krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon : मान्सून म्हणजे नेमक काय?

1 min read
Monsoon : बरेच जण पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाला मान्सून समजतात. प्रत्यक्षात मान्सून म्हणजे ठराविक काळाने दिशा बदलणारे वारे. शास्त्रोक्त व्याख्येत मान्सून म्हणजे पर्जन्य नाही. 'मान्सून' (Monsoon) हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. मौसिम या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ 'ऋतू:' असा होतो. अरबी खलाशी अरबी समुद्रातील दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांचे वर्णन करण्यासाठी या शब्दाचा वापर करत. दिशा बदलणारे हे वारे सहा महिने नैऋत्येकडून तर बाकी सहा महिने ईशान्येकडून वाहतात. पावसाळ्यातील पाऊस (Rain) म्हणजे याच मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस म्हणजेच मोसमी पाऊस किंवा मान्सूनचा पाऊस होय.

🌐 इतरांपेक्षा वेगळा कसा?
मोसमी वारे इतरांपेक्षा वेगळे असतात. ते वर्षाच्या विशिष्ट कालावधीत आपल्याकडे येतात आणि विशिष्ट कालावधीत आल्या वाटेने परत निघून जातात.
❇️ भारताच्या बहुतांश भागाचा विचार करायचा तर हे वारे आपल्याकडे जून ते सप्टेंबर या काळात येतात आणि त्यानंतर माघारी निघून जातात.
❇️ हे वारे येताना समुद्रावरील बाष्प घेऊन येतात आणि पाऊस पाडतात. म्हणून भारतात सर्वाधिक पाऊस याच काळात पडतो.
❇️ संपूर्ण भारतात सरासरी 890 मिलीमीटर इतका पाऊस पडतो.
❇️ मान्सूनला पाऊस समजण्याची चुकी करू नका. पावसाळ्यातील वृष्टीला मोसमी पाऊस म्हणा किंवा मान्सूनचा पाऊस!

🌐 कशी असते प्रक्रिया?
जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. याउलट पाण्याला तापण्यासाठी तसेच थंड होण्यासाठीही जास्त वेळ लागतो. दिवसा जमीन समुद्रापेक्षा लवकर तापते. त्यामुळे सायंकाळी जमिनीचे तापमान समुद्रापेक्षा जास्त असते. तापमान जास्त झाले की तेथे हवेचा दाब कमी असतो. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे म्हणजे मान्सून वारे. त्यामुळे दुपारी वारे हळूहळू जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अर्थात समुद्रावरून जमिनीकडे वाहू लागतात. साहजिकच समुद्रावरून येणारे वारे आपल्यासोबत मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणतात. या वाऱ्यांची दिशा भारताची नैऋत्य बाजू आहे. त्यामुळेच याला ‘नैऋत्य मोसमी वारे’ असेही म्हणतात. या वाऱ्यांमुळे भारताबरोबरच श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि चीनच्या काही भागांत पाऊस पडतो. अशा बाष्पयुक्त वाऱ्यामुळे भारतीय उपखंडाला पाऊस मिळतो.

🌐 भारतातील आगमन कशावरून ठरवतात?
मान्सून केरळ किनारपट्टीवर आल्याचे जाहीर करण्यासाठी तीन प्रमुख निकष आहेत. ते पाहूनच मान्सूनचे आगमन जाहीर केले जाते. मान्सूनचे केरळातील आगमन उगीच मनात आळे म्हणून जाहीर केले जात नाही, त्यासाठी हे स्पष्ट निकष आहेत.

❇️ पाऊस
मान्सूनचे आगमन जाहीर करण्यासाठी केरळमध्ये 14 ठिकाणे ठरविण्यात आलेली आहेत मिनीकॉय, अमिनी, थिरुअनंतपूरम, पुनालूर, कोल्लम, अलापुझा, कोट्टायम, कोची, त्रिसूर, कोझिकोड, थलासरी, कुन्नूर, कुडुलू, मंगरूळ यापैकी 9 ठिकाणी 10 मे नंतर सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तसेच खाली दिलेले आणखी दोन निकष पूर्ण झाले, तर दुसऱ्या दिवशी मान्सून केरळात आल्याचे जाहीर करतात.

❇️ वारे
विषुववृत्त ते 10 अंश उत्तर रेखावृत्त, 55 अंश पूर्व व 80 अंश पूर्व हे अक्षवृत्त या क्षेत्रात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह विशिष्ट उंचीपर्यंत असावा लागतो. तसेच, वाऱ्याचा वेगही विशिष्ट असावा लागतो.

❇️ पृथ्वीवरून बाहेर टाकल्या जाणारी किरणे
विषुववृत्ताजवळच्या विशिष्ट भागातून पृथ्वी बाहेर टाकत असलेल्या किरणांचे (ऊर्जेचे) प्रमाण विशिष्ट मर्यादेत असावे लागते. याचा संबंध ढगाचे आवरण किती आहे याच्याशी असतो.

🌐 मान्सून केरळच्या आधी ईशान्य भारतात का?
मान्सूनच्या केरळ प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष असते पण त्याआधीच तो ईशान्य भारतात दाखल झालेला असतो. तो 1 जून रोजी केरळात पोहचतो. तेव्हा मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, आसामपर्यंत तो पोहचलेला असतो.अरबी समुद्रावरून येणारी शाखा, बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा अशा दोन मार्गानी मान्सूनचा भारतात प्रवेश होतो. तो अरबी समुद्राच्या शाखेमार्फत केरळच्या सीमेवर येऊन धडकतो. 10 ते 15 जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीपर्यंत पोहोचतो. पुढे 15 जुलैपर्यंत म्हणजे अंदाजे दीड महिन्यात तो संपूर्ण देश व्यापून टाकतो. मान्सूनच्या दुसऱ्या शाखेमुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात तो बंगाल व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पाऊस देतो. वर सांगितलेल्या वेगवेगळ्या घटकांच्या कमी-अधिक प्रमाणांमुळे या तारखा मागे पुढे होण्याची दाट शक्यता असते.

🌐 मान्सून भारतात केव्हा पोहचतो?
मान्सून केरळात कधी येणार? याची दरवर्षीच उत्सुकता असते. त्याच्या आगमनाचे वेळापत्रक आहे. पण त्यात काही बदल संभवतात. मान्सूनचे सरासरी वेळापत्रक
❇️ 20 मे : अंदमान समुद्रात दाखल.
❇️ जून : बंगालच्या उपसागरात दाखल, श्रीलंका निम्मा व्यापतो.
❇️ जून : केरळ, कर्नाटक ओलांडून गोवा व महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर.
❇️ 6-7 जून : मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश.
❇️ जून : उत्तर महाराष्ट्र व विदर्भाचा काही भाग वगळता महाराष्ट्रभर व्याप्ती.
❇️ 15 जून : दक्षिण भारत, पश्चिम भारत, मध्यभारत पूर्व भारत व्यापून उत्तरप्रदेश, राजस्थानच्या सीमेपर्यंत धडक.
❇️ जुलै : राजस्थानचे वाळवंट, अर्धा पंजाब वगळता देशभर व्याप्ती.
❇️ 15 जुलै : संपूर्ण भारत मान्सूनच्या प्रभावाखाली.

या सरासरी तारखा प्रत्यक्षात मान्सूनचे केरळातील आगमन आणि पुढील प्रवासात बदल झाल्याचे पहायला मिळतात.
🌐 केरळातील आगमन
❇️ सर्वात लवकर :- 18 मे 1990
❇️ सर्वात उशिरा :- 19 जून 1972

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!