krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cloudy weather, Rain possibility : राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

1 min read
Cloudy weather, Rain possibility : मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व सात आणि खानदेश व नाशिकपासून ते सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व 10 तसेच धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली अशा महाराष्ट्रातील एकूण 23 जिल्ह्यात कार्तिक एकादशी दरम्यान म्हणजेच गुरुवार (दि. 23 नाेव्हेंबर) व शुक्रवार (दि. 24 नाेव्हेंबर) या दाेन दिवसात केवळ ढगाळ वातावरणाची (Cloudy weather) शक्यता निर्माण झाली आहे. यातील अगदीच तुरळक ठिकाणी कुठे तरी किरकोळ पावसाची शक्यता (Rain possibility) जाणवते, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

शनिवार (दि. 25 नाेव्हेंबर), रविवार (दि. 26 नाेव्हेंबर) आणि सोमवार (दि. 27 नाेव्हेंबर) या दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मात्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातला त्यात रविवार (दि. 26 नोव्हेंबर) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पावसाचे वातावरण अधिक गडद होवून खानदेश, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा व अकोला या जिल्ह्यातील काही क्षेत्रात मात्र मुसळधार पावसाची शक्यता अधिक जाणवते. मुंबईसह कोकणात या पावसाळी वातावरणाचा प्रभाव मात्र अधिक राहणार असून, पावसाचा कालावधी तीन दिवसाचा जाणवतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अवकाळी पावसाचे नेमके कारण काय?
तामिळनाडूतील कन्याकुमारी ते आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टी समोर बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून तीन किमी उंचीपर्यंत जाडीच्या हवेच्या कमी दाब क्षेत्राचा पसरलेल्या ‘आस’मुळे 15 डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या व तामिळनाडू व केरळ राज्यावरून पश्चिमकडे वाहणाऱ्या जबरदस्त ‘पूर्वी वारा झोता’तून वाहणाऱ्या हिवाळी मोसमी वाऱ्यामुळे तसेच चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे तामिळनाडू व केरळ राज्यात सध्या भरपूर पाऊस पडत आहे. ही प्रणाली भू -भाग ओलांडून पुन्हा अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करून गुजरात राज्य कव्हर करून उत्तर महाराष्ट्रात रविवारी (दि. 26 नोव्हेंबर) डांगी परिसरातून उतरणार आहे. त्यामुळे खानदेश, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा व अकोला या जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवार (दि. 25 नोव्हेंबर) वायव्य उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्य प्रदेश, गुजरात मधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत होणार असल्यामुळे दोन्हीही प्रणल्यांचा एकत्रित परिणाम महाराष्ट्रावर गुरुवार (दि. 23 नाेव्हेंबर) ते साेमवार (दि. 27 नोव्हेंबर) या दिवसाच्या पावसाळी वातावरणावर होणार आहे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या एक-दोन दिवसात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती व कमी दाब क्षेत्रातून बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची बीज रोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळ विकसित होवून ते बांगलादेशकडेच त्याची वाटचाल असू शकते. त्यामुळे त्या दरम्यान मीडियात कदाचित चक्रीवादळाच्या बातम्या झळकतील. परंतु त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम जाणवणार नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!