krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

नितीनजी शेतीचे मार्शल व्हा !

1 min read
देशाचे धोरणकर्ते नेते असलेले नितीन गडकरी हे सातत्याने शेतीबाबत पुरोगामी भूमिका घेत भारतीय शेतीमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा व्हाव्यात, असे मत व्यक्त करतात. त्यांची मातृसंस्था त्यांच्या या सुधारणावादी मताच्या विरुद्ध टोकाची भूमिका आग्रहाने मांडत असताना त्यांचे हे मत कौतुकास्पद आहे. गडकरींच्या या भूमिकेसाठी देशभरातून सतत पाठबळ मिळाल्यास ते या सुधारणा निश्चितच राबवू शकतील, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

🟣 देशाचे धाेरणकर्ते
नुकतेच नागपूर येथे कृषी शास्त्रज्ञ डाॅ. चारुदत्त मायी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी भारतीय शेतीच्या संबंधाने काही अपेक्षा व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशाचे कृषी क्षेत्रातील नेते शरद पवार हे होते. देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेले हे दोन्ही धोरणकर्ते नेते सातत्याने आपल्या भाषणातून शेतीच्या भवितव्यासाठी सतत आग्रही मत मांडत असतात. शरद पवार यांनी देशाचे धोरण ठरविण्यासाठी दोन दशके काम केले आहे. तर नितीन गडकरी हे गेली आठ दहा वर्ष देशाची सूत्र बाळगून आहेत. कृषी प्रधान देशाचे सर्वोच्च नेतृत्व सातत्याने ही भूमिका मांडत असताना शेतकऱ्यांना सतत असा प्रश्न पडतो की, मग यांना नक्की कोण अडवते ?

🟣 श्री शरद जाेशी आणि इथेनाॅल
शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री शरद जोशी शेतीच्या संबंधाने गेली 40 वर्षे जी मांडणी करत आहेत. तीच मांडणी थोड्याफार फरकाने नितीन गडकरी हे आपल्या भाषणातून सतत मांडत असतात. सन 2004 नंतर श्री शरद जोशी यांनी शेतकरी हा अन्नधान्याच्या उत्पादकाऐवजी इंधनाचा उत्पादक म्हणून ओळखल्या जावा, यासाठी अतिरिक्त उसापासून इथेनॉल निर्मितीसाठी आग्रही मागणी केली होती. त्याचबरोबर शेतीच्या प्रत्येक हिरव्या पानांपासून इंधनाची निर्मिती करता यावी, अशी भूमिका त्यांनी 20 वर्षांपूर्वी घेतली होती. शेतकऱ्यांच्या शेतातच ही इंधन निर्मिती करता यावी, यासाठी इंधन निर्मितीचे छोटे संयंत्र तयार करण्याचे त्यांचे स्वप्न होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात घरात ही यंत्रे बसवून शेतीमधील पिकांपासून इंधन निर्मिती होऊन शेतकरी हा इंधन उत्पादक म्हणून ओळखल्या गेला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी शेतकरी संघटनेच्या औरंगाबाद अधिवेशनात मांडली होती.

🟣 आधुनिक तंत्रज्ञानाबाबत आग्रही भूमिका
शेतकरी संघटना व शेतकरी महिला आघाडीच्या औरंगाबाद येथील संयुक्त अधिवेशनात श्री शरद जोशी यांनी भविष्यातील शेती संबंधाने विस्तृत भूमिका जाहीर केली होती. बदलते हवामान व त्याचा शेतीवर होणारा परिणाम, माती विरहीत शेती, जनुकीय संशोधन, इंधन शेती यासह भविष्यातील शेतीवर परीणाम करणाऱ्या अनेक घटकांसंदर्भात शेतकऱ्यांना त्यांनी माहिती दिली होती. जगभरात शेती क्षेत्रात उपलब्ध असणारे आधुनिक तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत श्री शरद जोशी सातत्याने आग्रही राहिले आहेत.

🟣 भारतातील कापूस क्रांती
आज देशात झालेली कापूस क्रांती ही गुजरातमधील शेतकऱ्यांनी चोरुन आणलेल्या जनुकीय सुधारित कापूस तंत्रज्ञानामुळे झाली आहे. या शेतकऱ्यांवर कारवाई करणाऱ्या तत्कालीन गुजरात सरकारच्या विरोधात श्री शरद जोशी यांनी स्वतः शेतात उभे राहून सरकारला विरोध केला व शेतकऱ्यांना संरक्षण दिले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने नंतर हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अधिकृतपणे उपलब्ध करून दिले आणि भारतात कापूस क्रांती झाली.

🟣 आधुनिक तंत्रज्ञानाबाबत शेतकरी संघटना आग्रही
भारतीय कापूस उत्पादकांना आज जे चांगले दिवस आले आहेत, ते या जनुकीय सुधारित बियाण्यांमुळेच आले आहेत. राजकीय अनिच्छेने या बियाण्याच्या पुढील सुधारित आवृत्त्या आपल्या शेतकऱ्यांना भेटल्या नाहीत. जगभरात हे तंत्रज्ञान पाच पट सुधारले. अनेक समस्या सोडवणाऱ्या सुधारणा यात करण्यात आल्या. पण भारतीय शेतीला त्यांचा फायदा मिळू शकला नाही. यातील एक सुधारित वाण शेतकरी आजही चोरून वापरताे, जे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. हे बियाणे शेतकऱ्यांना अधिकृतपणे मिळावे, यासाठी शेतकरी संघटना आग्रही आहे. नितीन गडकरी हे भाषण करत असताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना गुदगुल्या होत असतात. सध्या गडकरींची भाषणे ही 15 वर्षांपूर्वी शरद जोशी देत असलेली भाषणे असल्याने शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते उत्साहीत होतात. देशाचे धोरणकर्ता नेता आपली भाषा बोलत आहे, याचा त्यांना मनस्वी आनंद होतो. नितीनजी बोलत असलेल्या गोष्टी ते शासकीय धोरणात ज्या दिवशी संमिलीत करतील, तो दिवस शेतकऱ्यांसाठी सोनियाचा दिवस असेल.

🟣 शेतीच्या उत्थानासाठी मार्शल प्लान
भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर श्री शरद जोशी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतीच्या उत्थानासाठी मार्शल प्लानची गरज असल्याची भावना व्यक्त केली होती.

🟣 काय आहे मार्शल प्लान?
दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपियन समूहातील मित्र राष्ट्रांची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. ही राष्ट्रे पूर्णतः बेचिराख व उद्ध्वस्त झाली होती. या राष्ट्रांना पुन्हा उभे राहण्यासाठी, त्यांच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिकेचे विदेश मंत्री जनरल जॉर्ज मार्शल यांनी हावर्ड विद्यापीठात ही योजना मांडली. त्याद्वारे युरोपीयन राष्ट्रांचे पुनर्निर्माण करण्यात आले. श्री शरद जोशी यांनी शेतकऱ्यांची अवस्था महायुद्धात नष्ट झालेल्या राष्ट्रांसारखची झालेली असल्याने त्यांच्या उत्थानासाठी मार्शल प्लान सारखी व्यापक व विस्तृत योजना आखून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करावे, असा विचार मांडला.

🟣 नितीन गडकरी यांनी शेतीचा मार्शल व्हावे!
भारतीय शेती व शेतकरी हे पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या उत्थानासाठी छोट्या मोठ्या मलमपट्टीसारखे मदतीचे कार्यक्रम न करता, शेतीच्या पुनर्रचनेसाठी श्री शरद जोशी यांनी सुचवल्याप्रमाणे व्यापक योजना तयार करून कालबद्ध व क्रमबद्ध कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे जनरल मार्शल यांनी युरोपीय राष्ट्रांच्या उभारणीसाठी प्लान तयार करून तो राबवला, त्याच प्रमाणे नितीनजी यांनी पुढाकार घेऊन शेतीचा मार्शल म्हणून उभे राहावे. यासाठी नितीन गडकरी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे गडकरी सध्या श्री शरद जोशींनी मांडलेले विचार सातत्याने आपल्या भाषणातून मांडत असतात. तसेच त्यांनी आता श्री शरद जोशी यांनी मांडलेला भारत उत्थानासाठी शेतीच्या पुनर्निर्माणचा कार्यक्रम राबवून भारतीय शेतकऱ्यांचा मार्शल किंवा भगवान पृथू व्हावे.

🟣 पृथू राजा आणि शेती
भारतीय पुराणानुसार पृथ्वी जेव्हा शेती साठी अयोग्य बनली होती, तेव्हा अंग राजाच्या बाहूपासून निर्माण झालेल्या पृथू राजाने पृथ्वीला शेती योग्य बनवले. बियाणे व पशुधन उन्नत करून भारतीय शेतीला नवा आयाम दिला. त्याचप्रमाणे नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भगवान पृथू व जनरल मार्शल यांची भूमिका घेऊन श्री शरद जोशी यांनी सुचवलेला भारत उत्थान कार्यक्रम राबवून शेती व शेतकरी यांचे पुनर्उत्थान करावे, ही अपेक्षा शेतकरी करत आहेत. नितीन गडकरी यांना कृषी कल्याण मंत्रालयाऐवजी कृषी व्यवसाय मंत्रालयाची जबाबदारी देऊन भारतीय शेतीच्या उत्थानासाठी 15 लाख कोटी रुपयांची एक व्यापक योजना तयार करून ज्याद्वारे भारतात शेती करणे सोयीचे व सन्मानाचे व्हावे, यासाठी जाणीवपूर्वक काम करणे गरजेचे आहे. भारतीय शेतकऱ्यांना खात्री आहे की, नितीनजी हे शिवधनुष्य सहज पेलून धरतील व शेतकऱ्यांना सुखाचे समाधानाचे आयुष्य जगायला मिळेल. नितीनजींना शेतीसंबधी ते मांडत असलेल्या विचारांना धोरणात बदलण्याचे बळ मिळो, हीच भगवान पृथू चरणी प्रार्थना!

3 thoughts on “नितीनजी शेतीचे मार्शल व्हा !

  1. शेतीतून मिळणाऱ्या इंधनाला शरद जोशी ‘ शेत तेल ‘ असे म्हणायचे…

    1. मी ( मिलींद दामले ) मा . नितीनजी गडकरींना गेले ६० वर्षे महाराष्ट्रात नापिकीसाठी कृषि विद्यापीठ , संशोधन संस्था व विभाग जवाबदार असल्याचे पुरावे देणार आहे .

      कारण गेले ७५ वर्षे भारतात कृषी विद्यापीठे , संशोधन संस्था व विभाग शेतीसाठी मुलभूत माती व जल विज्ञानची शिफारस करत नाही.

      उदाहणार्थ :
      महाराष्ट्राचे उत्तम सिंचन पाण्याचे सोडियम गुणोत्तर (SAR ) इस्त्र्यालच्या दुप्पट आहे .
      सोडियम शोषण गुणोत्तर ( SAR ) :
      अ) महाराष्ट्र :
      १) उत्तम प्रतीचे सिंचन पाणी : २६ पेक्षा जास्त
      महाराष्ट्रात सिंचन पाण्याची सरासरी मध्यम आहे .
      म्हणून सिंचानाने जमिनी नापीक / क्षारपड होत आहेत .
      ब) इस्त्रायल :
      < ५

      भारत सरकारने खूप गाजावाजा करून जमीन आरोग्य पत्रिका ( Soil Health Card )अभियान राबवले .
      गेले ७५ वर्षे भारतात माती चाचणी केल्यावर जमिनीचे आरोग्य समजत नाही .
      कारण भारतात मातीच्या खालील चाचण्या करत नाही :
      १) Cation Exchange Capacity
      2) Sodium Absorption Ratio ( SAR )

      डॉ .पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला , कृषिसंवादिनी २०२२ पान ५० शिफारस :
      मातीचा सामू /पीएच /pH : ७ ते ८.५ पिकास मानवणारे ( सर्व साधारण ) .

      इतर देश
      बहुतेक पिकांसाठी मातीचा आदर्श सामू /पीएच /pH : ५.८ ते ६.५

      थोडक्यात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इतर देशांच्या तुलनेत १३ ते १०० पट अल्कधर्मी ( Alkaline ) जमनीवर पिके घेण्याची शिफारस करते म्हणून नापिकी होते .

      मी मा . नितीनजी गडकरींना पुरावे मेल व त्यांच्या नागपूर येथील पत्यावर पाठवणार आहे .
      पत्र व पुरावे एकूण १०० पाने होतील असा अंदाज आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!