Gujarati : गाव प्रेमी गुजराती – ‘गावाकडे चला’
1 min readदिवाळीची सुट्टी सरतेवेळी तिनं मला फोन केला आणि म्हणाली, भूषण दादा आमच्या इथे एक कंपनी सोडा ash प्लांट टाकत आहे. कंपनीमुळे संपूर्ण गाव धोक्यात आले आहे. तसेच कंपनी समुद्रात सांडपाणी सोडणार असून, कोणताच शासकीय वैज्ञानिक हे चुकीचं आहे, असं म्हणायला तयार नाही. उलट अमोनियायुक्त पाणी समुद्रात सोडल्याने येथील जैवविविधता वाढणार आहे, असं ते सांगत आहेत. (जे चुकीचं आहे, पाण्यात अमोनियाचे प्रमाण वाढल्यास पाण्याची प्राणवायू धारण करण्याची क्षमता कमी होते, हे सत्य आहे. जे मी आजवर शिकलो.) काहीतरी करून येथील सागरी किनाऱ्याचा अभ्यास करून आम्हला परिपूर्ण असा अहवाल दे असं ती मला म्हणाली. मग माझ्या सुट्टीतले शेवटचे तीन दिवसात मी जाऊन यायचं ठरवल. तेथील रहिवासी आणि लढ्यातील प्रमुख भरत भाई गाला यांनी माझी जाण्या येण्याची आणि राहण्या-खाण्याची उत्तम व्यवस्था केली होती. मी पहाटे पाच वाजता गांधीधाम येथे पोहोचलो. तिथे कर्षन भाई माझी वाट पाहत होते. ते मला मूळ प्रकल्प बाधित गावात घेऊन आले.
कच्छमध्ये पाऊस तसा कमीच पडतो. पाऊस पडला तरी येथील पाण्याचा tds 700 पर्यंत असतो आणि उन्हाळा येईपर्यंत पाण्यातील क्षाराचे प्रमाण 3200 ppt पर्यंत जातं. पण तरी देखील इथली लोकं रडत नाहीत. उलट येथील लोकांनी गवताची कुरणे, बाभळीची वने जपत भरपूर पशुधन जपले आहे. येथील कित्येक गावात धष्ट पुष्ट गाई आणि बकऱ्या चरताना मी पहिल्या. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो एकर पसरलेली शेती पहिली. बहुतेक शेतकऱ्यांनी येथील जमिनी, पडणारा पाऊस इत्यादी गोष्टी लक्षात घेत पावसाच्या पाण्यावर आणि हिवाळ्यातील दवबिंदू वर होणारी शेती केलेली दिसत होती. कित्येक शेतात एरंडी, कपाशी, ज्वारीचं पीक डोलतना दिसत होतं.
ज्या गुजरातची ओळख कारखानदारी फोफावलेल राज्य म्हणून करून दिली जाते, ती गुजरातची खरी ओळख नसून, गुजरातची खरी ओळख अजूनही एक शेती प्रधान, पशुधन जपणारे राज्य म्हणून आहे, असं मला दिसत होत. हे सारं बघत बघत मी मुख्य प्रकल्प बाधित गावात पोहोचलो. गावात पोहोचताना आमचं स्वागत धष्ट पुष्ट अश्या 300 कंक्रेज जातीच्या गायीनी केलं. उत्तम प्रतीची उत्कृष्ट जनावरे होती ती एक एकीची भारदस्त शिंग आणि अंगा खांद्याने भरलेली जनावरे पाहून खूप आनंद झाला. पुढे थोड अंतर जातो तोच तीन एक हजार मेंढरे धूळ उडवत गेली आणि मी मूळ गावी पोहोचलो.
माझी अंघोळ आणि नाष्टा उरकतो तोच ध्वनी आणि भरत भाई खोलीवर आले. त्यांनी मला आतापर्यंत गाव वाचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सांगितले. या प्रकल्पाला मूळ विरोध का, हे मी विचारलं असता भरत भाई म्हणाले, तुम्ही गावात येताना आमचं पशुधन पाहिलं असेल ना? पाहिलत ना कसं धष्ट पुष्ट आहे. मी म्हणलं हो, मग त्यांच्यासाठी आणि आमच्या सुपीक शेतीसाठी आम्हाला हा प्रकल्प इथे नको आहे. आम्ही आमच्या गावची गवताची कुरणे पिढ्यान् पिढ्या जपली. गावाबाहेरच बाभळीचे जंगल जपलं आणि त्या जंगलांनी आमची जनावरे आणि आमचं गाव जपले आहे. उद्या कंपनी आली तर नेमका हीच गवताची कुरणे आणि जंगल आमच्या जवळून हिरावून घेणार आहे. तब्बल दीड हजार एकर जमीन सदर कंपनीला हवी आहे. सदर कंपनीमध्ये दररोज 600 ट्रक कोळसा, चुना आणि सोडा राख घेऊन येणार आहे. ज्यामुळे कित्येक पटीने कोळशाची राख दररोज आमच्या शेतात जाईल. ज्यामुळे आमची शेत नापीक होतील. या कंपनीचा आमच्याच राज्यात आणखी एक प्लांट आहे, जिथे लाखो टन घन कचरा कंपनी आजूबाजूच्या परिसरात फेकत असून, तिच्यामुळे तेथील संपूर्ण जमिनी नापीक झालेल्या आहेत. तसेच सदर कंपनी लाखो लिटर समुद्राचे पाणी वापरते आणि लाखो लिटर अमोनियायुक्त सांडपाणी समुद्रात फेकत असून, सदर कंपनी आमची देखील शेत, नापीक करील, पशुधनाची गायराने आमच्या कडून हिरावून घेईल आणि आमच्या समुद्रात देखील लाखो लिटर सांडपाणी सोडेल.
असं भरत भाई सांगत होते. मागे झालेल्या जनसुनावणी वेळी त्यांनी जनसुनावणी ठेवलेल्या तंबू मध्येच 300 गायींना चारा घातला होता आणि कंपनी ने गायरान जमीन घेतली, तर ही जनावरे कुठे जाणार हा प्रश्न अधोरेखित केला होता. पण तरी देखील गेल्या महिन्यात येथील प्रांत अधिकाऱ्याने जनसुनावणी घेतली. या वेळी मात्र त्याने जनसुनावणी घेण्यापूर्वी तंबुला कुंपण घातले. त्याला एकच दरवाजा ठेवला. कोणी काही गडबड केली तर, बंदूकधारी पोलीस सर्वत्र तैनात केले. पाठोपाठ वॉटर कॅनन, अश्रू धुराच्या नळकांड्या तयार ठेवल्या आणि लोकांमध्ये आणि जनसुनावणी घेणाऱ्या अधिकारी/ कंपनीच्या प्रतिनिधीमध्ये तब्बल 40 फूट अंतर राहील असं कुंपण घालून लांबूनच गावकऱ्यांना आपले म्हणणे मांडायला सांगितलं.
पूर्वी, अशा या जनसुनावणी जर लोकांचा विरोध असेल, तर पुढे ढकलून पुन्हा पुन्हा चाचपणी केली जात होती. पण आता मात्र सरकारी बाबू आणि कंपनी दोघं हातात हात घालून जनसुनावणी रेटून नेतात आणि नागरी हक्कांची पायमल्ली करत जनसुनावणीचा बनाव उरकून धाकदडपशाही करत लोकांची नैसर्गिक संसाधने लुटून नेतात, हे सर्वत्र देशभरात सुरू आहे. परंतु, आपलंच घर, गाव, जमीन वाचवण्यासाठी संविधानिक मार्गाने मोर्चे, आंदोलने करत लढलो, तर आपण विकास विरोधी, देशद्रोही ठरवले जातो आणि देशातील नागरिकांना लुटून उद्ध्वस्त करणाऱ्या देशी विदेशी लुटेऱ्या कंपन्यांना मात्र देशाचे विकासक, उद्योजक म्हणवले जात आहे, हा नवा भारत आहे.
पुढील सर्व गोष्टी ऐकून मला गावकऱ्यांनी दिलेल्या लढ्याच कौतुक वाटलं. पुढे सर्व काही ऐकून आम्ही संध्याकाळी येथील खडकाळ समुद्र किनारे अभ्यास करण्यासाठी निघालो. गावाच्या मागे तब्बल अर्धा तास गाडीने आणि मग पुढील अर्धातास आम्ही चालत होतो. वाटेत कित्येक एकर वरती पसरलेली शेती आणि हजारो एकर वर पसरलेले गवताचं कुरण दिसल. जे कंपनीने नुकताच तारेच कुंपण घालून त्यात जनावरे शिरू नये म्हणून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. पण तरी देखील त्याच गवताच्या कुराणात चरत असलेल्या शे दीडशे गायी आणि मेंढरे मी पाहिली आणि कंपनी जर आली तर ही धष्टपुष्ट जनावरे भुकी मरणार हा विचार करून अंगावर काटा आला. पुढे काही अंतरावर गेल्यावर दूरवर पसरलेल्या रेतीच्या टेकड्या दिसल्या. त्यावर घनदाट पसरलेले बाभळीच वन दिसत होत. एवढं घनदाट जंगल आपोआप उगवलेले आहे? असं मी विचारल्यावर भरत भाई म्हणाले, हे इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कारकिर्दीत हेलिकॉ्टरमधून बिया फेकल्या होत्या, त्यामुळे उगवलं आहे.
यात जेवढं श्रेय इंदिरा गांधींच आहे, तेवढंच किंबहुना त्याहूनही जास्त श्रेय येथील गावकऱ्यांचे आहे. कारण त्यांनी क्षणिक फायद्यासाठी लाकूड फाट्यासाठी कधी याला हात लावला नाही. तसेच समुद्र आत शिरू नये म्हणून आज आमचे आमदार खासदार दगडी बंधारे बांधत आहेत. त्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडून काहीतरी शिकावं. त्यांनी दूरदृष्टी ठेवत बाभळीच्या बिया फेकल्या ज्यामुळे येथील किनारा आणि गाव आज भल्या मोठ्या वाळूच्या टेकड्यांनी आणि त्यावर पसरलेल्या बाभळीने भरती ओहोटीच्या पाण्यापासून, समुद्रातून येणाऱ्या चक्री वादळापासून संरक्षित केलं. शिवाय, त्यात कित्येक पक्षी, प्राणी, पशुधनाला आधार दिला.
निसर्गपूरक विकास करायचा असेल, तर त्याला शॉर्टकट नसतो. आज परलेल बी लगेच जंगल बनवत नाही. तसेच आज तोडलेल जंगल त्यावर अवलंबून असलेली माणसे आणि कित्येक सजीव हे पर्यायी वृक्षारोपण करून जंगलाची तूट भरून काढता येत नाही. त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो. एखादा प्रदूषणकारी प्रकल्प निसर्ग समृद्ध अशा भागात उभारून त्याला ग्रीनफिल्ड असं नाव देऊन तो हरित निसर्ग पूरक कधीच होत नसतो. हे आमच्या लोकांनी आणि राजकारणी मंडळींनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. (हा प्रकल्प देखील स्वत:ला ग्रीन फिल्ड असं म्हणवतो आहे.)
बाकी गुजरातमध्ये मी महत्त्वाचे काही मुद्दे भरत भाई आणि ध्वनी यांना दिले आहेत. लढाई मोठी असल्यानं ते इथे सांगणे उचित नाही. म्हणून मी थांबतो. तो वर गावाकडे चला म्हणणाऱ्या गांधींच्या गुजरातला आणि तो टिकवू पाहणाऱ्या गुजराती माणसाला सलाम. दिसत तस कधीच नसत हाच या प्रवासातला अनुभव.
(टीप: नर्मदेच पाणी जर आम्हाला मिळालं तर आम्ही संपूर्ण परिसर शेतीच शेती करू असं गुजराती म्हणतात. पण आपण मात्र सुपीक जमिनी, भरपूर पाणी असून देखील आपल्या जमिनी कारखान्यांच्या घशात घालतो. गुजराती शेती सोबत गायरान देखील राखतो, तर आम्ही तिथे अतिक्रमण करतो.)