शरद जोशी : द्रष्टा कृषी अर्थशास्त्रज्ञ
1 min readचाकणच्या (जिल्हा पुणे) कांदा आंदोलनापासून शरद जोशींच्या आंदोलक नेतृत्वाची प्रतिमा तयार होण्यास सुरुवात झाली. ज्या काळात सर्वजण शेतकर्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याची मागणी करत होते. रासायनिक खते स्वस्त द्या, वीज स्वस्त द्या, बियाणे, फवारणीची औषधे स्वस्त द्या, अशी मागणी करत होते. तेव्हा शरद जोशींनी, ‘सूट सबसिडीचे नाही काम, भिक नको, हवे घामाचे दाम’ अशी घोषणा करून सर्वांनाच अचंबित केले.
चाकणच्या कांदा आंदोलनाच्या यशानंतर ऊस, कापूस, तंबाखू अशी अनेक प्रचंड संख्येची व प्रतिभावान आंदोलने शरद जोशींच्या नेतृत्वात झाली. उसाची झोनबंदी, गुर्हाळबंदी, लेव्ही, कापूस एकाधिकार खरेदी, राज्यबंदी अशा अशा बेड्या शेतकरी संघटनेने शरद जोशींच्या नेतृत्वखाली तोडून दाखवल्या. बोंडअळीला प्रतिकारक कपाशीच्या बियाण्यावरील बंदी उठवून, कापसाचा आयातदार असणार्या भारत देशाला जगातील सर्वाधिक कापूस पिकवणारा देश व दोन नंबरचा निर्यातदार देश बनविण्याचे श्रेय फक्त शेतकरी संघटना व शरद जोशींना जाते. असे अनेक निर्णय आहेत, ज्यामुळे शेतकर्यांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावल्या आणि ग्रामीण भागाचे जीवनमान उंचावले.
शरद जोशी शेतकरी नेते, कृषी अर्थततज्ज्ञ म्हणून जरी विख्यात असले तरी त्यांचा विचार फक्त शेतकर्यांच्या स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हता. शेतकर्यांच्या खिशात पैसा आला तर, संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती सुधारेल, उद्योग व्यवसायांची भरभराट होईल व देशाला अनेक समस्यातून मुक्ती मिळेल, असा तो विचार आहे. चळवळीच्या मार्गने सर्व प्रश्न सोडवता येत नाहीत, व्यवस्था बदलयवायची असेल तर विधिमंडळात जावे लागेल, सत्तेत जावे लागेल, याची जाणीव झाल्यानंतर शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. या प्रयोगाला काही प्रमाणात यश मिळाले. शरद जोशी स्वत: स्वतंत्र भरत पक्षाचे खसदार म्हणून राज्यसभेत गेले. पण, त्यांना अपेक्षित ‘यश’ मिळणे बाकी आहे. ते ही एक दिवस मिळेलच. कारण, या देशाला शरद जोशींच्या विचारांशिवाय पर्याय नाही.
वर्षभर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाने शेतकर्यांना काही प्रमाणात का होईना मिळणारे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. या परिस्थितीत शरद जोशी असायला हवे होते, असे सर्वांनाच वाटत आहे. या आंदोलनामुळे किंवा सरकारने कायदे करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एक गोष्ट चांगली झाली. ती ही की, देशात पहिल्यांदा देशाच्या कृषी धोरणावर गांभीर्याने चर्चा केली जात आहे. देशातील बहुतेक कृषी अर्थशास्त्रज्ञ शेती व्यवसायाला स्वातंत्र्य देण्याच्या बाजूचे आहेत, हे ही या निमित्ताने स्पष्ट झाले. भारत कृषी प्रधान देश आहे. पण, देशाला कृषी धोरणच नाही, ही माहिती अनेकांना नवीन व धक्कादायक होती.
आज देशात कृषी धोरणावर चर्चा सुरू आहे. देशातील समाजवादी गटांनी शेतकर्यांची दिशाभूल करून येऊ घातलेले स्वातंत्र्य दूर लोटले आहे. बाजार स्वातंत्र्य व तंत्रज्ञान स्वातंत्र्य हा शेतकर्यांचा व्यवसायसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविण्यासाठी शरद जोशींनी तयार केलेले शिलेदार स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन चालत आहेत. संघर्ष सुरू आहे व या संघर्षाला यश येणे अनिवार्य आहे. कारण, देशाला शरद जोशींच्या विचारांशिवाय दुसरा पर्यायच नाही. अनेक दशके पुढे पाहण्याची क्षमता व त्याची अचूक अर्थशास्त्रीय मांडणी करण्याचे कौशल्य असणरा द्रष्टा नेता आज आपल्यात नसला तरी त्यांचे विचार येणार्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत रहातील. प्रत्येक जीव अधिकाधिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धडपडत असतो. शेतकरीही धडपडत राहणार आहेत. या धडपडीला यश प्राप्त होण्यासाठी तसेच शरद जोशींच्या विचाराला विजय मिळवून देण्यासाठी झटत राहणे यातच आपला स्वार्थ आहे आणि हीच या योद्धा शेतकर्याला खरी आदरांजली ठरेल.
Bhik nako ghau Ghamache daam