krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Saline soil : क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म

1 min read
Saline soil : क्षारयुक्त जमिनींचे (Saline soil) गुणधर्म पुढीलप्रमाणे

🔆 जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो.
🔆 जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.
🔆 विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते.
🔆 उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्‍लोराईड व सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.
🔆 जास्त क्षारांमुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.
🔆 जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.
🔆 पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते.

🟢 क्षारयुक्त जमिनींची सुधारणा
🔆 शेताभोवती खोल चर काढावेत. पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत.
शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.
🔆 सेंद्रिय खतांचा हेक्‍टरी 20 ते 25 टन वापर करावा. जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये.
हिरवळीची पिके ढेंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा.
🔆 भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.
🔆 सेंद्रिय भूसुधारके मळी कंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू नये.
🔆 कषार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी.

🟢 क्षारयुक्त – चोपण जमिनींचे गुणधर्म
🔆 जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी किंवा जास्त असतो.
🔆 जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.
🔆 विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते.
🔆 कॅल्शिअम, मॅग्नेशिअम क्‍लोराईड/सल्फेट + सोडिअमचे क्षार जमिनीत साठतात.
🔆 जमिनीची जडणघडण बिघडते, पिके पिवळी पडून वाढ खुंटते.
🔆 पृष्ठभागावर मातीमिश्रित क्षार रेतीसारखे दिसतात.
पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात पृष्ठभाग तेलकट डागासारखा दिसतो.

🟢 क्षारयुक्त – चोपण जमिनींची सुधारणा
🔆 जमिनीला उतार द्यावा. शेताभोवती खोल चर काढावेत. सच्छिद्र पाइप भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब करावा. सिंचनास चांगले पाणी वापरावे.
🔆 सेंद्रिय खतांचा व जोर खतांचा (निंबोळी पेंड, करंज पेंड इत्यादी) वापर शक्‍यतो जास्त करावा.
🔆 हिरवळीची पिके ढेंचा/ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावे.
🔆 माती परीक्षणानुसार जिप्समची मात्रा आवश्‍यकतेच्या 50 टक्के पहिल्या वर्षी आणि उरलेली मात्रा दोन वर्षांनी सेंद्रिय खतात मिसळून जमिनीच्या वरच्या 20 सें.मी. थरात मिसळावे.
🔆 सेंद्रिय भूसुधारके मळी कंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये. क्षार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी.

🟢 चोपण जमिनींचे गुणधर्म
🔆 जमिनीचा सामू 8.5 पेक्षा जास्त असतो.
जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते.
🔆 विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते.
🔆 जमिनीत सोडिअमचे कार्बोनेट किंवा बायकार्बोनेटबरोबरचे प्रमाण वाढते.
जमिनी पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात अतिशय कडक होतात.
🔆 जमिनीच्या पृष्ठभागावर कडक थर व घट्टपणामुळे बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.
🔆 जमिनीचा पृष्ठभाग राखाडी रंगाचा दिसतो. पृष्ठभाग अतिशय टणक व भेगाळलेला बनतो.

🟢 चोपण जमिनींची सुधारणा
🔆 भूमिगत चरांची व्यवस्था करावी.
🔆 रासायनिक भूसुधारकांचा वापर करताना माती परीक्षण करून जिप्समचा आवश्‍यकतेनुसार वापर करावा. जमिनीत मुक्त चुना दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास (जिप्सम) व जास्त असल्यास (गंधक) यांचा शेणखतातून आवश्‍यकतेनुसार वापर करावा.
🔆 सेंद्रिय खतांचा उदा. शेणखत, कंपोस्ट खतांचा वापर नियमित करावा व सेंद्रिय भूसुधारक मळी कंपोस्टचा वापर नियंत्रित करावा.
🔆 हिरवळीची पिके ढेंचा/ताग 45 ते 50 व्या दिवशी दोन वर्षांतून एकदा गाडावे.
🔆 आम्लयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा. उदा. अमोनिअम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश इत्यादी.
🔆 पिकांना शिफारशीतील नत्राची मात्रा 25 टक्के वाढवून द्यावी.
🔆 माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह (फेरस सल्फेट 25 किलो/हेक्टरी), जस्त (झिंक सल्फेट 20 किलो/हेक्टरी) ही जमिनीत सेंद्रिय खतात मिसळून द्यावीत.
🔆 सबसॉईलरने खोल नांगरट करावी. परंतु रोटाव्हेरटचा वापर करू नये. जमिनीत नेहमी वाफसा असावा.
🔆 पाणी व्यवस्थापन ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीने करावे.
🔆 कषार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी. (समाप्त)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!