Agriculture electricity rates : कृषिपंपाच्या वीजदरात भरमसाठ वाढ
1 min read✴️ महसुली तूट व दरवाढ
या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना कायमचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने (State Electricity Regulatory Commissions) महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी या वीज वितरण कंपन्यांचे सन 2023-24 आणि 2024-25 या दाेन वर्षाचे घरगुती (Domestic), कृषी (Agriculture), औद्योगिक (Industrial) आणि वाणिज्यिक (Commercial) दर जाहीर केले आहेत. महसुली तूट (Revenue deficit) भरून काढण्यासाठी या कंपन्यांनी वीज दरवाढीची मागणी केली होती. त्याअनुषंगाने राज्य वीज नियामक आयोगाने त्यांना दरवाढीची परवानगी देत त्यांचे विजेचे दर जाहीर केले. महावितरण कंपनीची महसुली तूट 67,643 हजार कोटी रुपये असून, आयोगाने 39,537 हजार कोटी रुपयांची वाढ मंजूर केली आहे.
✴️ अशी आहे दरवाढ
शेतकऱ्यांच्या लघुदाब कृषिपंपासाठी स्थिर आणि मागणी आकारात 43 रुपये अश्वशक्ती (Horsepower) दर आकारला जात होता. हा दर 2023-24 मध्ये 47 रुपये तर 2024-25 मध्ये 52 रुपये करण्यात आला आहे. शेती आणि इतर कारणासाठी विजेसाठी हॉर्सपॉवर दर 117 रुपये आकारला जात होता. हा दर 2023-24 मध्ये 129 रुपये तर 2024-25 मध्ये 142 रुपये करण्यात आला आहे. टक्केवारीत ही वाढ अनुक्रमे 10.29 आणि 21.37 टक्के आहे. युनिटनुसार दर आकारणी विचारात घेता सध्या लघुदाब कृषिपंपांसाठी 3.30 पैसे प्रति युनिट दर आकारला जात होता. हा 2023-24 मध्ये 4.17 रुपये आणि 2024-25 मध्ये 4.56 रुपये प्रति युनिट दर आकारला व वसूल केला जाणार आहे. शेती व इतर ग्राहकांसाठी सध्या 4.34 रुपये प्रति युनिट दर आकारला जात होता. हा दर 2023-24 मध्ये 6.23 रुपये तर 2024-25 मध्ये 6.88 रुपये करण्यात आला आहे.
✴️ सर्वाधिक वाढ शेतकऱ्यांच्या माथी
उच्चदाब कृषिपंपांसाठी प्रतियुनिट सर्वाधिक दरवाढ करण्यात आली आहे. टक्केवारीत 2023-24 ची दरवाढ ही 38.21 टक्के तर 2024-25 या वर्षासाठी 50.47 टक्के एवढी असेल. शेती व इतर वीज वापरासाठी ही दरवाढ 2023-24 साठी 39.29 टक्के आणि 2024-25 साठी 50.47 टक्के, इतर वीज वापरासाठी 52.3 टक्के असेल. लघुदाब कृषिपंपांसाठी 2023-24 साठी 26.36 टक्के आणि 2024-25 साठी 38.18 टक्के तसेच शेती आणि इतर वीज वापरासाठी 2023-24 साठी ही दरवाढ 34.27 टक्के आणि 2024-25 साठी 48.48 टक्के वाढ करण्यात आली आहे.
✴️ शेतकऱ्यांवर वीजदरवाढीचे संकट
महावितरण कंपनीने सर्वाधिक वीजदरवाढ ही शेतीक्षेत्रासाठी केली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांवर वीजदरवाढीचे मोठे संकट येणार असल्याचे वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरण कंपनीच्या फेरआढावा तथा दरवाढ याचिकेवरील निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार कंपनीला आगामी दोन वर्षात 39,567 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांकडून सक्तीने वसूल केले जाणारे वाढीव वीज बिलाची रक्कम म्हणजेच खरी दरवाढ 21.65 टक्के आहे. आयोगाचा आदेश सर्वसामान्य वीज ग्राहकांना फसवणारा व धूळफेक करणारा आहे. या आदेशाच्या विरोधात विद्युत अपिलीय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे अपील दाखल करून दाद मागण्यात येईल, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी दिली.