GM Mustard : नवतंत्रज्ञानामुळे मोहरी उत्पादक शेतकरी होतील सक्षम
1 min read🟤 संशोधनाची पद्धती व भरघोस उत्पादन
पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MOEF&CC – Ministry of Environment, Forests and Climate Change) सर्वोच्च बायोटेक नियामक मंडळाच्या जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने (GEAC – The Genetic Engineering Appraisal Committee) संकरित DMH -11 ला पर्यावरणीयदृष्ट्या मुक्त केले आणि 100 टक्के सुपीक आणि जास्त उत्पादन देणारी मोहरीचा संकरित व किफायतशीर वाण विकसित करण्यासाठी हेटरोसिस प्रजननाची एक नवीन अनुवांशिक प्रणाली इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्चच्या (ICAR-Indian Council of Agricultural Research) देखरेखीखाली तयार करण्यात आली. दिल्ली विद्यापीठाचे डॉ. दीपक पेंटल यांनी ‘बार्नेस-बार्स्टर पॉलिनेशन कंट्रोल सिस्टीम’ (Barnes-Barster Pollination Control System) विकसित केली. यात एका जनकापैकी नरामधील प्रजनन क्षमता कमी करणे, बार्स्टरमुळे नरामध्ये वंध्यत्व निर्माण करणे आणि बार्स्टर फर्टिलिटी रिस्टोरेशन जीनद्वारे संततीमध्ये पुनर्संचयित करणे या तत्त्वावर आधारित बहुमुखी दोन ओळींची हेटरोसिस प्रजनन प्रणाली तैनात केली जाते. या नवीन परागीभवन नियंत्रण प्रणालीमुळे मोहरी उत्पादकांना भरघोस उत्पादन देणारे संकरीत वाण विकसित करणे शक्य होईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मोहरीच्या संकरणास चालना मिळेल.
🟤 बीटी कापसाच्या उत्पादनात वाढ
बीटी कापसासारखीच मोहरी उत्पादनाच्या वाढीस चालना मिळेल. आजच्या घडीला बीटी कापसाने 95 टक्के क्षेत्रावर ताबा मिळवला असून सन 2002 मध्ये असलेले बीटी कापसाचे उत्पादन 40 टक्के वाढले असून 2021-22 सालामध्ये 13 दशलक्ष गाठींपासून ते 35 दशलक्ष गाठी इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात या कापसाचे उत्पादन होण्याच्या मार्गावर आहे.
🟤 मोहरीचे लागवड क्षेत्र
राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि मध्य प्रदेशात रब्बी (हिवाळी) हंगामात सुमारे 60 लाख शेतकरी 65 ते 70 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर मोहरीचे पीक घेतात. गुजरात, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये किरकोळ तेलबिया पीक म्हणूनही मोहरीची लागवड केली जाते. कॅनडा, चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतातील शेतकऱ्यांकडे सुमारे एक तृतीयांश म्हणजे प्रति हेक्टरी 1,000 किलोग्रॅमपेक्षाही कमी मोहरीचे उत्पादन होत असते.
🟤 विकसित देशांच्या तुलनेत कमी उत्पादन
गंमत म्हणजे, बीटी कापसाचे आगमन होण्यापूर्वी कापसाच्या बाबतीत जे घडले होते, अगदी तसेच, गेल्या 20 वर्षांपासून भारतात मोहरीच्या उत्पादनाच्या बाबतीतही घडत असून, मोहरीचे उत्पादन स्थिरावलेले आहे. भारतीय मोहरीच्या जर्मप्लाजममधील परिवर्तनशीलतेची कमतरता, मोहरीतील संकरितीकरणाचा अभाव आणि व्हाइट रस्ट, अल्टरनेरिया ब्लाइट, स्क्लेरोटीनिया रॉट आणि ऑरोबॅन्चेस सारख्या जैविक आणि अजैविक तणांचा प्रादुर्भाव याच्या परिणामस्वरूप भारतात मोहरीचे उत्पादन कमी होत आहे. एकीकडे, हायब्रीड मोहरी, तणनाशक सहनशील मोहरी व दर्जेदार मोहरी आणि मोहरीतील या सर्व गुणधर्मांचे मिश्रण असलेली मोहरी यासारख्या नवनवीन तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या मोहरीच्या वाणांची उपलब्धता असलेल्या विकसित देशांमधील शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी उत्पादन, शेतीचे अत्यल्प उत्पन्न आणि संधीचा तोटा यासारख्या अनेक कारणांमुळे भारतीय शेतकरी मात्र त्रस्त आहेत. नवीन तंत्रज्ञानाला नाकारल्यामुळे त्रस्त झालेल्या काही राज्यांमधील शेतकऱ्यांनी अखेर एचटी-बीटी कापूस, एचटी सोयाबीन आणि बीटी वांग्याची बेकायदेशीर लागवड सुरू केली आणि अनुवांशिकरित्या सुधारित पिके घेण्यासाठी शांततामयरित्या आंदोलन छेडले.
🟤 खाद्यतेलाचे परावलंबीत्व आणि विक्रमी आयात
भारत हा चीननंतरचा खाद्यतेलाची आयात करणारा दुसरा मोठा देश आहे. सन 2021-22 मध्ये भारताने वार्षिक 14 ते 14.5 दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात केली आणि त्यासाठी त्याला 18.99 अब्ज अमेरिकन डॉलर्स (5 लाख कोटी) च्या विक्रमी परकीय चलन खर्चाची किंमत मोजावी लागली. या आयात केलेल्या खाद्यतेलातून देशांतर्गत खाद्यतेलाच्या एकुण गरजेपैकी सुमारे 70 टक्के गरज पूर्ण केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे तेलबियांचे उत्पादन कमी आहे. सोयाबीन, भुईमूग आणि मोहरी ही भारतात पिकविली जाणारी तीन प्रमुख तेलबिया पिके आहेत. ही पिके तेलाच्या आपल्या एकुण 9 दशलक्ष टन गरजेपैकी सुमारे 6.5 दशलक्ष टन इतका तेलपुरवठा करू शकतात. त्यामुळेच सरकारला देशांतर्गत वापराची मागणी पूर्ण करण्यासाठी खाद्यतेलाच्या नियमित आयातीवर अवलंबून राहावे लागते. आयात केलेल्या बहुतेक खाद्यतेलामध्ये पामतेल, जीएम सोयाबीन तेल, जीएम कॅनोला (कॅनेडियन मोहरीचे तेल) आणि काही प्रमाणात सूर्यफूल तेल यांचा समावेश आहे. भारतात 2002 सालापासून सुमारे 5.5ते 6 दशलक्ष टन जीएम खाद्यतेल ज्यात 4 ते 4.5 दशलक्ष टन आयात केलेले जीएम सोयाबीन तेल, 0.5 दशलक्ष टन आयात केलेले जीएम कॅनोला आणि 1.5 दशलक्ष टन जीएम कापूस (सरकी Cotton seed) तेलाचा समावेश आहे.
🟤 जीएम मोहरी पूर्णत: स्वदेशी वाण
भारत सुमारे 20 वर्षांपासून मानवी आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम न करता जीएम पिकांपासून तयार केलेल्या खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे, पण,या वस्तुस्थितीकडे आपण सर्वांनीच सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे, हे आपले दुर्देव आहे. दिल्ली विद्यापीठाने विकसित केलेल्या जीएम मोहरीपासून (ब्रासिका जुंसिया) तयार केलेले जीएम भारतीय मोहरीचे तेल आयात केलेल्या जीएम कॅनोला (कॅनेडियन मोहरी: ब्रासिका नॅपस) आणि जीएम सोयाबिन तेलासारखे आहे. उलट, जीएम मोहरीच्या तंत्रज्ञानाचे सौंदर्य असे आहे की, प्रख्यात ब्रासिका जेनेटिक्सिस्ट आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.दीपक पेंटल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शास्त्रज्ञांच्या चमूने हे पूर्णत: स्वदेशी असे हे वाण विकसित केले आहे. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग (DBT) आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) यांनी 2000 ते 2015 या काळात दिल्ली विद्यापीठात सुरू असलेल्या जीएम मोहरीच्या या संशोधन व विकास कार्यासाठी 90 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
🟤 जीएम मोहरीचे वैशिष्ट्य
या तंत्रज्ञानामध्ये संकरणाच्या बार्नेस-बार्स्टर प्रणालीचा समावेश आहे. यात बार्नेस जनुक मोहरीच्या वनस्पतीमध्ये आणले जाते, जे एका ओळीतील नराचे निर्जंतुकीकरण करते, तर बार्नेस जनुकास प्रतिबंध करणार् या दात्याच्या वनस्पतीमध्ये बार्स्टर प्रथिने सोडली जातात. याचा अर्थ असा की ही वनस्पती नराचे निर्जंतुकीकरण करते आणि मादी दात्याकडून परागकण स्वीकारण्यास सक्रिय होते. परागकणाबरोबरच त्याला अवरोधक प्रथिने मिळतात. ज्यामुळे वनस्पती पुन्हा सुपीक होते. अशा प्रकारे या वनस्पतीचा वेगवेगळ्या आणि चांगल्या प्रकारच्या मोहरीच्या वाणासोबत संकर केला जाऊ शकतो. जीएम मोहरी संकरित डीएमएच – 11 (धारा मोहरी हायब्रीड – 11) हा बार्नेस-बार्स्टर प्रणालीवर आधारित पहिल्या पिढीतील मोहरीचा संकर आहे आणि जीएम मोहरी बार्नेस-बार्स्टर प्रणाली तंत्रज्ञानाचे नियमन मुक्त केल्यामुळे सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रांद्वारे मोहरीच्या प्रजनन कार्यक्रमाला आणखी चालना मिळेल. ज्यामुळे देशात मोहरीची शेती आणि खाद्यतेल उत्पादनात क्रांती घडवून आणण्यास सक्षम असलेल्या या उच्च-उत्पादक आणि उत्कृष्ट मोहरीच्या संकरितांची ओळख होईल. दिल्ली युनिव्हर्सिटी साऊथ कॅम्पसने विकसित केलेल्या मोहरीतील बार्नेस-बार्स्टर तंत्रज्ञानातील बदलांचे पेटंट्स मिळवण्यासाठी भारतात प्रयत्न सुरू असून, त्यात अमेरिका आणि कॅनडासारख्या इतर देश राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ (NDDB – National Dairy Development Board) आणि दिल्ली विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने त्यासाठी विशेष योगदान देत आहेत.
🟤 तणनाशक सहिष्णुता
जीएम मोहरीच्या लागवडीच्या विरोधात नेहमीच काही मुद्दे उपस्थित केले जातात जसे की, तणनाशक, मध, परागकण आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम इत्यादी. जीएम मोहरीतील बार्नेस-बार्स्टर प्रणालीमुळे उत्पन्नाचा दर तर वाढतोच. शिवाय, पूर्णपणे सुपीक, संकरित उत्पादन करण्याची संधी मिळते, संकरित बियाणे उत्पादन खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांनाचे उत्पन्नही वाढते. तणनाशक सहिष्णुता हे बार्नेस-बार्स्टर जीएम मोहरी संकरित डीएमएच – 11 साठीचे मुख्य लक्ष्य नाही. अनुवांशिकरित्या रूपांतरित मोहरीची वनस्पती ओळखण्यासाठी तणनाशक सहिष्णू बार जनुक निवड चिन्हक म्हणून वापरले जाते. तणनाशक ग्लायफोसिनेटचा वापर हा केवळ जीएम संकरित बियाणे उत्पादनाच्या उद्देशापुरता मर्यादित आहे. हे तणनाशक शेतकऱ्यांच्या वापरासाठी नाही. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने (CIBRC – Central Insecticides Board and Registration Committee) चहाच्या बागेत तणनाशक ग्लायफोसिनेटचा वापर करण्यास परवानगी दिली आहे आणि तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे ते वापरले जात आहे. याशिवाय, भारतातील शेतकरी भारतातील पीक वनस्पतींमधील तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्लायफोसिनेटसारख्या इतर तणनाशकांच्या फवारणीचा वापर अनेकदा करतात. संबंधित ब्रासिका प्रजातींसह बार्नेस-बार्स्टर मोहरी संकरित DMH – 11 च्या संकरणाच्या अभ्यासासह बायोसेफ्टी अभ्यास जनुकांचा प्रवाह आणि पर्यावरणावरील त्याच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी केले गेले. पारंपारिक मोहरी किंवा तिच्या जंगली वाणांसोबत जीएम मोहरीचे संकरण करण्याचा कोणताही मुद्दा नमूद करण्यायोग्य नव्हता.
🟤 गैरसमज, विरोध व वास्तव
मोहरीच्या व्यावसायिक लागवडीबाबतची सध्याची परिस्थिती बार्नेस-बार्स्टर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रस्तावित केल्यासारखीच आहे. एकदा का बार्नेस-बार्स्टर प्रणाली असलेला मोहरीचा संकर भारतीय मोहरीच्या शेतकऱ्यांनी स्वीकारला की, मोहरीची उत्पादकता आणि त्यांचे शेतीचे उत्पन्न सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक वैविध्यपूर्ण मोहरीच्या संकरित वाण उपलब्ध करून दिल्या जातील. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या ऑफिस ऑफ जीन टेक्नॉलॉजी रेग्युलेटरने (OGTR – Office of Gene Technology Regulators) 13 ऑक्टोबर 2022 रोजी तणनाशक सहिष्णुतेसाठी भारतीय मोहरीची जनुकीय बदल केलेली व्यावसायिक लागवड जाहीर केली आहे. प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियातील भारतीय मोहरीखालील क्षेत्र हे केवळ काही हजार हेक्टर असले तरी जीएम-इंडियन मोहरी जाहीर करण्याचा निर्णय त्यांनी व्यापाराच्या उद्देशाने घेतलेला दिसतो. या मोहरीच्या तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा झणझणीतपणा, जो कॅनोलासह इतर खाद्यतेलांमध्ये आढळत नाही. मोहरी तेलाच्या या खास वैशिष्ट्यामुळे भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये त्यांचा जास्त वापर होत आहे. या जीएम भारतीय मोहरीला जाहीर करण्यामागचा अर्थ असा आहे की, भारताचे खाद्यतेलाच्या दीर्घकाळापासून असलेले परावलंबित्व लक्षात घेता, ऑस्ट्रेलियाला निर्यातीसाठीची एक नवीन बाजारपेठ म्हणून बघत आहे. म्हणूनच, स्वदेशी बनावटीच्या जीएम मोहरीला हिरवा कंदील देण्याच्या भारत सरकारच्या सध्याच्या निर्णयाचे खाद्यतेल क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर’तेच्या दिशेने टाकलेले एक योग्य पाऊल म्हणून स्वागत केले जात आहे. भारतीय शेती आणि वैज्ञानिक समुदाय त्यामुळे आनंदला आहे. कारण त्यांना असे वाटू लागले आहे की, या निर्णयामुळे कीटक आणि तणनाशक सहनशील कापूस आणि मका यासारख्या इतर जीएम पिकांच्या तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणाचा मार्ग देखील त्यामुळे मोकळा होईल. 60 लाख मोहरी उत्पादक शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बराच काळापासून वाट पाहत होते. ‘देर आये, दुरूस्त आये’ असे म्हटले जाते. त्यानुसार उशिरा का होईना झालेला हा निर्णय मोहरी उत्पादकांसाठी निश्चितपणे चांगला आहे. या निर्णयामुळे इतर सर्व शेतकऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे स्वातंत्र्य मिळो आणि त्याच्या लाभ उत्पन्न व उत्पादन वाढीसाठी होवो, अशी सदिच्छा व्यक्त करतो.
@ डॉ. सी.डी. मायी
संपर्क :- 99706 18066
मेल :- mayeecharu@gmail.com
@ डॉ. भगीरथ चौधरी
संपर्क :- 99998 51051
(शास्त्रज्ञ, दक्षिण आशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर, जोधपूर, राजस्थान)
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जीएम मोहरी बियाणे उपलब्ध होईल का?
हार्वेस्टरद्वारे मोहरी पिकांची हार्वेस्टिंग करता येईल का?