krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Farmers Pressure Group : कापूस, सोयाबीन उत्पादकांची बाजारात कोंडी; दबावगटाची आवश्यकता

1 min read
Farmers Pressure Group : या वर्षी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतः स्टाॅकिस्ट (stockist) बनून बाजार नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. तो निश्चितच कौतुकास्पद आहे. पण, त्यांच्यापेक्षा प्रक्रियादार (Processers) उद्योजकांची लॉबीचा प्रभाव सरकार दरबारी जास्त आहे. सरकार शेतकऱ्यांपेक्षा उद्योजकांची जास्त काळजी घेत आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व कापूस (cotton) व सोयाबीन (soybean) उत्पादक शेतकऱ्यांनी (farmers) त्यांचा दबावगट (Pressure Group) निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. हा दबावगट अराजकीय (Non political) असला पाहिजे. यात शेतकरी व या पिकांचे बाजारभाव अभ्यासक यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, अशी विनंती आहे.

या वर्षी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतः स्टाॅकिस्ट (stockist) बनून बाजारातील दाेन्ही शेतमालाची आवक नियंत्रित करीत शेतमाल बाजारात विक्रीस आणला नाही. शेतकरी या शेतमालांचे दर वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच प्रक्रियादार उद्योजकांच्या लॉबीने केंद्र सरकारवर दबाव आणला. खुल्या बाजारातील कापूस व साेयाबीनचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) अधिक आहे. या वाढलल्या दरात कापूस व साेयाबीन खरेदी करून त्यावर प्रक्रिया करणे परवडत नाही, असा कांगावाही या लाॅबीने सरकारपुढे केला. केंद्र सरकारने टेक्सटाईल लॉबीपुढे झुकून सुरुवातीला सुताच्या आयातीला व साठा करण्याला परवानगी दिली. एवढेच नव्हे तर दाेन महिन्यांसाठी कापसावरील 11 टक्के आयात शुल्क (import duty) कपात करून कापसाच्या आयातीला मुभा दिली. त्यातच ऑस्ट्रेलियाशी व्यापारी करार करून तीन लाख गाठी कापसाची आयात (import) ही आयात शुल्क मुक् करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारकडून हा सर्व प्रकार कापसाचे दर दबावात ठेवण्यासाठी तसेच पाडण्यासाठी केला जात आहे.

महागाई वाढल्याच्या नावाखाली केंद्र सरकारने सोयाबीन, साेयातेल आणि साेयापेंडीवर निर्बंध घालले आहे. या निर्बंधामुळे साेयाबीनचे मागील दीड वर्षापासून दबावात आले आहेत. केंद्र सरकारने हा निर्णय साेयाबीन तेल (soya oil) उत्पादक कंपन्यांच्या लाॅबीच्या दबावामुळे घेतला असून, त्याला महागाईचा मुलामा दिला आहे. उद्याेजकांच्या लाॅबीसमाेर लाेटांगण घालणारे सरकार शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत.शेतकरी एकसंघ नसल्याने सरकारला असले प्रकार करणे साेपे जाते. त्यासाठी किमान कापूस आणि साेयाबीन उत्पादकांचा अराजकीय दबावगट निर्माण करून सरकारला शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात बाध्य करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी राजकीय व सामाजिक मतभेद बाजूला सारून आपल्या अर्थकारणासाठी एकत्र येणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

यावर्षी टेक्सटाईल व गारमेंट तसेच साेयाबीन तेल उत्पादक लाॅबी त्यांचा स्वार्थ साधण्यात यशस्वी झाले आहेत. कारण त्यांची एकी असून, अर्थकारणासाठी त्यांच्यात एकवाक्यता आहे. दुसरीकडे, आपण शेतकरी आपले अर्थकारण विसरून वेगवेगळ्या गटातटात विखुरले गेलाे आहोत. याचा अनुभव आपल्याला मुंबईस्थित सेबी ऑफिस समाेरील 23 जानेवारी 2023 च्या धरणे आंदोलनात आला. राज्यात लाखो कापूस उत्पादक शेतकरी असूनही या आंदोलनास फक्त चार-दोन हजार शेतकरी सहभागी झाले हाेते. उद्योजकांकडून सरकारला माेठ्या प्रमाणात फंडिंग केले जाते. त्यामुळे सरकार देखील उद्योजक धार्जिणे निर्णय घेते. त्यासाठी सरकार आणि उद्योजकांची ही अभद्र युती तोडण्यासाठी सर्व सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी एक अराजकीय दबावगट निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

या वर्षी उद्योजक साठा करून पुढील वर्षीचे भाव पाडण्याचे धंदे केंद्र सरकारचे मदतीने करणार आहेत. त्यामुळे त्यांना वेळीच आळा घातला नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त भाव असूनही तो भाव आपल्याला कदापि मिळणार नाहीत. या शेतमालची निर्यात होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीस पाठविण्यात आला पाहिजे. शेतमालाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) अधिक वाढले की, देशातील व्यापार व उद्योजकांना त्या भावात शेतमालाची खरेदी करणे परवडत नाही, अशा बोंबा ठाेकून भाव पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणतात. त्यात ते यशस्वीही होतात. कारण त्यांचा दबावगट आपल्यापेक्षा कितीतरी अधिक प्रभावी आहे.

या निमित्ताने मी सर्व कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना आवाहन करताे की, आपण राज्यातील या पिकांचे बाजारभाव अभ्यासक, तज्ज्ञ, सर्व समविचारी संघटना व शेतकरी यांचा एक प्रभावी दबाव गट निर्माण करून आपल्याला हवा तसा आपल्या आर्थिक हिताचा निर्णय केंद्र व राज्य सरकारला घेण्यास भाग पाडू शकतो. गरज आहे सगळ्यांनी एकत्र येण्याची, एक अराजकीय दबाव गट निर्माण करण्याची! त्याच दृष्टीने आपण प्रयत्न सुरू करू. यात आपल्या सगळ्यांची एकत्र मोट बांधून आपली आर्थिक उन्नती साधूया! कारण आपलर आर्थिक उन्नती आपल्यालाच साधावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या जीवावर जगणारे, मजा मारणारे कोणतेही राजकीय पक्ष अथवा नेते आपल्या बाजूने उभे राहणार नाही. हे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर वारंवार सिद्ध झाले आहे. त्याचा आपण अनेक वर्ष अनुभव घेत आहाेत. हा दबावगट निर्माण करण्यासाठी आपण विविध तज्ज्ञ व सर्व शेतकरी मित्रांनी एकत्र येऊन आपणच आपली आर्थिक प्रगती साधूया! या दबावगटामध्ये सर्व शेतकरी व शेतकरी हिताचे शेतमाला बाजार अभ्यासक मित्रांना सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. कृपया संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!