krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

शेतकरीविरोधी व्यवस्था आणि ‘शेतकरी नेते’

1 min read
आपल्या देशातील व्यवस्था ही "शेतकरीविरोधी" आहे आणि या देशातील शेतकऱ्यांच्या गरीबी, दारिद्र्य व वाढत्या कर्जबाजारीपणाचे मूळ हे सरकारच्या "शेतकरीविरोधी धोरणां"मध्ये आहे, हे या देशात स्वातंत्र्यानंतर स्व. शरद जोशी या एकमेव शेतकरी नेत्याने सांगितले आणि ते त्यांनी वेळोवेळी सप्रमाण सिद्ध करून दिले. त्यांचा पिंड मुळात अर्थवादी असल्याने सत्तेच्या राजकारणात त्यांना फारसे यश मिळाले नाही. किंबहुना; ते मिळू नये, यासाठी प्रस्थापितांकडून पद्धतशीरपणे प्रयत्न करण्यात आले आणि शेतकरी व इतर उद्योजक त्याला बळी पडत गेले.


इतर राजकीय पक्षासोबतच शरद जोशी यांनी उभारलेल्या शेतकरी चळवळीतही नवनवीन “नेतृत्व” उदयास आले. त्या नेतृत्वाकडे “शेतकरी नेता” या नजरेने बघितले जावू लागले. पुढे यातील काहींनी त्यांच्या सोयीने शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेशी फारकत घेत आपला वेगळा मार्ग निवडला. मुळात शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे निर्मिती ही या देशातील “व्यवस्था परिवर्तना”साठी केली होती. आंदोलनांमुळे व्यवस्था परिवर्तन शक्य नसून त्याला मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे व्यवस्था परिवर्तनासाठी शरद जोशी यांच्या विचारांच्या व्यक्ती अधिकाधिक प्रमाणात संसद व विधिमंडळात निवडून जाणे गरजेचे होते. आपले हितसंबंध गोत्यात येणार असल्याचे लक्षात येताच प्रस्थापित राजकीय नेत्यांनी वेळोवेळी शरद जोशी आणि त्यांच्या शेतकरी संघटनेविरुद्ध अपप्रचाराला सुरुवात केली. शेतकरी व इतर नागरिक या अपप्रचाराला बळी पडत गेल्याने शरद जोशी व शेतकरी संघटनेला राजकीय आघाडीवर फारसे यश संपादन करणे शक्य झाले नाही. दुसरीकडे, याच शेतकरी चळवळीतून उदयास आलेल्या काही नेतृत्वाने वेगळा मार्ग पत्करून त्यांचा राजकीय जम बसवला. हे नेतृत्व खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं “नेतृत्व” होऊ शकते काय? या नेतृत्वाने कधीही शेतकरीविरोधी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला नाही. मग, त्यासाठी आंदोलन उभारणे दूरच राहिले. उलट, त्यांनी स्वतःला व्यवस्थेनुरूप बदलून घेतले. मग, या नेतृत्वात आणि इतर पक्षातील स्वतःला “शेतकरी नेते” म्हणवून घेणाऱ्यांमध्ये फरक काय राहिला? राजकीय स्वार्थासाठी व्यवस्थेनुरूप बदललेल्या शेतकरी नेत्यांमुळे शेतकरी विरोधी व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यांनी राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना टीकेला सामोरे जावे लागले.  जर राजकीय पक्षातील शेतकरी नेते आणि व्यवस्थेनुरूप बदललेले शेतकरी नेते यांच्यात वैचारिक फरक नसेल किंवा ते इतर राजकीय पक्षातील शेतकरी नेत्यांप्रमाणे या देशातील शेतकरीविरोधी व्यवस्थेचा एक घटक बनले असेल, तर मग त्यांना “शेतकरी नेते” म्हणावे काय? हे “नेतृत्व” इतर पक्षातील नेत्यांप्रमाणे भारतीय शेतकऱ्यांना नाकारले जाणारे तंत्रज्ञान स्वातंत्र्य, कायदेभंग केला म्हणून शेतकऱ्यांवर दाखल केले जाणारे फौजदारी गुन्हे, या देशातील विविध शेतकरी विरोधी कायदे, शेतमालावर घातली जाणारी विविध बंधने, शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य, यासह अन्य महत्वाच्या बाबींवर कधीही खुलेआम अथवा खासगीत बोलताना दिसत नाही. मग, त्याअनुषंगाने कृती करणे दूरच राहिले. या व्यवस्थेत शेतकऱ्यांचं भलं होणे शक्य नाही, हे आता सिद्ध झाले आहे. मग, सर्व व्यवस्थेनुरूप बदलणाऱ्या व शेतकरीविरोधी व्यवस्थेचे मूक समर्थन करणाऱ्या या नेतृत्वाला “शेतकरी नेते” का म्हणावं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!