Heavy Rain : पुढील 12 दिवस जोरदार पाऊस
1 min read✳️ मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या 10 तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर ते नांदेडपर्यंतच्या 8 अशा 18 जिल्ह्यात पुढील 12 दिवस म्हणजे गुरुवार दि.27 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. त्यातही मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात मंगळवार दि. 18 जुलै ते गुरुवार दि. 20 जुलै या तीन दिवसात अधिक जोरदार पावसाची शक्यता जाणवते. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात मात्र मुसळधार पडणारा पाऊस सहा दिवसानंतर म्हणजे शनिवार दि. 22 जुलैपासून काहीसा कमी होवून तेथे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता जाणवते.
✳️ महाराष्ट्रातील धरण पाणीसाठा (Dam water storage) आजपावेतो केवळ सरासरी 25 टक्क्यांपर्यंत पोहोचलेला जाणवतो. येत्या 15 दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील तसेच विदर्भातील सर्व धरण क्षेत्रात जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे धरण पाणीसाठा सरासरी 70 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
✳️ पावसाची कारणे
🔆 मान्सूनचा आस सरासरी जागेपासून दक्षिणेकडे सरकण्याच्या शक्यतेबरोबरच
🔆 बंगालच्या उपसागरातील ‘चक्रीय-वारा अभिसरण’ (Cyclical-wind circulation) प्रणालीतून उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल व झारखंड राज्याच्या भूभागावर रविवारी दि. 16 जुलैला तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सहा किमी उंचीपर्यंतचे चक्रीय वारे व त्यांचे वायव्य दिशेने मध्य भारताकडे होणाऱ्या मार्गक्रमण शक्यतेमुळे तसेच
🔆 लगेच बंगालच्या उपसागरात त्या पाठोपाठ त्याच ठिकाणी मंगळवार दि. 18 जुलैला नवीन ‘चक्रीय-वारा अभिसरण’ प्रणालीची निर्मिती व तिचे पुन्हा वायव्य दिशेने मध्य भारताकडे होणाऱ्या मार्गक्रमण शक्यतेमुळे महाराष्ट्रात 10-12 दिवस कमी-अधिक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
✳️ या पावसावरच खरीपातील शेवटच्या टप्प्यातील पेरण्यास तसेच कमी ओलीवरील झालेल्या पेर पिकांना जीवदान व बारगळलेल्या पेरण्यांच्या दुबार पेरणीस मदत होईल, असे वाटते. वातावरणात विशेष काही बदल झाल्यासच मेसेज पाठवला जाईल. अन्यथा दाेन आठवड्यात मान्सूनच्या परिणामाचे निरीक्षण बघावायचे आहे.