krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती : 19 मार्चला उपवास का करायचा?

1 min read
Farmer Suicide : देशात शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होत आहेत. आतापर्यंत देशात जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होतात. असे असताना, राज्य असो वा केंद्र सरकार त्याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही. शेतकरी आत्महत्यांना 'राष्ट्रीय आपत्ती' (National Disaster) मानले पाहिजे व एकाही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. शेतकरी आत्महत्या हा पुढे ढकलण्यासारखा विषय नाही. इतर सगळी कामे बाजूला ठेवून 'शेतकरी आत्महत्या' (Farmer Suicide) हा विषय सरकारांने अग्रक्रमाने विचारात घेतला पाहिजे. अशी किसानपुत्र आंदोलनाची मागणी आहे.

✴️ शेतकाऱ्यांना गळफास ठरलेले कायदे
👉 कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग) कायदा.
(Ceiling Act)
👉 आवश्यक वस्तू कायदा.
(Essential Commodities Act)
👉 जमीन अधिग्रहण कायदा.
(Land Acquisition Act)
आदी शेतकरीविरोधी (Anti-farmer) नरभक्षी कायदे रद्द करा!

✴️ शेतकरीविरोधी कायदे
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून सरकारने पाडलेले खून (Murder) आहेत. कारण शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण काही कायदे आहेत. ते मागच्या सरकारांनी केले आहेर व वर्तमान सरकार देखील ते कायदे रद्द करीत नाही. कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षी कायदे शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहेत. ते तत्काळ रद्द झाले पाहिजेत. हे कायदे पक्षपात करणारे आहेत. मुलभूत अधिकारात (Fundamental Rights) हस्तक्षेप करणारे आहेत. घटना विरोधी आहेत. ते टिकून राहावे म्हणून आपल्या मूळ घटनेत नसलेले पण पहिली घटना दुरुस्ती करून टाकलेले 9 वे परिशिष्ट हे होय. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्यांच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. म्हणून हे कायदे टिकून राहिले आहेत. परिशिष्ट 9 मध्ये आज 284 कायदे आहेत त्यापैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण हे कायदे या परिशिष्टात असल्यामुळे ते टिकून राहिले आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न गरिबीचा (Poverty) नसून गुलामीचा (Slavery) आहे. म्हणून शेतकऱ्यांना या कायद्यातून सोडवणे महत्वाचे आहे असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे.

✴️ 19 मार्चचा कार्यक्रम
👉 अन्नत्याग/उपवास/उपोषण- जेथे असाल तेथे.
👉 पदयात्रा- 17 ते 19 मार्च- पानगाव ते आंबाजोगाई
👉 किसानपुत्रांचा मेळावा- 19 मार्च- दुपारी 3 वा- मुकुंदराज सभागृह, आंबाजोगाई. उपोषण सांगता व भोजन.

✴️ प्रत्येक संवेदनशील माणसाचे कर्तव्य!
👉 शेतकरी सहवेदना व्यक्त करण्यासाठी.
👉 आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी.
👉 शेतकरी आत्महत्याना कारणीभूत ठरलेल्या कमाल शेतजमीन धारणा (सीलिंग), आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण आदी नरभक्षी कायद्यांचा विरोध करण्यासाठी.
👉 शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प बळकट करण्यासाठी.

✴️ उपवास का करायचा?
19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. वीज बिल भरले नाही म्हणून त्याची वीज कट करण्यात आली होती. ते वीज बिल भरू शकले नाही. जमीन विकायला काढली तर ग्राहक नाही. अशा परिस्थितीत साहेबराव यांना आत्महत्या करावी लागली. 2017 पासून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 19 मार्च रोजी ‘अन्नत्याग आंदोलन’ केले जाते. या आंदोलनात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील व विदेशात गेलेले किसान पुत्र देखील सहभागी होतात. लाखाहून अधिक लोक 19 मार्चला उपवास करतात. 2017 साली साहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाणला (जिल्हा यवतमाळ) भेट देऊन महागाव (जिल्हा यवतमाळ) येथे उपोषण केले. 2018 साली साहेबराव कुटुंबीयांनी जेथे आत्महत्या केली, त्या दत्तपूर (जि. वर्धा) जवळ पवनार आश्रम येथे उपोषण केले. पुढच्या वर्षी दिल्लीत महात्मा गांधी समाधी परिसरात देशातील अन्य राज्यातील मित्रांसोबत उपवास केला. 2020 साली पुण्यात महात्मा फुले वाड्याला भेट देऊन बालगंधर्वच्या समोर उपोषण केले. गेल्या वर्षी औंढा नागनाथ येथून चिलगव्हाणपर्यंत किसानपुत्रांनी पदयात्रा काढली होती. चिलगव्हाण येथे उपवासाची सांगता करण्यात आली होती.

✴️ पदयात्रा
यावर्षी आम्ही पानगाव येथून पदयात्रा काढीत आहोत. पदयात्रेत महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातून आलेले 50 किसानपुत्र भाग घेणार आहेत. 1980 साली पोलीस गोळीबारात ठार झालेल्या हुतात्मा रमेश मुगे यांच्या स्मारकाला अभिवादन करून ही पदयात्रा निघेल. ती फावडेवाडी, चोपनवाडी मार्गे जाऊन घाटनांदूर येथे मुक्काम करेल. 18 तारखेला ही पदयात्रा दत्तपूर मार्गे पुसला जाईल व गिरवली येथे मुक्काम करेल. गिरवली येथे महिलांचा मेळावा होईल. डॉ शैलजा बरुरे या मेळाव्याला मार्गदर्शन करतील. 19 मार्च रोजी धायगुडा पिंपळा मार्गे पदयात्री अंबाजोगाईला जातील. दुपारी अडीच वाजता अंबाजोगाईच्या आंबेडकर चौकात या पदयात्रेचे स्वागत होईल. 3 वाजता श्री मुकुंदराज साभागृहात किसानपुत्रांचा मेळावा होईल. या मेळाव्याला अमर हबीब, डॉ राजीव बसरगेकर. सुभाष कच्छवे व महाराष्ट्रातील भिन्न जिल्ह्यातून आलेले किसानपुत्र मार्गदर्शन करतील. सुदर्शन रापतवार हे सूत्र संचालन करतील. पदयात्रेचे संयोजक सुभाष कच्छवे आहेत.

✴️ आवाहन
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहतील तोपर्यंत दरवर्षी 19 मार्च रोजी किसानपुत्र उपवास करीत राहतील. शेतकरी आत्महत्यांचे संकट लवकर दूर व्हावे यासाठी किसानपुत्रांची ही धडपड आहे. 19 मार्च रोजी जास्तीजास्त लोकांनी उपवास करावा, असे आवाहन अमर हबीब, सुभाष काच्छवे, दत्ता वालेकर, डोणे गुरुजी व शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केले आहे.

अमर हबीब,
किसानपुत्र आंदोलन, अंबाजोगाई.
मो. 8411909909

3 thoughts on “शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती : 19 मार्चला उपवास का करायचा?

  1. इकडे तिकडे वेगवेगळी आंदोलने करण्यापेक्षा ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्या घरापूढे मुक्काम मोर्चा नेवून आंदोलन केल आणि त्यांना फिरन मुश्किल केल तर परिणाम निश्चित चांगले होतील.
    निवडनूकित मताची भिक मागतांना सर्वच पक्षाचे नेते जे आश्वासन देवून निवडून जातात तेच निवडून गेल्यानंतर शेतकरी विरोधी निर्णय घेवून कर्मचाऱ्या मार्फत अंमलबजावणी करवून घेवून आपली फजिती करतात. ते मात्र नामानिराळे राहून जातात. म्हणून त्यांना फिरण मुश्किल केल पाहीजे.
    राज्यसरकारशी निगडत प्रश्न असेल तर आमदार आणि केंद्र सरकारशी निगडित प्रश्न तर खासदारांच्या घरापूढे आंदोलन केल्यास लवकर व योग्य होईल अस मला वाटतं.

  2. ‘ शेतकरी विरोधी कायदे नष्ट झाले पाहीजे भारतीय संविधानाची पायमल्ली या कायद्याने होते स्वातंत्र्याची ७५ वर्ष इंडीया साजरा करत असताना भारतातील शेतकऱ्याला स्वातंत्र्यं कधी ?

  3. मी किसानपुत्र आंदोलनाचा भाग असून ‘शेतकरी विरोधी कायदे’ रद्द व्हावेत यासाठी भूमिका मांडत असतो. दरवर्षी १९ मार्चला सरकारी धोरणांना बळी पडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी सहकुटुंब उपवास करतो.
    शेतकऱ्यांबद्दल संवेदना असणाऱ्या प्रत्येकाने या दिवशी उपवास करावा, असे आवाहन करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!