krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Psychology : थोडक्यात मानसशास्त्र म्हणजे काय?

1 min read
Psychology : मानस आणि शास्त्र या दोन शब्दांपासून मानसशास्त्र (Psychology) शब्द तयार झाला असावा. मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र. थोडक्यात मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर पणे केला जाणारा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय.

मन प्रत्येकाला आहे, हे अस आपण म्हणत राहतो. परंतु, आजपर्यंत शरीरात मनाचे नेमके स्थान कोठे आहे? हे मात्र आजपर्यंत कोणालाही सांगता आलेलं नाही. त्याचा त्याचा आकार कसा आहे? त्याचा रंग कसा आहे? तो दिसतो कसा? शरीरातल्या नेमक्या कुठल्या भागात राहतो? मृत्यूनंतर मन कुठे जाते? अशा वेगवेगळ्या गोष्टी आजही अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. पण, हे मात्र मान्य करतो की मन आहे. मनाचं अस्तित्व पदोपदी आपल्याला जाणवायला लागतं. शरीराच्या विविध अवयवांकडून कृती घडतात. पायाच्या मदतीने आपण चालतो. हाताच्या मदतीने आपण कामे करतो. डोळ्यांनी पाहतो. कानानी ऐकतो. नाकाने श्वास घेताे. विविध रंगांची जाणीव होते डोळ्यांमुळे. अशा हजारो कृती माणसांच्या अवयवांकडून होतात. याच्या पाठीमागची प्रेरणा कोणती असेल? कोणती नेमकी कोणती शक्ती कार्य करत असेल? याचं वर्णन आपल्याला करायचं झाल्यास मानसशास्त्रीय आधार घ्यावा लागतो. कारण मन हे मानवी वर्तनाचे प्रेरणास्थान आहे. प्रतिष्ठान आहे. माणसाला काम करण्यासाठी नेमकी शक्ती जर कुठून मिळत असेल तर ती त्या व्यक्तीच्या मनात असते, असे मानसशास्त्र सांगते. अशा मनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.

सध्याचे शतक हे मानसशास्त्राच्या शतक मानले जाते. हे असं जरी असलं परंतु याची सुरुवात मात्र खूप अगोदर पासून झालेली दिसते. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकांपासून मानसशास्त्राचा अभ्यास होत आलेला आहे. ग्रीक राज्यात अॅरिस्टाॅटल नावाचा विद्वान, मनाचा अभ्यास करत होता. म्हणून त्याला मानसशास्त्राचा जनक मानले जाते. त्याने आपल्या एका ग्रंथात आत्म्यासंबंधी विचार समाविष्ट केलेले होते. त्याने मानसशास्त्राची व्याख्या सुद्धा केलेली होती. त्याने मानसशास्त्रला आत्म्याचे शास्त्र असे म्हटले होते. म्हणजेच आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी त्याने एक व्याख्या केली होती.

त्याच काळात ग्रीक मधील दुसरा विद्वान प्लेटो याने आपल्या रिपब्लिक नावाच्या ग्रंथात व्यक्तिसंबंधी विचार मांडले. याचा नीटसा विचार केल्यास असे लक्षात येते की, हे विचार मानसशास्त्राला अगदी जवळचे आहेत. पुढे रोमन काळात क्विटिलियन नावाचा एक शिक्षण तज्ज्ञ होऊन गेला. हा माणसाला वक्ता तयार करण्याच्या पद्धतीवर काम करत होता. तो म्हणत वक्ता तयार करायच्या निवडीत व्यक्तीची बुद्धिमत्ता लक्षात घ्यावी लागते. अशाप्रकारे ग्रीक आणि रोमन या दोन राज्यांमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास सुरू होता.

सायकॉलॉजी हा शब्द ‘सायको’ आणि ‘लोगस’ या दोन आर्थिक शब्दांपासून तयार झालेला आहे. सायको म्हणजे आत्मा व लोगस म्हणजे विचार. आत्म्याच्या संबंधी असल्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशासत्र असे सुरुवातीच्या काळात मानले गेले. परंतु, पुढच्या काळात लोकांनी आत्मा म्हणजे काय? आत्मा कुठे राहतो? त्याचे स्वरूप कसे आहे? तो अमर आहे का? याबाबत असंख्य प्रश्न उपस्थित झाले शास्त्राच्या कसोटीवर आत्मा दाखवता येत नसेल तर मग त्यांनी आत्मा शब्द बाजूला सारून त्या जागी मन हा शब्द प्रचलित केला. पुढे मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र न राहता ते पुढे मनाचे शास्त्र बनले. मनाचे शास्त्र बनल्यानंतर ही व्याख्या सुटसुटीत आणि सोपी वाटायला लागली. आत्म्यापेक्षा मन याच्यावर जोर दिल्याने लोकांच्या मनात थोडेसे प्रश्न कमी व्हायला लागले.

पुढे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या सर्वत्र प्रचलित झाली. याच काळात काही लोकांनी मनासोबत अनुभवाला सुद्धा या व्याख्येत स्थान दिले. त्यातून पुढे मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय अशी एक व्याख्या करण्यात आली. पुढे एकोणिसाव्या शतकात शरीरशास्त्र व पदार्थविज्ञान या दोघात झालेली प्रगती मानसशास्त्राच्या विकासाला पोषक ठरली. त्यातूनच पुढे विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञांने जगातली पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि मानसशास्त्र ला प्रयोग शास्त्रीय आधार दिला. त्यात त्याने मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास व निरीक्षण करू लागला. त्यातून पुढे मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र बनले.

मानसशास्त्रज्ञ यांनी ही व्याख्या जरी केली, पुढे बोध अवस्था कशाला म्हणायचे यावर प्रश्न उपस्थित झाले मग ही व्याख्या मागे पडून. पुढे मानवी ‘अबोध’ अवस्था ही खऱ्या अर्थाने मानवी वर्तनाच्या मुळाशी असते, असे सगळ्यात अगोदर फ्रॉइडने मांडले आणि मानसशास्त्राची असलेली दिशा इथून पुढे बदलली गेली. त्याची व्याप्ती वाढली त्याच्यावर वेगळे संशोधन व्हायला लागले. त्याचा इतका जबरदस्त परिणाम झाला की, पुढे साहित्यात लिखाण ही मानसशास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित होऊ लागले. कारण फ्राईड मांडलेली थेअरी प्रचंड ताकतीची होती, त्यातून पुढे एक मोठा वर्ग तयार झाला. शेवटी मानसशास्त्राचा विकास होत मानसशास्त्र हे माणसाच्या वर्तनाशी कसे निगडित आहे, हे दाखवून दिले आणि शेवटी मानसशास्त्र हे माणसाच्या वर्तनाचे शास्त्र बनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!