krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

NAFED Onion procurement : नाफेडची कांदा खरेदी कमी आणि जाचक अटीच अधिक!

1 min read
NAFED Onion procurement : नरेंद्र माेदी सरकारने (Narendra Modi Govt) कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क (Export duty) लावून नाफेड (NAFED - National Agricultural Cooperative Marketing Federation of India) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी उपभोक्ता संघ लिमिटेड (NCCF - National Cooperative Consumers Federation of India Limited)च्या माध्यमातून 2,410 रुपये प्रति क्विंटल दराने 2 लाख टन कांदा खरेदी करण्याची घाेषणा केली. ही घाेषणा रविवारी (दि. 19 ऑगस्ट 2023) सायंकाळी करण्यात आली. नाफेडने या 11 दिवसात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यासह इतरत्र कुठेही माेठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी (Onion procurement) सुरू केली नाही. एवढेच नव्हे तर कांदा खरेदीसाठी 12 वेगवेगळ्या अटीही नाफेडने लावल्या असून, तसे फलक नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व इतर बाजार समित्यांच्या परिसरात लावले आहेत.

🌍 काय आहेत या जाचक अटी?
🔆 सन 2022 मध्ये सातबारा उताऱ्यावर उन्हाळ कांद्याची नोंद असताना ती नोंद 2023 च्या सातबारावर असल्यास त्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जाईल. 2023 च्या सातबारावर तशी नाेंद नियमानुसार करता येत नाही, असे तलाठी व महसूल विभागातील अधिकारी सांगतात.
🔆 प्रति हेक्टरी 280 क्विंटलपेक्षा अधिक कांदा खरेदीसाठी स्वीकारला जाणार नाही.
🔆 हा रब्बी कांदा असावा.
🔆 त्याचा आकार दर्जेदार म्हणजे किमान 55 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक असावा. यापेक्षा कमी आकाराचा कांदा खरेदी केला जाणार नाही.
🔆 कांद्याला विळा लागलेला नसावा.
🔆 कांद्याचा पात निघालेला नसावा.
🔆 कांद्याला कोंब फुटलेले नसावे.
🔆 कांद्याचा आकार बिघडलेला नसावा.
🔆 कांद्याचा रंग गेलेला नसावा.
🔆 कांदा काजळी असलेला नसावा.
🔆 कांदा बुरशीजन्य अथवा बुरशी लागलेला नसावा.
🔆 कांदा वास येणारा नसावा.
🔆 कांदा मऊ नसावा.

🌍 जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विराेधात शेतकऱ्यांचे आंदाेलन सुरूच आहे. मध्यंतरी कांदा व्यापाऱ्यांनी याच निर्णयाच्या निषेधार्थ बाजारपेठा बंद ठेवल्या हाेत्या. बाजारपेठा सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावात कांद्याचे दर कमी बाेलायला सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. शिवाय, नाफेडने कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणीही रेटून धरली. त्याअनुषंगाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेडला तातडीने कांदा खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, नाफेडने कांदा खरेदी सुरू करून वेग वाढविण्याकडे लक्ष दिले नाही. या आदेशानंतर तीन दिवसांनी नाफेडने लासलगाव येथे कांदा खरेदी सुरू केली. त्यासाठी जाचक अटीही लादल्या. नाफेडने या अटींचे फलक खरेदी केंद्राच्या दर्शनी भागात लावले आहेत.

🌍 एफपीसी मार्फत कांदा खरेदी
नाफेडने नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील काही एफपीसी (Farmer Producer Company)साेबत करार केले आहेत. यासाठी नाफेडद्वारे एफपीसीला कमिशन दिले जाते.

🌍 शेतकऱ्यांची बाजारात काेंडी
सध्या शेतकरी जाे कांदा बाजारात विकायला आणत आहे, त्यातील 25 टक्केही कांदा नाफेडच्या निकषात बसत नाही. कारण, हा कांदा चाळीत साठवलेला असून, पावसामुळे ताे काहीसा नरम पडला असून, दमट वातावरणामुळे काही कांद्याला काजळी धरली आहे. हा कांदा नाफेड खरेदी करणार नसल्याने शेतकऱ्यांना ताे कमी दरात व्यापाऱ्यांना विकावा लागणार आहे. नरेंद्र माेदी सरकारने आधीच निर्यात शुल्क लावून कांद्याचे दर दबावात आणले. त्यातच नाफेडने जाचक अटी लादून शेतकऱ्यांची बाजारात काेंडी केली आहे.

🌍 शेतकऱ्यांऐवजी नाफेडची पाठराखण
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या जाचक अटींचे अप्रत्यक्ष समर्थन करीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू घेण्याऐवजी नाफेडची पाठराखण केली आहे. कांदा खरेदी करताना नाफेडच्या या अटी व नियम याआधीही हाेते. यात काेणतेही बदले करण्यात आले नाही, असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

🌍 नाफेडची 16 ठिकाणी कांदा खरेदी
महाराष्ट्रात नाफेडने 16 ठिकाणी कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहेत, अशी माहिती केंद्रय वाणिज्य मंत्री पीयूष गाेयल यांनी दिली. यात लासलगाव, पिंपळगाव (बसवंत), विंचूर, अंदरसूल, मुंगसे, ताराबाद, नामपूर, मालेगाव, मनमाड, देवळा, तिसगाव, वैजापूर, आगर, पारनेर आणि अहमदनगर या केंद्रांचा समावेश आहे. हे केंद्र सुरू करण्यात आल्याचा दावा पीयूष गाेयल यांनी केला असून, पुढे कांदा खरेदी केंद्र वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वास्तवात, यातील काेणतेही कांदा खरेदी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नाही. जे सुरू करण्यात आले, तिथे जाचक अटींचे फलक लावून नाफेडने अर्थात नरेंद्र माेदी सरकारने शेतकऱ्यांकडील कांदा खरेदी करण्यास अप्रत्यक्ष नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!