोकण व पूर्व विदर्भ अशा पावसाळी प्रदेशापेक्षा अधिक तीव्रतेने पाऊस पडला, असे जाणवले. ला-निना काळात अधिक पाऊस असतोच, पण तो दुष्काळी पट्ट्यात मात्र अधिकच जाणवतो. तर एल-निनो वर्षात मात्र पाऊस फारच कमी जाणवतो. पण दुष्काळी पट्ट्यात तो जवळपास नसतोच. खरं तर हा सुद्धा अलीकडील ला-निना व एल-निनो वर्षात निरीक्षणास आलेला एक महत्त्वाचा फरक जाणवत आहे. या वर्षी मान्सून काळातील गेल्या दाेन महिन्यांत महाराष्ट्रासाठी पावसाची शक्यता कमीच राहिली. खरं तर हाही एक नकारात्मक वातावरणीय बदल समजावा. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजे 16 जुलैला 10 ते 12 दिवसांसाठी तर पुन्हा 23 जुलैला आठवड्यासाठी महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे भाकिताचा कालावधी साधारण 29-30 जुलैला संपत आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरू शकतो, असे वाटते. पुन्हा 1 ऑगस्टला, ऑगस्ट महिन्यासाठी सुधारित अंदाज वर्तवला जाईलच. परंतु, मुंबईसह महाराष्ट्रातील कोकणपट्टी, सह्याद्रीचा घाटमाथा फक्त याच ठिकाणी पावसाने धुमाकूळ घालून जुलैचा दुसरा पंधरवडा गाजवला.

🔆 गोंधळाची स्थिती कशामुळे?
आता सर्वसामान्यांच्या मनात यावर्षी जुलै महिन्यात कोकणात अति पाऊस तर दुष्काळी पट्ट्यात नगण्य पाऊस, यामुळे त्यांच्या मनातील गोंधळाची स्थिती आपण समजू शकतो. पण त्यात त्यांची तरी काय चूक आहे? मुंबई, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, खानदेशात कोसळलेल्या पावसामुळे महापूर, भू-घसरण, रस्ते, पूल खचणे, पिके वाहून जाणे, घरांची पडझड यामुळे भयभीत झालेल्या व त्या भागातील नागरिकांना एकप्रकारे अनपेक्षित धक्काच बसला आहे. कारण त्यांच्या मनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा उलट प्रकार नाही का? तर हा उलट प्रकार कसा? असे वाटू लागले. याउलट विदर्भातील (बुलडाणा, वर्धा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा) अशा सात, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर अशा सात तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा सात मिळून 21 जिल्ह्यांतील लोकांना संपूर्ण जून महिना व जुलैचे 25 दिवस उलटून गेले तरी समाधानकारक पाऊस नाही. काही ठिकाणी पेर नाही, त्या भागातील शेतकरी म्हणू लागले की, ठीक आहे एल-निनोचे वर्ष आहे. पण, आयओडी(Indian Ocean Dipole)चा आधार घेऊन हवामान खात्याचा जुलै महिन्यातील महाराष्ट्रासाठीचा पावसाचा अंदाज हा सरासरीपेक्षा अधिक असा घोषित आहे. मग हे कसे? पण आता कुठेतरी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जेमतेम पाऊस पडला. पण तोही समाधानकारक नाही. अशा गोंधळाच्या स्थितीत माध्यमांनाही काही उमजेना. एल-निनो खोटा की हवामान खात्याचा किंवा जागतिक संशोधन संस्थांनी विविध मॉडेलद्वारे दिलेली माहिती चूक समजावी?

🔆 हवामान खाते चुकलेले नाही!
जुलैसाठी नेमका काय अंदाज वर्तवला होता आणि प्रत्यक्षात काय घडतेय, याची सांगड त्यांना घालता येईना. या गदारोळात बारकाईने वस्तुस्थिती अभ्यासली तर कोणीच चूक नाही. भारतीय हवामान खाते तर मुळीच चूक नाही. गफलत होते ती माध्यमांची. त्यांनी समजून घेतलेली अपूर्ण माहिती आणि सर्वसामान्यापुढे आलेली अर्धवट माहिती हेच त्याचे कारण होय. उदाहरणदाखल जुलै महिन्याचा अंदाज व झालेला पाऊस याचे वास्तव समजून घेऊ या! नेमका घोळ कोठे होतो आहे, ते कळेल. भारतीय हवामान खात्याने लघुपल्ल्याचा अंदाज वर्तवतांना महाराष्ट्रासाठी जुलै महिन्यासाठी पावसाचा अंदाज 1 जुलैला व्यक्त केला. तो वर्तवताना म्हटले की, यावर्षी 2023 च्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात दरवर्षी जुलै महिन्यात जसा पडतो तसा पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार मुंबई, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड आणि खानदेशात सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस पडला. जनजीवन विस्कळीत झाले. तर वर उल्लेखित विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील प्रत्येकी सात अशा 21 जिल्ह्यांतील लोकांना संपूर्ण जून महिना व जुलैचे 25 दिवस उलटून गेले तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित झाले. जुलै 25 पर्यंत जुलै महिन्यातील पावसाची सरासरीपेक्षा कमी दाखवणारी तूट एकाएकी 27 जुलैला भरून निघून महिना संपण्यासाठी 4 दिवस अगोदरच महाराष्ट्रासाठी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. म्हणजे येथे जुलै महिन्याचा अंदाज बरोबर ठरला.

🔆 पावसाचे प्रमाण आणि वितरण
आता मुंबईतील नागरिक ज्या अतिपावसाने वैतागून एल-निनोवर तर दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी ज्या कमी पावसाच्या टंचाईमुळे जुलै महिन्यासाठी व्यक्त केल्या गेलेल्या अंदाजबाबत शंका घेऊ लागलेत. त्यांना सांगण्यात आले की, भाकिताप्रमाणे पाऊस झाला. परंतु, दोन्ही ठिकाणच्या नागरिकांना ज्या पद्धतीने जुलै महिन्यात पाऊस पडला, त्या पावसामुळे त्यांना सुखासीनता मिळाली नाही. कारण पावसाची आकडेवारी जरी सरासरी अंकाला साजेशी ठरली तरी पडलेल्या पावसाचे वितरण अयोग्य व असमान झाल्यामुळे हा गैरसमाज झाला. आणि गोंधळाचे हेच खरे वास्तव आहे. यामध्ये पाऊस किती पडला, यापेक्षा पाऊस कसा पडला, म्हणजेच पावसाचे वितरण कसे झाले, हे महत्त्वाचे असते. एखाद्या वर्षी भलेही पाऊस हा सरासरीपेक्षा कमी होऊ दे, पण त्याचे वितरण जर योग्य व समान झाले तर त्या वर्षाचा किंवा महिन्याचा तो पाऊस शेतीसाठी, भू-जलपातळी वाढीसाठी सरासरीपेक्षा अधिक पडल्यासारखाच असतो. एकूणच सामान्य जनजीवनासाठी ते लाभदायक ठरते. पावसाचे योग्य वितरण म्हणजे अधिक कालावधीत कमी तीव्रतेचा पण उघड-झाक करत सातत्य ठेवून पडणारा पाऊस होय. अर्थात ते आपल्या किंवा अंदाज व्यक्त करणाऱ्या तज्ज्ञांच्याही हातात नसते. कारण निसर्ग त्या त्या भागाच्या, ठिकाणच्या भौगोलिक रचनेनुसारच त्या त्या ठिकाणी पाऊस देत असतो. थोडक्यात हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजाच्या खाचाखोचाही सर्वसामान्यांनी सखोल समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे या निमित्ताने विशद करावेसे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!