Electric shock farmer death : शेतकऱ्यांच्या शाॕक मृत्यूची मालिका संपणार कधी ?
1 min readघटनास्थळीचे डीपी (रोहित्रे) चोरीला गेल्यामुळे सहा महिन्यापासून विद्युत पुरवठा बंद होता. त्यातच सहा दिवसांपूर्वीच नवीन ट्रान्सफाॕर्मर बसवले होते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पिके भिजवायची राहिली होती. त्या ठिकाणी बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये नेहमीप्रमाणे म्हणजे ऑक्टोबरमध्ये पाणी अडवण्यासाठी पाट्या टाकल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पाण्याची पातळी घसरून खाली गेली होती. परिणामी, उपसा करणाऱ्या मोटारी पुढे पाण्यामध्ये सरकवण्याची वेळ आली.
सर्वप्रथम सर्वांचा असा गैरसमज होतो की, शेतकरी नदीमध्ये मोटारी टाकून पाण्याचा अवैध उपसा करतो. पण ही सामूहिक लिफ्ट योजना शासनमान्य असून, शेतकरी पाणीपट्टी पण भरत होते.
डिसेंबर महिन्याच्या लोडशेडिंग वेळापत्रकाप्रमाणे गुरुवारी सकाळी 7.35 ते दुपारी 3.35 पर्यंत अखंड वीजपुरवठा होणे अपेक्षित होते. पण वीजपुरवठा सारखा येत जात होता. ह्या आनियमित चक्रामुळे बहुतेक मोटारी शेतकरी ऑटो स्टार्ट मोडमध्ये ठेवतात.
दुर्घटनाग्रस्त शेतकरी पाण्यात त्यांच्या मीटर पेटीतील फ्युज (किटकॅट) काढून आपल्या सुरक्षेची काळजी घेऊन काम करत होते. अचानक वीज सुरू झाल्यामुळे दुसऱ्या मोटारीच्या तुटलेल्या वायरमधून विद्युत प्रवाह नदीतील पाण्यात शिरला.
खरे तर शॉर्टसर्किट झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होऊन मुख्य विद्युत पुरवठा बंद व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही.
सात दिवस झालेत अजून ऊर्जा खात्याचा अहवाल आलेला नाही. परिपत्रकाप्रमाणे हा अहवाल 24 तासात अपेक्षित आहे. पोलिसांनी फक्त स्थळ पंचनामा /डायरी नोंद केली आहे.
दुर्घटना पंचनाम्यामध्ये तांत्रिक बाजू असल्यामुळे ऊर्जा खात्याच्या अहवालाप्रमाणे एमएसईबी, ऊर्जा खाते व पोलीस खाते हे संयुक्तिकरित्या करतील. तो अजूनही झालेला नाही.
राज्यामध्ये शेतांमध्ये रोहित्रे दुरुस्ती व इतर कामांसाठी एमएसईबी चे वायरमन वेळेवर येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः जोखीम घेऊन इलेक्ट्रिकची कामे करावी लागतात, हे सर्व सर्वश्रूत आहे.
18 डिसेंबरला विद्युत डीपीमध्ये फ्युज टाकताना कैलास डुमे ह्या युवा शेतकऱ्याचा धनज (नेर) येथे मृत्यू झाला. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे विजेची तार तुटून शेतातील पाण्यात वीज प्रवाहामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला अशा बातम्या वारंवार येतात.
पळसखेड (ता. भोकरदन, जिल्हा जालना) येथे जाधव कुटुंबातील तीन भावांचा विहिरीत शॉक लागून मृत्यू झाला होता. भारतात दर वर्षी 11,000 शेतकरी व शेतमजूर शाॕक (Electrocution) लागून मृत्यूमुखी पडतात. जनावरांची तर गणतीच नाही.
अन्नदात्याची शॉक लागून होणाऱ्या मृत्यूची मालिका कधी संपणार?
शहरामध्ये दहीहंडीमध्ये गोविंदाचा मृत्यू झाल्यास वारसास 10 लाख रुपये देता. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत पक्षपात का?
राज्यामध्ये जवळपास 16,608 रोहित्रे नादुरुस्त आहेत. शेतकरी रीतसर कोटेशनची रक्कम भरून सुद्धा 1,80,106 कृषी पंपाच्या वीज जोडण्या कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. याला जबाबदार कोण? पाणी लागलेल्या नवीन बोअरची मोटार सुरू करण्यासाठी मग आकडे टाकले की बोंब मारतात.
निगडे येथील दुर्घटने संदर्भातील मागण्या
प्रत्येक मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई (मदत नाही) देणे.
त्यांच्या एका वारसदाराला शासकीय नोकरी देणे.
अशा घटना इतरत्र होऊ नये, यासाठी तपशीलवार अहवाल तयार करून त्यावर कालमर्यादेत कार्यवाही करणे.
दोषी अधिकाऱ्यांना प्रथम निलंबित करून, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे.
दुरुस्तीसाठी विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यास सुरू करणे.
एकच ध्यास – शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!