krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

बिबट्याला भारी, जानवळ कुत्र्याची जात न्यारी…!!

1 min read
मांजरा आणि तावरजा नदीचे खोरे वगळता लातूर जिल्हा काळ्या बेसाल्टवर बसलेला असल्यामुळे प्राचीन काळापासून हा कुरनाळ प्रदेशात मोडणारा... त्यामुळे गुरं पाळण्याचा प्राचीन व्यवसाय इथं अस्तित्वात होता. गुरं (Cattle) पाळणाऱ्या गुराख्याला त्या काळी सर्वात मोठी जोखीम होती ती शिकार करणाऱ्या प्राण्यांची...! आजच्या चाकूर तालुक्यातील वडवळ, जानवळ ही गावे बालाघाट पठारावरील डोंगरांनी व्यापलेली असल्याने इथे पाळीव प्राण्यांची वाघाकडून मोठ्या प्रमाणात शिकार होत. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीपासूनच कुत्रे होती. मग प्रश्न पडतो, 'पश्मी' (Pashmi Hound) आणि 'कारवान' (Caravan Hound) या आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या कुत्र्याच्या जाती जानवळमध्ये कशा आल्या, सर्व सामान्यांप्रमाणे या गावात गेल्यास मलाही तोच प्रश्न पडला... गावातल्या लोकांनी काही हिंट दिल्या. मग माझा शोध सुरू झाला... शोधताना अनेक दुवे हाताला लागले.

 पश्मी कुत्रे आले कुठून?

मुघलांनी अफगाणिस्तान मधून 20 हजार सैन्य भाडे  करारावर भारतात आणले. त्यात मुख्यतः रोहिला आणि पठाण होते. यातले रोहिला हे पश्तून वंशाचे,  1857 ते 1947 या काळात ते विविध भागात स्थिर झाले… त्यांचे काही गट दिल्ली, गुरगाव येथे तर काही गट दख्खनच्या पठारावर आले. जानवळ भागात मोठ्या प्रमाणात तांडे होते. ते आजही आहेत, त्यात अनेक निर्वासित यायचे.. येथे रोहिले नांदले की नाही, याच्या नोंदीकुठे सापडत नाहीत. मात्र, नांदेड, किनवट, वाशिममध्ये असल्याचे उल्लेख आहेत. सन 1947 ला देश स्वातंत्र झाला, सगळे स्थिरस्थावर झाल्यानंतर हे निर्वासितांचे तांडे हालले. जानवळकरानी पश्तून लोकांकडील कुत्र्यांचे   ब्रीड (Breed) जोपासले आणि वाढविले त्याला नाव पडले पश्मी (Pashmi)…! ह्या कुत्र्याच्या जातीत जन्मलेल पिलू दोन रंग घेऊन जन्मते… काळा पांढरा, लाल पांढरा पण याचे पुढे जे जानवळ ब्रीड झाले. ते मात्र फक्त सिंगल कलरचे झाले… यांची उंची साधारण 28 इंच आणि लांबी 30 इंच असते. मूळ ब्रीड (Breed) किरघीस्थानचे असल्यामुळे उन्हापासून संरक्षण म्हणून चक्क सिंहासारखे केस यांच्या अंगावर असायचे, आता ते बरेच कमी झाले आहेत. हे कुत्रे अत्यंत रुबाबदार धिप्पाड राखणदारीसाठी उपयोगाला आणली जात… आज जानवळ गावात जवळपास 15 घरात या कुत्र्यांचे वंश वाढविले जात आहे. जन्मल्यापासून आईचे दूध तुटेपर्यंत ही कुत्र्याची पिल्लं विकली तरी दिली जात नाहीत. एका पिलाची किंमत 15 हजार रुपये आहे. या गावात याची लाखात उलाढाल आहे.

कारवान कुत्रे कुठून आले?

गावातले लोक सांगतात, हे तांड्याच्या कारवां बरोबर आले म्हणून त्याचे नाव कारवान (Caravan) पडले. पण याचा शोध घेतला असता वेगळे संदर्भ भेटले. अमेरिकेत कैरावान हाउंड (Caravan Hound) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातींचे हे कुत्रे असून, भारतात कर्नाटक राज्यात मुधोळचे राजे घोरपडे यांनी हा वंश भारतात आणला, म्हणून याला मुधोळ हाउंड (Mudhoji Hound) म्हणून ओळखल्या जाते. पण जानवळ येथे ह्या कुत्र्याच्या ब्रीडला ‘बांगडी कारवान’ हे नाव पडले. जगभर अत्यंत चपळ कुत्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जर्मन शेफर्ड (German Shepherd) पेक्षा या कारवान कुत्र्यांचा पळण्याचा वेग दुप्पट आहे. हे खुंखार शिकारी कुत्रे म्हणून ओळखले जातात. हे सगळे वैशिष्ट्य असलेल्या या मुधोळ हाउंडला सन 2017 पासून भारतीय सैन्य दलातही घेतले आहे.

कारवान शिकारी कुत्रे

जानवळच्या कारवान कुत्र्याचे तोंड अत्यंत निमुळते असल्यामुळे जबड्याची ताकत प्रचंड आहे. तोंड एवढे निमुळते आहे की, बायका घालतात ती बांगडी त्याच्या डोळ्याच्या वर पर्यंत जात असल्यामुळे त्याला ‘बांगडी कारवान’ म्हणतात… या गावचे रहिवाशी असलेले मागच्या अनेक पिढ्यानीं कारवान ब्रीडची जपणूक केलेले तानाजी पवार यांच्या घरात एक अनोखा कुत्र्याच्या गळ्यात घालायचा पट्टा दाखवला त्यावरून हे सिद्ध झालं की कारवान बिबट्याची शिकार करायचे…बिबट्या किंवा वाघ शिकार करताना अगोदर मान पकडतात, म्हणून मानेत जे पट्टा घातला जायचा त्यापट्ट्याला अत्यंत तीक्ष्ण लोखंडी खिळे मारले जायचे. त्यामुळे बिबट्या मान धरायला गेला तर तो त्या तीक्ष्ण खिळ्यांनी  जायबंदी व्हायचा आणि त्याच्यावर कारवान कुत्रे वरचढ व्हायचे, अशी माहिती तानाजी पवार यांनी दिली आणि त्या पट्ट्याचे फोटोही उपलब्ध करून दिले.

 पोटात असतानाच पिल्ले होतात बुक

जानवळ ब्रीडचा डंका देशभर पोहचला असून, लांबून लांबून लोक या कुत्र्यांच्या पिल्लासाठी येतात. साधारण 15 हजार रुपयापर्यंत एक पिल्लू विकलं जातं…पिल्लू बुक केलं तरी आईचे दूध तुटेपर्यंत हे पिल्ल तुमच्या हाती दिली जात नाहीत… बाहेरचे दूध प्यायला लागल्यानंतरचं कुत्रे ताब्यात दिले जाते.जानवळ मधल्या अनेक लोकांचा हा व्यवसाय झाला असून यातून उत्तम उत्पन्नही त्यांना मिळत आहे. 

कृषिसाधना....

1 thought on “बिबट्याला भारी, जानवळ कुत्र्याची जात न्यारी…!!

  1. जानवळ कुत्र्याबद्दलची माहिती अभ्यासपूर्ण..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!