Unseasonal rain and hail : महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता
1 min read
Unseasonal rain and hail : ‘एमजेओ’ (The Madden-Julian Oscillation)ची सायकल अद्याप भारत महासागरीय परीक्षेत्रात प्रवेशले नाही. तरीही, बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे पण भूभागावर महाराष्ट्रपर्यंत येताच नैऋत्येकडून ईशान्येकडे दिशा घेणारे तसेच उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे ईशान्येकडून नैऋत्येकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांच्या संगमातून तसेच त्यातून समुद्रसपाटीपासून 900 मीटर ऊंचीपर्यंत महाराष्ट्र ते ओडिशादरम्यान तयार झालेला कमकुवत हवेच्या कमी दाबाचा आस यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचे वातावरण (Unseasonal rain) तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच्या परिणामातून शनिवार (दि. 29 मार्च)पासून 10 दिवस म्हणजे सोमवार (दि. 7 एप्रिल)पर्यंम महाराष्ट्रात ढगाळ तसेच गडगडाटीचे वातावरण राहण्याची शक्यता निर्माण झली आहे. एवढेच नव्हे तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही जाणवते. विशेषत: मंगळवार (दि. 1 एप्रिल) व बुधवार (दि. 2 एप्रिल)ला या वातावरणाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन दिवसात महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
🔆 गारपिटीचे दोन दिवस
महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यात व परिसरात मंगळवार (दि. 1 एप्रिल) व बुधवार (दि. 2 एप्रिल) या दोन दिवसात तुरळक ठिकाणी गारपीट (Hail) होण्याची शक्यता जाणवते.
महाराष्ट्रात ढगाळ तसेच गडगडाटीचे वातावरण जरी सोमवार (दि. 7 एप्रिल)पर्यंत असले तरी या वातावरणाचा शेतातील पीक काढणीच्या सध्याच्या काळात परिणामकारक प्रभाव मात्र मंगळवार (दि. 1 एप्रिल) ते शुक्रवार (दि. 4 एप्रिल)पर्यंतच्या चार दिवसात अधिक असण्याची शक्यता जाणवते. दरम्यानच्या काळात वातावरणात जर काही बदल झालाच तर खुलासा करता येईल.