Scorching Temperature : तापमानाची झळ : माणूस अन् झाडांच्या वेदना समान
1 min read
Scorching Temperature : माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान (Temperature) साधारण 37 अंश सेल्सिअस असते. हे तापमान काही अंशांनी वाढले किंवा कमी झाले तरी शरीर अस्वस्थ होते. ताप येतो, अशक्तपणा जाणवतो, डोके दुखते, डिहायड्रेशन होते. अगदी जीव धोक्यात येण्याची वेळही येऊ शकते. म्हणूनच माणूस स्वतःला वाचवण्यासाठी सावली शोधतो, पाणी पितो, डोक्यावर कापड घेतो, पंखा-एसी वापरतो, विश्रांती घेतो. कारण शरीराला जिवंत राहण्यासाठी तापमानाचा समतोल आवश्यक असतो. हेच तत्त्व निसर्गातील प्रत्येक सजीवाला लागू होते. मग तो माणूस असो, प्राणी असो किंवा आपल्या शेतातील टोमॅटोचे (Tomato) नाजूक रोप (Plant) असो. टोमॅटोच्या झाडांची वाढ चांगली होण्यासाठी साधारण 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. या मर्यादेपलीकडे तापमान गेले की, झाड सुद्धा अस्वस्थ होते. त्याची पाने करपतात, फुलगळ होते, फळधारणा कमी होते, उत्पादन घटते. फरक इतकाच की, माणूस आपली वेदना बोलून दाखवू शकतो; पण झाड काही बोलत नाही. ते फक्त शांतपणे त्रास सहन करत राहतात.
🔷 झाडांची नैसर्गिक व्यवस्था
आज हवामान बदलाच्या काळात ही गोष्ट अधिक गंभीर बनत चालली आहे. महाराष्ट्रात एप्रिल-मे महिन्यात तापमान अनेक ठिकाणी 42 ते 45 अंशांच्या पुढे जात आहे. जमिनीचा पृष्ठभाग तापतो, वाऱ्याची उष्णता वाढते, रात्रीचे तापमानही कमी होत नाही. अशा वेळी माणूस घरात जाऊन बसू शकतो, पण शेतातील उभे पीक कुठे जाणार? ते उन्हातच उभे राहते. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी संघर्षाचा असतो. झाडेही सजीव आहेत, हे आपण फक्त पुस्तकात वाचतो; पण प्रत्यक्ष शेती करताना अनेकदा विसरतो. झाडांनाही तहान लागते, झाडांनाही उष्णतेचा ताण येतो, झाडांनाही श्वसन करावे लागते. झाडातील प्रत्येक पेशी जिवंत असते. माणसाच्या शरीरात जसे रक्ताभिसरण चालते तसेच झाडांमध्ये पाणी आणि अन्नद्रव्यांची वाहतूक चालते. माणसाच्या शरीरातून घाम बाहेर पडून शरीर थंड राहते; त्याचप्रमाणे झाडे पानांमधून बाष्पोत्सर्जन करून स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण तापमान अत्यंत वाढले, पाणी कमी पडले, आर्द्रता घटली तर झाडांची ही नैसर्गिक व्यवस्था कोलमडते.
🔷 परागकणांची कार्यक्षमता
माणसाला डिहायड्रेशन झाले की अशक्तपणा येतो. झाडांमध्येही तेच घडते. जमिनीत ओल नसली की मुळे अन्नद्रव्ये उचलू शकत नाहीत. पाने कोमेजतात. फुलगळ सुरू होते. टोमॅटोमध्ये परागीकरणावर परिणाम होतो. 35 अंशांपेक्षा जास्त तापमानात परागकणांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे फुले येतात, पण फळधारणा होत नाही. शेतकरी म्हणतो, ‘झाड भारी आहे पण फळ नाही.’ यामागे अनेकदा तापमानाचा ताण असतो.
🔷 ठिबक सिंचन महत्त्वाचे
माणूस गरमीपासून वाचण्यासाठी डोक्यावर टोपी घालतो. मग आपल्या पिकांसाठी आपण काय करतो? काही शेतकरी अजूनही दुपारच्या उन्हात पाणी देतात. त्यामुळे जमिनीतील तापमान अधिक वाढते. काही वेळा झाडांना अचानक मोठ्या प्रमाणात पाणी दिले जाते. त्यामुळे मुळांवर ताण येतो. प्रत्यक्षात उष्णतेच्या काळात पाण्याचे शास्त्रीय नियोजन ही सर्वात मोठी गरज आहे. ठिबक सिंचन ही आज केवळ पाणी बचतीची पद्धत राहिलेली नाही, तर तापमान नियंत्रणाचे प्रभावी साधन बनली आहे. कमी प्रमाणात पण वारंवार पाणी दिल्याने जमिनीतील ओल टिकून राहते. मुळांभोवतीचे तापमान स्थिर राहते. झाडाला अचानक धक्का बसत नाही. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी दिल्यास बाष्पीभवन कमी होते आणि झाडाला अधिक फायदा होतो.
🔷 मल्चिंग व जमिनीचे तापमान
मल्चिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा उपाय आहे. माणूस जसा उन्हापासून वाचण्यासाठी डोक्यावर कपडा घेतो, तसाच मल्चिंगचा थर जमिनीला संरक्षण देतो. सेंद्रिय अवशेष असोत किंवा प्लास्टिक मल्च, त्याने जमिनीतील ओल टिकते, तापमान नियंत्रणात राहते आणि मुळांना आराम मिळतो. अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे की मल्चिंगमुळे जमिनीचे तापमान काही अंशांनी कमी राहते आणि उत्पादनात वाढ होते.
🔷 निसर्गाचे प्रयत्न
निसर्ग स्वतःही झाडांना वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. झाडे पाने वाकवतात, काही पाने गाळतात, बाष्पोत्सर्जन कमी करतात. हा त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष असतो. पण केवळ निसर्गावर अवलंबून राहणे आता पुरेसे नाही. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानेही झाडांचा साथीदार बनले पाहिजे.
🔆 सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलन या काळात अत्यंत महत्त्वाचे असते. कॅल्शियम, बोरॉन, पोटॅश यांचा योग्य वापर झाडाची ताण सहन करण्याची क्षमता वाढवतो. समुद्री शैवाल अर्क, अमिनो ॲसिड, ह्युमिक पदार्थ यासारखे जैवउत्तेजक काही प्रमाणात मदत करतात. पण कोणतेही औषध हे पाण्याची जागा घेऊ शकत नाही. तहानलेल्या माणसाला जसे फक्त गोळ्या देऊन उपयोग होत नाही, तसेच झाडांनाही आहे.
🔆 आज अनेक शेतकरी उत्पादन वाढवण्याच्या नादात जमिनीवर आणि झाडांवर जास्त ताण आणत आहेत. जास्त खत, जास्त औषधे, सतत वाढीचा आग्रहामुळे झाडे कमकुवत होतात. उष्णतेच्या काळात त्यांना अधिक फटका बसतो. जसे सतत काम करणारा माणूस थकून जातो, तसेच सतत उत्पादन देणारे झाडही थकते. म्हणून शेतीत संतुलन आवश्यक आहे.
🔆 शेडनेट, आंतरपीक पद्धती, वाऱ्यापासून संरक्षण करणारी झाडे, सेंद्रिय पदार्थांचा वापर, जमिनीतील कार्बन वाढवणे हे सर्व उपाय तापमान नियंत्रणासाठी मदत करतात. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर ती अधिक पाणी धरून ठेवते. अशा जमिनीतील झाडे उष्णतेचा ताण तुलनेने कमी सहन करतात.
🔆 या सर्व गोष्टींकडे पाहताना एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, आपण झाडांकडे फक्त उत्पादन देणारे यंत्र म्हणून पाहतो का? की जिवंत सजीव म्हणून? कारण भावना नसल्या तरी संवेदना झाडांमध्ये निश्चित आहेत.
संशोधनांनी सिद्ध केले आहे की, झाडे ताणाला प्रतिसाद देतात. पाण्याची कमतरता, उष्णता, रोग या सर्व परिस्थितींमध्ये त्यांच्यात जैविक बदल होतात. ते जगण्यासाठी लढतात.
🔆 शेतकरी स्वतः उन्हात राबतो. त्याला गरमी काय असते हे सांगण्याची गरज नाही. पण कधी कधी तो स्वतःच्या पिकाच्या वेदना ओळखत नाही. दुपारी स्वतः झाडाखाली बसणारा माणूस आपल्या पिकाला मात्र उघड्या उन्हात विसरतो. हे बदलण्याची वेळ आली आहे.
🔆 भविष्यात शेतीचे सर्वात मोठे आव्हान केवळ पाणीटंचाई नसणार; तर तापमान व्यवस्थापन असणार आहे. ज्या शेतकऱ्याने तापमानाचा अभ्यास केला, पाण्याचे नियोजन केले, जमिनीचे आरोग्य सुधारले, त्याची शेती टिकणार आहे. बाकीचे फक्त वाढत्या उष्णतेसमोर हतबल होत जातील.
🔆 आज गरज आहे ती संवेदनशील शेतीची. जशी आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीची काळजी घेतो, तशीच काळजी पिकांची घ्यावी लागेल. कारण शेवटी झाड जगले तरच शेतकरी जगेल. झाड निरोगी असेल तरच उत्पादन मिळेल. आणि उत्पादन टिकले तरच शेती टिकेल.
🔆 माणूस आणि झाड यांच्यातील नाते हे केवळ अन्नपुरवठ्याचे नाही; तर जीवनाच्या समान संघर्षाचे आहे. तापमानाची झळ दोघांनाही सारखीच बसते. फरक एवढाच, माणूस मदतीसाठी हाक मारतो, झाड मात्र शांत राहून सगळं सहन करतं. त्या शांत वेदनेला समजून घेणे, हीच खरी आधुनिक शेतीची सुरुवात आहे.