Bogus Fertilizers : बोगस रासायनिक खते; नुकसानीला जबाबदार कोण?
1 min readआपल्या घरामध्ये अनेक उच्चशिक्षित मुलं मुली आहेत. समाजामध्ये भरपूर सुज्ञ लोक आहेत मात्र आपण कोणाचे काही ऐकून घेत नाही. आपल्या अडाणीपणाचा साधेपणाचा हे कृषी केंद्र विक्रेते (काही अपवाद सोडून) पुरेपूर फायदा घेत असतात तसे पाहिले तर प्रत्येक गावामध्ये शासनाने कृषी सहायक म्हणून एक अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे, आपण त्या अधिकाऱ्याचा विचार घेत नाही काही ठिकाणी हे अधिकारी कुचकामी ठरतात काही (सन्माननीय अपवाद वगळता) हे अधिकारी या कृषी सेवा केंद्र चालकांशी (डुप्लिकेट औषध व खत विकणाऱ्या) मिळलेले असतात कुऱ्हाड, मोयखेडा, ढालसिंगी, फत्तेपूर, खंडवा ,मांडवा राजनी, कापूसवाडी ,वघारी, वडगाव, ओझर, नागणचौकी अशा अनेक गावांमध्ये हजारो शेतकऱ्यांचे कापूस पीक सरदार कंपनीच्या निकृष्ट दर्जाचे खत वापरल्याने खराब झालेले आहे, यात शासन, प्रशासन, कृषी केंद्र चालक, बोगस कंपन्या, या बोगस कंपन्यांना चालना देण्यासाठी असणारे सर्व घटक जबाबदार आहेत, तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक दुकानदाराला ताकीद दिली पाहिजे, त्याचं दुकान चेक केले पाहिजे, मात्र असे होत नाही.
काही ठिकाणी खोटी खोटी चेकिंग करून एखादा अधिकारी चिरीमिरी घेऊन गप्प बसून जातो आणि मग हा कृषी केंद्र चालक आपल्याच भावकीतील आपल्याच शेतकरी वर्गाला फसवायला मोकळा होऊन जातो, खर म्हणजे शेतकऱ्यांच्या लुटीची अनेक कारण आहेत, शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले काळे कायदे, सरकारचे चुकीचे धोरण, तसेच आता लुटीमध्ये नवीन सहभागी झालेला कृषी केंद्र चालक बोगस कंपन्या व वितरक, भ्रष्टाचारी यंत्रणा अशा अनेकविध घटक शेतकऱ्याला लुबाळण्यासाठी बसलेले आहेत, मात्र मला खंत एका गोष्टीची वाटते माझ्या शेतकऱ्याच्या मुलाला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या नेत्याचा बायोडाटा पाठ असतो नेत्याबद्दलची सगळीच माहिती असते मात्र आपल्या बापाचा सातबारा त्याला माहीत नसतो. आपण शेतामध्ये काय पेरतोय, कुठल्या कंपनीचे घेतोय, कुठलं खत टाकतोय, कुठलं रसायन फवारतोय, या गोष्टीचं त्याला काहीच घेणं देणं नसतं आणि म्हणूनच आपण फसतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण लक्षात कोण घेणार क्रिकेटच्या चेंडूवर आणि नेत्याच्या भाषणावर टाळ्या वाजवणाऱ्या अवलादी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आल्या आणि समस्त शेतकरी समाजाचा सत्यानाश झाला. आपल्या शेतामध्ये वापरत असणारे रसायनामध्ये कुठला घटक आहे त्याच्यामुळे काय होतं काय फायदा आणि काय नुकसान होणार आहे यावर सविस्तर चर्चा झाल्या पाहिजे, हुशार अभ्यासू अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतीनिष्ठ शेती तज्ञांज्ञी संवाद साधून आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे.
रासायनिक खतामध्ये कोणते मुख्य घटक आहेत, यापासून आपल्या शेतीला काय नुकसान काय फायदा होईल, याचा विचार केला पाहिजे यामध्ये अनेक सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून मिश्र खत तयार केले जाते काही प्रमाणित कंपन्या त्या प्रामाणिकपणे काम करून त्यामधील अधिकारी आपण शेतकऱ्यांचे देणे लागतो म्हणून चांगल्या प्रकारचं खत तयार करतात तर काही कंपन्या निव्वळ नफा कसा कमावता येईल या तत्त्वावर खते तयार करून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतात, या गोष्टीला शासन व प्रशासन आणि निद्रिस्त शेतकरी कारणीभूत आहे तसेच कीटकनाशकांच्या बाबतीत कीटकनाशक, सूत्रकृमीनाशक शेवाळ नाशक, गोगलगायनाशक, तणनाशक, पक्षीनाशक, जिवाणूनाशक, बुरशीनाशक व कोळीनाशक इत्यादी प्रकार आहेत या सर्वांवर अवश्यतेनुसार नियंत्रण करण्यासाठी अनेक कृषी रासायनिक उपलब्ध आहे. मात्र या सर्व रसायनांचा उपयोग किती व कसा करावा याची आपणास पुरेशी माहिती नाही म्हणून ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून किंवा कृषी सेवा केंद्रकाच्या सल्याने रसायन वापरत असतो. आता हे कृषी केंद्र संचालक काही (अपवाद सोडून) खरंच या योग्यतेची आहेत काय? काही कृषी सेवा संचालक काही कृषी अधिकारी काही कृषी कंपन्या खरेच शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या व शेतकऱ्यांच्या बाजूने काम करणारे आहेत, मात्र बहुतांश अधिकारी कृषी केंद्र संचालक कृषी कंपन्या या निव्वळ पैसा कमावण्यासाठी काम करत आहेत आणि अशा लोकांमुळेच या शेतीचं नुकसान झालेलं आहे, आणि आपण हा सगळा प्रकार शांत बसून पाहत आहोत हेचं सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे.